कोल्हापुरात हिरवी मिरची, मटार तेजीत

कोल्हापुरात हिरवी मिरची, मटार तेजीत

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर मिळाला. 

बाजार समितीत वांग्याची दोनशे तीस करंड्या आवक झाली. वांग्यास दहा किलोस  १०० ते २८० रुपये दर होता. गेल्या दोन महिन्यांपासून वांग्याचे वाढलेले दर अपवाद वगळता कायम होते. गेल्या आठ दिवसांपासून वातावरण काहीसे निरभ्र झाल्याने भाजीपाला उत्पादकांच्यात काहीसे समाधान पसरले आहे. वातावरणात बदल झाला असला तरी अद्याप उष्णता कायम असल्याने भाजीपाल्यावरील कीड कमी होत नसल्याची माहिती भाजीपाला उत्पादकांनी दिली. ढोबळी मिरचीच्या आवकेतही अनियमिता आहे. ढोबळी मिरचीची दररोज दोनशे ते अडीचशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. इतर बहुतांशी भाजीपाल्याचे दर दहा किलोस १०० ते २०० रुपये इतका राहिला. 

कोथिंबिरीच्या आवकेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढ झाल्याचे चित्र होते. कोथिंबिरीची दररोज वीस ते पंचवीस हजार पेंढ्या आवक झाली. परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी तातडीने कोथिंबिरीची लागवड केली. यामुळे ही कोथिंबीर आता बाजार समितीत येत आहे. यामुळे कोथिंबिरीचे दर तेजीत स्थिर राहू शकत नसल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. या सप्ताहात कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही मोठी वाढ झाली. मेथीची आवकही दहा हजार पेंढ्यांच्या वर सातत्याने राहिली. मेथीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. 

सांगली भागातून अर्ली द्राक्षाच्या आवकेत सुरवात झाली आहे. ही आवक नियमित नसली तरी एक दोन दिवसाआड तीस ते पन्नास बॉक्‍स द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षास किलोस ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. येत्या पंधरवड्यात द्राक्षाच्या आवकेत चांगली वाढ होण्याची शक्‍यता फळबाजाराच्या सूत्रांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com