...आमचं झालं मरन अन्‌ तुमची झाली चांदी

...आमचं झालं मरन अन्‌ तुमची झाली चांदी

विकास तिकडे बेपत्ता, इकडे धाडली मंदी, 
आमचं झालं मरन अन्‌ तुमची झाली चांदी ।
तुमाले फक्त दिसतेत अंबानी अन्‌ अदानी, 
इंडिया झाला डिजिटल पन्‌ आमी राह्यलो अडानी ।।
कोनाले सातवा वेतन आयोग, शेतमालाले भाव नाई, 
‘सबका विकास’च्या यादीत कास्तकाराचं नाव नाई ।
आधार कार्डावर वाटा आता मानसं माराची दवाई, 
जांभयाचीच पंगत अन्‌ भाषनाईचीच दिवाई !

वऱ्हाडातील अकोला येथील प्रसिद्ध कवी किशोर बळी यांच्या या ओळी आज पावलोपावली आणि खेडोपाडी जाणवत आहेत. शब्द न शब्द हा वास्तवाला जाऊन भिडतो इतकी परिस्थिती ग्रामीण भागात तयार झाली आहे.

या वर्षाने सातत्याने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. कुठल्याही गावात जा, तेथे दोन-चार माणसे उभी दिसली की मूग, उडीद, सोयाबीन अन कापसाचाच विषय सुरू असतो. आतापर्यंत मूग, उडीद शेतकऱ्याच्या घरात आले. सध्या सोयाबीनचा हंगाम जोरावर आहे. मॉन्सूनपूर्व लागवड झालेला कापूसही बोंडातून बाहेर यायला सुरवात झाली. हंगाम जोर पकडत असताना अनेक गावांत मात्र शेतमजूर शोधूनही मिळेनासे झाले. दररोज मजुरीचे दर वाढत आहेत.

सोयाबीन सोंगणीचा दर एकरी १४०० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत पोचला आहे. कापूस वेचणी किलोला पाच ते सात रुपये द्यावी लागत आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात वऱ्हाडात बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे हातातोंडाशी आलेला घास (पीक) हिरावला गेला. परतीच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब बाहेर आणले. तसे ज्वारीच्या कणसातून, कापसाच्या बोंडातून अनेकांच्या शेतात अंकुर फुटले होते. याचा फटका शेतमालाच्या दर्जावर झाला. नेमकी हीच बाब आता व्यापारी हेरत आहेत. सोयाबीनची खरेदी अवघी दोन हजारांपासून केली जात आहे. कापसाचेही असेच झाले आहे. "पांढर सोनं'' भाव नसल्याने मातीमोल दरात विकावे लागत आहे. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले तरी मध्यम धाग्याच्या कापसाला ४०२० आणि लांब धाग्याला ४३२० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळणार नाही हे निश्‍चित आहे. 

दिवाळीत दम नव्हता
पीकपाणी चांगले नसल्याने यंदाच्या दिवाळीत दरवर्षीसारखा जोश नव्हता. दरवर्षी फुटणारे फटाके, कपड्यांची खरेदीच जेथे कमी प्रमाणात झाली त्या ग्रामीण भागात सोने-चांदी खरेदीची तिळमात्र शक्‍यता नव्हती. खेड्यांवर अवलंबून असलेल्या शहरी बाजारपेठाही तशाच मंदावलेल्या होत्या. येते वर्ष कसे राहील याचीच शेतकऱ्यांना चिंता भेडसावत आहे. कर्जमाफी झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला. अनेकांना पीककर्ज भरण्याचा तगादा ऐकावा लागणार नाही. पण शेतमालाच्या भावाचा मोठा प्रश्‍न कायम आहे. नाफेडने हमीभावाने मूग, उडीद खरेदी सुरू केली तरी तेथे निकषात बसणारा शेतमाल नसल्याने कुणालाच फायदा होताना दिसत नाही. आता सोयाबीन, कापसाचेही यापेक्षा दुसरे काही होईल असे वाटत नाही. कारण सोयाबीनचाही दर्जा खालावला तर कापूस कवडीयुक्त निघत असल्याने "एफएक्‍यू'' दर्जा मिळेल याची कुठलीही शाश्‍वती नाही.

या वरसात कुठल्याच मालाले भाव मिळून नाई रायला. शेतकऱ्याजवळ पैसा नाही. दिवाळी कसी साजरी करावी हे समजत नाही. यंदा कर्जमाफी भेटली हे चांगले आहे. त्याचे निकषही चांगले असल्याचे योग्य शेतकऱ्याले कर्जमाफी भेटली. शासनाने पिकाले भाव कसा जादा देता येईल याचा इचार करायले पायजे.
- श्रीकृष्ण ढगे, वरवट बकाल, जि. बुलडाणा

यंदा ग्रामीण भागातील परिस्थिती अाजवरची सर्वात बिकट दिसत अाहे. काहींना उत्पादन झाले नाही. ज्यांना झाले त्यांना शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणी येत अाहेत. कापूस वेचायचा तर वेचाई सहा रुपये किलो चुकवावी लागत आहे. कापसाचा भाव अवघा चार हजार रुपये अाहे. मूग, उडीद, सोयाबीनचा दरही असाच आहे. 
- गणेशराव नानोटे, प्रगतिशील शेतकरी, अकोला

या वर्षी पीकपाणी काहीच नाही. सोयाबीन एकरी तीन पोत्याचा रिझल्ट आला. एवढ्यात खर्चही निघेना. एकराले साडेसहा हजार रुपये खर्च आला अन् उत्पन्न साडेसात हजाराचे रायले. फक्त हजार रुपये हातात पडले. पुळे काय व्हईल काहीच सांगता येत नाही. 
- गजानन चिपडे, नायगाव देशमुख, जि. बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com