सुयोग्य गोठ्यामुळे वाढते  शेळ्यांची उत्पादनक्षमता

डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

गोठ्याचे प्रमुख दोन भाग असावेत.  
एका भागाला सावलीसाठी छप्पर असावे. दुसरा भाग त्याला जोडूनच पण छपराशिवाय असावा. दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा किमान दुप्पट तरी मोठा असावा. गोठा फार खर्चिक असू नये. स्थानिकरीत्या मिळणाऱ्या वस्तू वापरून अल्प खर्चात सुयोग्य गोठा उभारता येतो. 

गोठ्याचे प्रमुख दोन भाग असावेत.  
एका भागाला सावलीसाठी छप्पर असावे. दुसरा भाग त्याला जोडूनच पण छपराशिवाय असावा. दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा किमान दुप्पट तरी मोठा असावा. गोठा फार खर्चिक असू नये. स्थानिकरीत्या मिळणाऱ्या वस्तू वापरून अल्प खर्चात सुयोग्य गोठा उभारता येतो. 

गोठ्यातील जमीन 
गोठ्यातील जमीन साधारणतः ०.५ टक्के उतार ठेवून, मुरूम पसरून नीट चोपून घ्यावी. जमीन दररोज झाडून स्वच्छ करावी. 
वर्षातून २-३ वेळेस मुरूम उकरून काढावा व  मुरूमामध्ये ३ टक्के कळीचा चुना मिसळून पसरून टाकावा व पुनः चोपून घ्यावे. 
शेडमधील जमीन ही लवकर कोरडी होणारी, न घसरणारी, मलमूत्र शोषणारी असावी व जमिनीवर चुना भुरभुरावा. चुना खुरांच्या निर्जंतुकीकरणाची काम करतो. 

शेळीच्या अवस्थेनुसार  जागेचे व्यवस्थापन 
एका शेडमध्ये एका वेळी शास्त्रानुसार जास्तीत जास्त ६० प्रौढ शेळ्या, ८ ते १० गाभण शेळ्या, २० ते २५ करडे व १ बोकड असावा. 
प्रत्येक शेळीच्या अवस्थेनुसार वेगळे दालन असावे. उदाहरणार्थ गाभण शेळ्या, वीलेल्या शेळ्या, भाकड शेळ्या, पैदाशीचा बोकड, खच्चीकरण केलेला बोकड, ३ ते ६ महिन्यांचा नर आणि मादी पिल्ले वेगळी असावीत. त्यामुळे गोठ्याचे व्यवस्थापन सोपे होते. 
आजारी शेळ्या, खाद्य साठवण जागा, चाफ कटर मशिनची जागा, कामगारांची राहण्याची सोय इत्यादी साठी वेगळी दालने असावीत. शेळ्यांच्या शेडच्या शेजारी कामगारांची राहण्याची सोय असल्यास व्यवस्थापन सोपे होते. कप्प्यासाठी चेनलिंक जाळी किफायतशीर आहे. 
बोकडाच्या शिंगांच्या मुळाशी असलेल्या ग्रंथीतून पाझरणाऱ्या स्रावामुळे बोकडांच्या अंगाला उग्र वास येतो. हा वास शेळीच्या दुधाला लागतो म्हणून बोकडांसाठी गोठ्यामघ्ये स्वतंत्र जागा असावी. त्यामुळे बोकडामुळे होणारा अनावश्‍यक संकर टाळता येतो, शेळ्यांना त्रासही होत नाही. बोकडाचे खाद्यव्यवस्थापनही योग्य प्रकारे करता येते. 

खाद्य आणि पाण्याची व्यवस्था 
चारा, खाद्य घालण्यासाठी छप्पर असलेल्या भागात गव्हाण आणि पिण्याच्या पाण्यासाठी टाकी अथवा तत्सम सोय असावी. 
गव्हाणीची रुंदी एक ते सव्वा फूट, उंची शेळीच्या छातीपर्यंत म्हणजेच दीड फूट, गव्हाणीची खोली व लांबी दर शेळीस एक फूट याप्रमाणे ठेवावी. 
गव्हाणीत आणि पाण्याच्या टाकीत शेळ्या - करडे यांनी पाय घालू नये व चारा वाया जाऊ नये, यासाठी शेळ्यांचे केवळ तोंड जाईल अशा प्रकारे गव्हाणीचा निर्बंध पट्ट्या असाव्यात. 
शेळ्यांना पिण्यासाठी २४ तास स्वच्छ पाणी पुरवावे. पाण्यासाठी लागणारी जागा ही करडाला ३-५ सें.मी, प्रौढ शेळ्यांसाठी ४-६ सें. मी एवढी असावी. 

गोठ्याचे छत 
छत शक्‍यतो कमी तापणाऱ्या वस्तूचे असावे. उष्ण वातावरणात सिमेंटचा पत्रा, किंवा कौलारू, A आकाराचे किंवा अर्धगोलाकार असावे. 
जास्त पावसाच्या प्रदेशात छताचा पत्रा दोन्ही बाजूच्या भिंतीवरून थोडा पुढे सोडल्यास (overhang) तिरका येणारा पाऊस, अनावश्‍यक ऊन यापासून शेळ्यांचे संरक्षण करता येतो. 
गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी छताला छिद्र असावीत. 
छताची मधील उंची साधारण १२ फूट व बाजूची उंची ८ फूट असावी. 
पावसाळ्यात शेळ्यांना बसण्यासाठी लाकडाचे मचाण तयार करावे. 
जास्त पाऊस असेल तर जमिनीपासून १ ते १.५ मीटर इतकी उंची वाढवून फळीचा किंवा बांबूचा फ्लोअर बनवता येतो. 

इतर महत्त्वाच्या बाबी 
गोठ्यामधील तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस असावे. 
गोठ्यामधील हवा खेळती असावी जेणेकरून मलमूत्रातील अमोनिया व नायट्रोजन वायूमुळे होणारे आजार टळतील. 
गोठ्याच्या चारही बाजूंनी भिंत बांधायची असेल तर ती साधारण १ मीटर उंच असावी. 
जास्त वारा येणाऱ्या आणि पावसाच्या बाजूने भिंत पूर्ण बांधावी. 
नवीन आणलेल्या शेळ्या मुख्य कळपात न ठेवता १५ ते २१ दिवस वेगळ्या ठेवून निरोगी असतील तर कळपात मिसळाव्यात. ही खबरदारी अत्यंत आवश्‍यक आहे. 
गोठ्यामध्ये शेळ्यांना मोकळे ठेवावे. फिरत राहिल्यामुळे आपोआप व्यायाम घडेल. 

Web Title: agrowon news goat

टॅग्स