फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

हंगामानुसार उपलब्ध फळे अाणि भाज्यांपासून टोमॅटो केचअप, लोणचे, टुटी फ्रूटी असे विविध टिकाऊ पदार्थ बनवून चांगला लघुउद्योग स्थापन करता येतो. हे पदार्थ घरच्याघरी सहज तयार करता येतात. 

टोमॅटो केचअप 
साहित्य - टोमॅटो १ किलो, कांदा १ (मोठा), गाजर किंवा भोपळा १५० ग्रॅम, साखर ९० ग्रॅम, लसूण ४ पाकळ्या, व्हिनेगार ५० मिली, मीठ १० ग्रॅम (चवीपुरते), दालचिनी ५ ग्रॅम, काळी मिरी ५ ग्रॅम, लवंग ५ ग्रॅम, मोठी इलायची २ ग्रॅम, लाल मिरची पावडर ५ ग्रॅम (इच्छेप्रमाणे), सोडियम बेंझाईट पाव चहाचा चमचा, आले ५ ग्रॅम

कृती - ताजे, रसाळ लाल रंगाचे टोमॅटो निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. गाजर, भोपळ्याची साल काढून किसून घ्यावी. टोमॅटो, कांदे, आले, लसूण निर्जंतुक सुरीने बारीक कापून घ्यावेत. त्यामध्ये किसलेले गाजर किंवा भोपळा घालून एकत्र मऊ शिजवावे. पुरणयंत्र किंवा मिक्‍सरमधून या मिश्रणाचा गर काढावा. मिठाव्यतिरिक्त सर्व गरम मसाले हे पावडर करून पातळ कपड्यात बांधून पुरचुंडी करावी. मिक्‍सरमधून काढलेला गर आचेवर ठेवून त्यात पुरचुंडी ठेवावी व नंतर त्यात साखर घालावी. गर दोन तृतीयांश (६६ टक्के), एवढ्या प्रमाणात येईपर्यंत शिजवून आटवावा. आटवलेल्या गरामध्ये मीठ व व्हिनेगार घालून पुन्हा मिश्रण एकतृतीयांश (३३ टक्के) एवढ्या प्रमाणात आटवावे. सोडियम बेंझाईट घालून निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये केचअप भरून सीलबंद करून कोरड्या व थंड जागी संग्रहित करावे.

मिश्र भाज्यांचे लोणचे
साहित्य - फुलकोबी १ किलो, गाजर ५०० ग्रॅम, श्रावण घेवडा २५० ग्रॅम, हिरवे मटर २५० ग्रॅम, तेल २५० मिली, मोहरी डाळ २०० ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, मेथी दाणा १५ ग्रॅम, हिरव्या मिरच्या ५० ग्रॅम, तिखट १०० ग्रॅम, मीठ १५० ते २०० ग्रॅम, लिंबाचा रस १० ग्रॅम, हळद ५ ग्रॅम.

कृती - कोबी, गाजर स्वच्छ धुवून चिरावेत. मटर सोलावेत. तीन दिवस मिठाच्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवाव्यात. दररोज पाणी बदलावे. तिसऱ्या दिवशी भाज्या पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यावर पसरून ठेवाव्यात. पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत वाळवाव्यात. पंख्याखाली ठेवल्यास ७-८ तासांत जलांश निघून जातो. थोड्याशा तेलात (अर्धा चहाचा चमचा) हिंग व मेथी तळून घ्यावी व वेगळी पूड करावी. नंतर सर्व मसाला (तिखट, मीठ, हळद, हिंग, मोहरी डाळ, मेथीपूड) भाज्यात मिसळावा तसेच लिंब रसही मिसळावा. तेल गरम करून थंड करून मिसळावे.

लिंबू लोणचे 
साहित्य - लिंबू - २५ नग, मीठ - १ वाटी, साखर - ३ ते ४ वाटी
कृती - सर्वप्रथम लिंबू स्वच्छ धुवून घेऊन नंतर उकळत्या पाण्यात घालून अर्धा तास बुडवून ठेवावेत. लिंबाच्या चार फोडी करून नंतर मिक्‍सरमधून बारीक करताना साखर, मीठ व चवीपुरते तिखट घालून मिक्‍सरमधून बारीक करून नंतर पॅकिंग करावेत.

टुटी फ्रुटी 
साहित्य - पपईचे तुकडे १ किलो, साखर १ किलो, सायट्रिक ॲसिड १ चमचा, चुना ४ चमचा, पाणी (चुना द्रावणासाठी) अर्धा लिटर, पाणी (पाकासाठी) १.७५ लिटर, रंग आवडीनुसार.

कृती - कच्च्या पपईची साल व बिया काढून पपईचे लहान चौकोनी तुकडे करावेत. चुना व पाणी एकत्र करून त्यातच पपईचे तुकडे १ ते २ तास ठेवावेत. नंतर २ ते ३ वेळा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. पपईची तुकडे मलमलच्या कपड्यात बांधून उकळत्या पाण्यात ३ ते ५ मिनिटे वाफेवर ब्लांच करून घ्यावेत व ताबडतोब थंड पाण्यात बुडवून ठेवावेत. साखरेचा एक तारी पाक करून गाळून घ्यावा व त्यात पपईचे तुकडे मिसळावेत. दुसऱ्या दिवशी पाकातून तुकडे वेगळे काढून घ्यावेत व पाक दोनतारी तयार होईपर्यंत उकळावा. पाक गाळून त्यामध्ये पपईचे तुकडे मिसळावेत. तिसऱ्या दिवशी तुकडे पाकातून वेगळे काढून पाक पक्का होईपर्यंत उकळावा व त्यामध्ये सायट्रीक आम्ल मिसळावे. पाक गाळून घ्यावा व पाक थोडा थंड झाल्यावर त्यात रंग मिसळून पपईचे तुकडे घालावेत व हे मिश्रण दोन-तीन दिवस असेच ठेवावे. तुकडे पाकातून काढून वाळवून निर्जंतुक कोरड्या बरणीत भरून थंड जागी ठेवावे.

टीप - सर्वसाधारण तापमानाला वरिल पदार्थ ६ महिने टिकतात. फ्रिजमध्ये ठेवल्यास  १ वर्षापर्यंत टिकतात.
 - ०२४०२ - ३७६५५८  
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news Fruits Vegetable Processing Industry