`शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज`

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरणाचा अधिकाधिक वापर करणे काळाची गरज बनली आहे. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना आधुनिक अवजारांचे वाटप करण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी शनिवारी (ता. १) दिली. 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने शनिवारी कृषी दिन साजरा करण्यात आला. या समारंभात जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी गटांचा देवकाते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार आदी उपस्थित होते. 

देवकाते म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे. याउलट उत्पन्नात फारशी वाढ होताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेती व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे. परिणामी त्यातूनच शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे टाळण्यासाठी शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. यासाठी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे.’’ 

यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी कांदा चाळ, शेततळे निर्मिती आणि हरितगृहांच्या उभारणीसाठी खर्च केला जाणार आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इंगळे यांनी केले. 

या वेळी वळसे पाटील, पवार, काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. खैरनार यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात ‘आत्मा’अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

Web Title: agrowon news farmer Modern technology