मुगाचा एकरी ५० किलो ते एक क्विंटल उतारा

मुगाचा एकरी ५० किलो ते एक क्विंटल उतारा

जिल्ह्यातील पीकपरिस्थितीचा अाढावा घेतला असता जिल्हाभर सर्वत्र पीकपरिस्थिती समाधानकारक नसल्याची वस्तुस्थिती समोर अाली. जिल्ह्याचे अर्थकारण हे खरीप हंगामावर व त्यातही या हंगामातील सोयाबीन अाणि कापूस या प्रमुख पिकावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना नेमका याच पिकांनी मागील तीन हंगामांत दगा दिला. गेल्यावर्षी सोयाबीनने कसेतरी तारले पण बाजारात ३००० हजारांपेक्षा अधिक भाव सोयाबीनला कधीच मिळालेला नाही. कापसाचे भाव पाच हजारांवर टिकून होते तर उत्पादकता नव्हती. 

अाता यावर्षाचा हंगाम सुरू झाला तर तोही समाधानकारक नाही. पावसाच्या लहरीपणामुळे अाधीच जिल्ह्यातील सुमारे साडेसतरा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झालेली नाही. प्रामुख्याने अकोट, मूर्तिजापूर या दोन तालुक्यांमध्येच साडेचौदा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पेरता अालेले नाही.   

पाऊस अाल्याचे समाधान 
मंगळवारी विविध भागांत चांगला पाऊस झाला. हा पाऊस खरिपातील मूग, उडदासाठी पोषक नसला तरी सोयाबीन, कापूस पिकाला तसेच अागामी रब्बीसाठी फायदेशीर ठरेल असे संजय तायडे म्हणाले.  या महिन्यात गेल्या तीन दिवसांत पाऊस सक्रिय झाला. त्यापूर्वी जवळपास २० दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस गायब होता. आता तीन दिवसांतच अनेक ठिकाणी ५० मिलीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्याच्या एकूण सरासरीत थोडी सुधारणा झालेली दिसते. तरीही या हंगामात अपेक्षित पावसाच्या तुलनेत सुमारे १५० मिलिमीटर पावसाची तूट कायम आहे.

पावसाळ्यातच पाणीटंचाई 
कमी पावसामुळे पिकांसोबतच पाणी समस्याही गंभीर बनली. जोमदार पावसाअभावी प्रकल्प भरू शकले नाहीत. खारपान पट्ट्यातील गावांच्या नळयोजना प्रकल्पांवर आधारित असून भविष्याची चिंता पाहता आतापासून कुठे आठदिवसा आड तर कुठे दहा दिवसांनी नळाद्वारे पाणी दिले जात आहे. आता पावसाच्या शेवटच्या महिन्यात प्रकल्पांची स्थिती सुधारली तर ठिक राहील अन्यथा जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीनंतर तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. सोबतच रब्बी हंगामाची स्थितीसुद्धा बिघडण्याची शक्यता  आहे. 

तातडीने पंचनामे होण्याची गरज 
शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक उगवले नाही. अाता पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटलेली अाहे. यंत्रणांकडून तातडीने याचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकरी करीत अाहेत. मात्र अद्याप त्यांचा अावाज ना लोकप्रतिनिधींनी एेकला ना प्रशासनाने. जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी काही राजकीय पक्षांनी सर्वेक्षणाची तसेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारी निवेदने दिली.  

मी दरवर्षी सोयाबीनची पेरणी करीत होतो. मात्र, दिवसेंदिवस सोयाबीनच्या भावात होणारी घसरण पाहता तसेच खर्च वाढत असल्याने मी यावर्षी उडीद पेरण्याचा निर्णय घेतला. उडदाला फुले लागली पण वेळेवर पाऊस न आल्याने संपूर्ण फुले गळून पडली. आता कापणी करणेही महागात पडेल. माझ्यासारखी अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण पिकांचे पंचनामे करून मदत देण्यात यावी.
- रामकृष्ण सोनटक्के, शेतकरी, देगाव, ता. बाळापूर.

सोयाबीन एेवजी मी उडदाची पेरणी केली. मात्र या पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने उत्पादनात पन्नास ते साठ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किती पीक होईल हे सांगता येत नाही. 
- रवींद्र म्हैसने, शेतकरी, देगाव, ता. बाळापूर.  

अाम्ही यावर्षी चार एकरांत मूग व उडदाची पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने वाढ झाली नाही. नंतर पाऊस अाला तरी त्याला उशीर झाल्याने फुले धरली नव्हती. ही स्थिती पाहता पीक वखरून टाकले. अाता रब्बीसाठी तयारी करावी लागेल. 
- संजय तायडे, सांगळूद, जि. अकोला.  

केवळ ३२ टक्के पीक कर्जवाटप
या हंगामासाठी जिल्ह्यात ११४० कोटींचे उद्दीष्ट ठेवण्यात अाले होते. मागील अाठवड्यापर्यंत यापैकी केवळ ३२ टक्के पीककर्ज वाटप झाले. ३८० कोटी ३१ लाख रुपये एवढे कर्ज ४५ हजार ४२९ शेतकऱ्यांना देण्यात अाले. यात सर्वाधिक २५० कोटींचे पिककर्ज अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३३ हजार ३३५ शेतकऱ्यांना दिले. उर्वरीत १३० कोटी हे राष्ट्रीयकृत, ग्रामीण व इतर बँकांनी वितरीत केले.    

दृष्टिक्षेपात पिकांची स्थिती 
मूग-उडीद - पावसाने दडी मारल्याचा सर्वाधिक फटका या कमी कालावधीच्या पिकांना बसला. वाढ अाणि फुलोरावस्थेत पाणी न मिळाल्याने झाडावर शेंगांची संख्या अत्यल्प होती. अनेकांना मुगाचा उतारा एकरी ५० किलोपासून तर दोन क्विंटलपर्यंत येत अाहे. उडदाचा हंगाम येत्या काळात सुरू होईल. त्याचीही फारशी शक्यता दिसत नाही. त्यातच मूग अाणि उडदाच्या पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव झाला होता.
सोयाबीन - जिल्ह्यात या हंगामात सुमारे दोन लाख ११८७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली अाहे. सध्या सोयाबीन बहुतांश भागात वाढ व फुलोरावस्थेत व काही ठिकाणी शेंगा परिपक्व होण्याच्या स्थिती अाहे. या मोसमात तीन वेळा पावसात खंड पडल्याने सोयाबीनचे उत्पादन घटणार हे निश्चित झालेले अहे.

कापूस  - जिल्ह्यात कापसाचे पीक वाढीच्या अवस्थेत अाहे. बागायती कापसाला बोंड्या धरल्या असून सध्या किडींचा हल्ला वाढलेला अाहे. महागडी अौषधे फवारूनही किडीवर नियंत्रण मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या अाठवड्यात झालेला पाऊस कपाशीसाठी दिलासा देणारा ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com