शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारी ‘कऱ्हामाई’

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेकडे नेणारी ‘कऱ्हामाई’

शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी हे ध्येय ठेऊन पुणे जिल्ह्यातील कऱ्हामाई शेतकरी उत्पादक कंपनी अत्यंत उत्साहाने कार्यरत झाली आहे. धान्य ग्रेडिंग, डाळनिर्मिती, बीजोत्पादन, तूरविक्री, चिंचफोडणी अशा विविध उपक्रमांमधून कंपनीने आपले उत्पन्न वाढवण्यास सुरवात केली आहे. शेतीतील आव्हानांचा अडथळा पार करीत मोठ्या आत्मविश्वासाने कंपनीचे प्रत्येक पाऊल यशस्वी पडते आहे. 

कंपनी स्थापन करून त्याद्वारे आपल्या मालाला सक्षम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे हात पुढे आले आहेत. राज्यात विविध शेतकरी कंपन्या आज पुढे जाण्यासाठी धडपडत आहेत. त्यातीलच एक नाव सांगता येईल ते म्हणजे पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कऱ्हामाई अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे. धान्य स्वच्छता, प्रतवारी, बियाणे निर्मिती, कृषी सेवा केंद्र व विविध प्रकारच्या डाळींचे उत्पादन अशा बाबींमध्ये ही कंपनी आज सक्रिय झाली आहे. 

भांडवल उभारणी 
कऱ्हामाई शेतकरी कंपनी स्थापन करताना गट बांधणी व त्यांचे सक्षणीकरण असा विषय शेतकऱ्यांपुढे आला. सुमारे ५३४ सभासदांना सोबत घेत कंपनीने शेअर्स घेऊन कंपनीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली. पाच जून २०१५ रोजी कंपनीची नोंदणी झाली. ग्रामपंचायतीने पंचवीस वर्षांच्या कराराने गावठाणातील जागा कंपनीला उपलब्ध करून दिली. व्यवसाय आराखडा पाहता कंपनी शेड, धान्य स्वच्छता व प्रतवारी तसेच चिंच फोडणी यंत्र, कृषी सेवा केंद्र, संगणक, काही फर्निचर अशी सुमारे वीस लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती. शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे पाच लाख ७० हजार रुपयांचा हिस्सा जमा केला. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत १३ लाख ५० हजार रुपये ‘आत्मा’ विभागाकडून मिळाले. कंपनीला अफार्म, प्रायमूव्ह संस्था, बारामती कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बारामती व ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळाले. 

प्रत्यक्ष भेटीद्वारे ज्ञान देवाणघेवाण 
अफगाणिस्तानातील युनोदे संस्थेचे प्रतिनिधी, इंग्लड, जागतीक बॅंक आदींचे प्रतिनिधी, ठाणे व रायगड येथील चौदा शेतकरी कंपन्यांचे सदस्य यांनी ‘कऱ्हामाई’ कंपनीचे कामकाज प्रत्यश्र पाहून प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर कऱ्हामाईच्या ३२ शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील इक्रिसॅट व तेलबिया संशोधन केद्रालाही भेट दिली. ‘आत्मा’ विभागातर्फे लुधियाना येथे दोन शेतकऱ्यांना तर सिक्कीम येथे दोन शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्यासाठी पाठविले. ‘प्रायमूव्ह’कडूनही राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठास तीस शेतकऱ्यांची भेट घडवण्यात  आली. 

शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पादित मालाच्या विक्रीतून चांगला आर्थिक नफा मिळवा हाच कंपनी उभारणीमागील मुख्य हेतू आहे. आज त्यातूनच आमचे सभासद शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत होत आहे. 
- विजय साळुंके, अध्यक्ष, ‘कऱ्हामाई’ शेतकरी कंपनी  - ९८५०७६७२३०

‘कऱ्हामाई’ कंपनीचे धोरण व उद्देश
तळागाळातील शेतकऱ्यापंर्यंत पोचून त्यांना योग्य सेवा देणे. 
शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवणे  
आधुनिकतेकडे घेऊन जात त्यांचे आर्थिक बळकटीकरण  
व्यसनांपासून दूर ठेवणे  

कार्यान्वित प्रकल्प
चालू वर्षी कृषी विभागाच्या माध्यमातून बाजरी बीजोत्पादन सहा हेक्टरवर 
सुमारे १३० शेतकऱ्यांद्वारे तुरीच्या विपुला वाणाचे बीजोत्पादन  
फलटण येथील निमकर सीड्‌स यांच्या माध्यमातून २५ एकरांवर मागील वर्षी व चालू वर्षी करडई (काटे विरहित व काटेरी) उत्पादन वाढ .   
येत्या काळात घाणीच्या मार्फत करडईचे तेल काढून विक्रीचे नियोजन  
सध्या कंपनीच्या कृषी सेवा केंद्राची उलाढाल- २५ लाख रुपये
कंपनीची उलाढाल सुमारे दीड कोटी रुपये

कंपनीचे सध्याचे उपक्रम 
धान्य ग्रेडिंग व प्रतवारी  
हरभरा व तूर यांच्या डाळी बनवून देणे 
कृिषसेवा केंद्र उभारून खते, बियाणे, कीडनाशकांची नाममात्र दराने विक्री करणे 
चिंच फोडणी करणे  

साध्य बाबी 
आत्तापर्यंत सुमारे ४५० टन मालाचे ग्रेडिंग. त्यातून सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे उत्पन्न. 
ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, धने आदींचा समावेश  
विविध प्रकारच्या सुमारे ५० टनांच्या डाळी तयार करून दिल्या. यात ३८ टन हरभरा तर १२ टन तुरीचा समावेश. त्यातून सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न.  
खतांच्या रास्त किंमतीत विक्रीतून सुमारे २५ लाख रुपयांची उलाढाल
शासकीय तूर खरेदी केंद्र २०१७ मध्ये मिळाले. त्यातून २२५ टनांची व एक कोटी १३ लाख रुपयांची तूर खरेदी केली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम अदा केली. त्यातून कंपनीला सुमारे एक लाख १३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.  
शेतकऱ्यांना कंपनीमार्फत ताडपत्रीची विक्री होते. आत्तापर्यत २२५ ताडपत्रींची विक्री. त्यातून कंपनीला वीस हजार रुपयांपर्यत नफा मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com