ग्राम स्वच्छता, शेती विकासावर दिला भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नागपूर येथे झालेल्या ‘ॲग्रोवन’ सरपंच महापरिषदेत मी सहभागी झालो होतो. या परिषदेमुळे मला ग्राम विकासाची नवी दिशा मिळाली. विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शामुळे ग्राम विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हे समजले. त्यानुसार आम्ही ग्रामविकासाचा आराखडा तयार केला. 

नागपूर येथे झालेल्या ‘ॲग्रोवन’ सरपंच महापरिषदेत मी सहभागी झालो होतो. या परिषदेमुळे मला ग्राम विकासाची नवी दिशा मिळाली. विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शामुळे ग्राम विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हे समजले. त्यानुसार आम्ही ग्रामविकासाचा आराखडा तयार केला. 

गाव तसेच गावठाणातील अतिक्रमण लोकसहभागातून हटवून रस्ते मोकळे केले. गावातील युवक व महिला बचत गटांच्या सहकार्याने स्व. विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविले. जयपूर आणि जनुना या दोन्ही गावांचा समावेश २०१७-१८ च्या जलयुक्त शिवार योजनेच्या आराखड्यात करण्यात आला आहे. जयपूर व जनुना गावातील अंगणवाडी इमारतीची कामे प्रस्तावित केलेली आहेत. ग्रामपंचायत भवन, दलित वस्ती पोच रस्ता, दलित वस्ती सभामंडप आणि मुस्लिम बांधवांसाठी शादिखाना हॉल प्रस्तावित आहे. विविध विकास कामे, पांदण रस्ते लोकसहभागातून सुरू आहेत. गावातील पाणीपुरवठा योजनेची नव्याने आखणी करीत आहोत. त्यामुळे येत्या काळात गावकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल.

गावातील १०८ लाभार्थ्यांच्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. यासाठी शासकीय अनुदान वाटप केले. काही लाभार्थ्यांना घरी शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करीत अाहोत. नागरिक अाता स्वयंस्फूर्तीने शौचालय बांधकाम पूर्ण करून गावाच्या स्वच्छतेला हातभार लावत आहेत. गावामध्ये व्यायामशाळा इमारत बांधकाम हाती घेतले. हे काम अंतिम टप्प्यात अाहे. मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिराचे बांधकाम सुरू केले.

जल-मृद संधारणावर भर
गावशिवारात आम्ही येत्यावर्षी जल-मृद संधारणाच्या कामाची आखणी केली आहे. शासनाच्या योजनेतून शेती बांध व्यवस्थित करून घेतले आहेत. त्यामुळे पडणारा पाऊस जमिनीत मुरून पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहेत. गावशिवारात तीस शेततळी शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर खोदली आहेत. आमच्या गावात कापूस, तूर, सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. या पिकातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही कृषी विभागात तसेच कृषी निविष्ठा कंपन्यांच्या सहकार्याने शिवारफेरीचे आयोजन करतो. याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे. गावकरी तसेच या भागाचे अामदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या सहकार्याने भविष्यात गाव विकासाच्या विविध योजना राबविण्याची आखणी केलेली आहे. 

 विक्रम देशमुख  ९६८९७१८९१०

Web Title: agrowon news gram vikas