माजी सरपंच पूर्ण वेळ झाले प्रयोगशील शेतकरी 

गोपाल हागे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

अलीकडील काळात केवळ कापूस, सोयाबीन परवडत नाही. वेगळे प्रयोग, प्रयत्न केले तरच काहीतरी फायदा होऊ शकतो. याच विचारांच्या आधारे कापशी तलाव (जि. अकोला) येथील पुरुषोत्तम चतरकर यांनी लिंबू, कारली, कांदा बीजोत्पादन अशा प्रयोगांतून स्वतःला पुढे नेण्याचे प्रयत्न केला आहे. हीच सकारात्मक वृत्ती त्यांना फायद्याची ठरत आहे. 

अकोला जिल्ह्यात अकोला -पातूर मार्गावर कापशी फाट्यावरून पश्चिमेस कापशी तलाव नावाचे गाव अाहे. याच गावचे २००३ ते २०१३ अशी दहा वर्षे सरपंचपद भूषविलेले पुरुषोत्तम चतरकर अाज प्रगतशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. त्यांची १५ एकर शेती आहे. या भागात कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. चतरकरदेखील ही पिके घेतात. मात्र केवळ या खरीप हंगामातील पिकांवर काही परवडत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. म्हणूनच विविध पिकांचे प्रयोग करण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे. 

चतरकर यांची पीकपद्धती 
लिंबू- वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेण्याचा हातखंडा चतरकर यांनी मिळवला अाहे. वडिलांच्या काळापासून असलेली लिंबाची बाग त्यांनी आजवर जपली. ती कमी उत्पादनक्षम राहिल्यानंतर त्यांनी नवी तीन एकरात पुन्हा लिंबाची बाग उभारली. कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा ही बाग मोठा स्त्रोत बनली अाहे. वर्षातून मृग व हस्त बहार घेतला जातो. यासाठी वेळच्यावेळी बागेचे चोख व्यवस्थापन ठेवले जाते. मशागत, खते, फवारणी याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. त्यामुळे उत्पादन अधिक मिळत असल्याचे चतरकर म्हणाले. यामुळेच फळांचा दर्जाही एकदम चांगली राहतो. 

लिंबांचे मार्केट 
अकोल्यात लिंबांची विक्री होते. मोठ्या अाकाराची, हिरव्‍या पिवळ्या रंगाची रसदार लिंबू फळे बाजारात चांगला भाव खाऊन जातात. नोटाबंदी होण्यापूर्वी कट्ट्याला ( १२ किलोचा) ३०० रुपयांचा दर मिळायचा. आता तो १०० ते १५० रुपयांवर येऊन ठेपल्याचे चतरकर म्हणाले. यंदा त्यांच्या शेतकरी गटाने वसंत कृषी महोत्सवात लिंबाचे लोणचे १०० रुपये प्रति किलो दराने विकले. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ग्राहकांकडून आजही मागणी होत असल्याचे ते म्हणाले. लिंबाची बाग वर्षात तीन एकरांत तीन लाख रुपयांचा नफा मिळवून देते. 

कारल्यातून पीकबदल 
अकोला बाजारपेठ जवळ म्हणजे १५ किलोमीटरवर असल्याने चतरकर यांनी भाजीपालावर्गीय पिकांची लागवड करायला सुरवात केली अाहे. गेल्या चार वर्षांपासून ते दरवर्षी एक ते अर्ध्या एकरात कारल्याचे पीक घेतात. त्यासाठी मेमध्ये लागवड केली जाते. जुलैनंतर ही कारली बाजारपेठेत विक्रीला अाली तर चांगला दर मिळण्याची शक्यता वाढते. अर्थात दरांचे केव्हाच खरे नसल्याचा अनुभवही चतरकर यांनी घेतला आहे. मागील दोन वर्षांत किलोला ३० रुपये दरांवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. 

सर्व काही अनुकूल राहिले तर एकरी काही लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. उत्पादन खर्च एकरी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत असतो. 

लसूण, कांदा बीजोत्पादन 
कांद्याची शेती करताना त्याच्या बीजोत्पादनाकडेही लक्ष पुरविले. मागील रब्बीत सुमारे तीन एकरांत त्याचे बीजोत्पादन घेतले. खासगी कंपनीसोबत २५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने करार केला होता. संपूर्ण क्षेत्रातून पाच क्विंटल उत्पादन मिळाले. पावणेदोन लाख रुपये मिळाले. अर्ध्या एकरात लसणाचीही लागवड केली होती. त्यातून १० क्विंटल उत्पादन मिळाले. किलोला ३५ रुपये दराने विक्री केली.            

अार्थिक सक्षमतेसाठी नियोजन 
कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जातातच. कापसाचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते तर सोयाबीनचा उतारा ५ ते ७ क्विंटल अाहे. पूर्वीपेक्षा उत्पादनात वाढ केली आहे. सिंचनाच्या सोयी निर्माण केल्याने हे शक्य झाले. वाढत्या खर्चामुळे शेती जास्तीत जास्त फायदेशीर कशी करता येईल याचा विचार चतरकर यांनी केला. यासाठी केवळ एकाच पिकावर अवलंबून राहणे सोडले. यामुळेच अाता आपल्या १५ एकर शेतीत लसूण, कांदा बीजोत्पादन, कारली, कपाशी, लिंबू, गंगाफळ अशी विविध पिके उभी असलेली दिसतात. 

मुलांना दिले उच्चशिक्षण 
पुरुषोत्तम यांचे सातवीपर्यंतच शिक्षण झाले अाहे. त्यांना सामाजिक कार्यात अावड असल्याने गावचे नेतृत्व करण्याची संधी सुद्धा मिळाली. आता राजकारणापेक्षा शेतीतच पूर्ण काळ व्यतीत करणे त्यांना आवडते. शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले. मुलगा अाता मुंबईत नोकरी करून स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. मुलीचे लग्नही अत्यंत थाटामाटात केले. हा खर्च देखील शेतीच्या उत्पन्नातूनच करणे शक्य झाल्याचे ते सांगतात. 

कृषी प्रदर्शनातून मिळवले ज्ञान
शेती करताना नवीन तंत्र शिकण्याची चतरकर यांना अावड अाहे. यामुळे ते कृषी प्रदर्शनांना अावर्जून हजेरी लावतात. त्यातून अाधुनिक तंत्रज्ञान, यंत्रांची माहिती घेत अापल्याकडील पीकपद्धतीच्या गरजेनुसार त्याचा वापर ते करतात. यंदा विजेच्या समस्येवर मार्ग काढण्याच्या दृष्टीने सौरपंप यंत्रणा त्यांनी बसविली आहे. शासनाच्या ९५ टक्के अनुदानातून पाच अश्वशक्तीचा सौरपंप घेतला. त्यााधारे  सिंचन करणे सोपे झाले अाहे. 

शेतकरी गटातही सक्रिय
कापशी गावातील ११ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी विभागाच्या अात्मा योजनेंतर्गत स्वयं गणेश शेतकरी उत्पादक गटाची स्थापना केली अाहे. त्यामध्ये चतरकर सक्रिय सदस्य अाहेत. या व्यतिरिक्त ते ‘अात्मा’ यंत्रणेच्या तालुका सल्लागार समितीचे सदस्यही राहिले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक सु. ल. बाविस्कर, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, अात्माचे तालुका व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना   लाभते. 

पुरुषोत्तम चतरकर, ८३७८९९३६४५ 

Web Title: agrowon news farmer agriculture