पेरू, सीताफळ, पपईवर आधारित फळबाग पॅटर्न

पेरू, सीताफळ, पपईवर आधारित फळबाग पॅटर्न

प्रयोगशील वडिलांचा आदर्श कायम ठेवत हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार आपल्या १४ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळले आहे. पेरू व सीताफळ ही मुख्य पिके व त्यात पपईचे आंतरपीक ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. जोडीला थायलंडचा पेरू व लिंबू यांचाही प्रयोग करीत नव्या पिकाच्या वाटा चोखाळल्या आहेत. 

हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार यांची सुमारे १० किलोमीटरवरील मांडवघोराड शिवारात १४ एकर शेती आहे. नागपूरच्या बुटीबोरी भागात त्यांचे किराणा दुकानही आहे. मात्र शेतीची पहिल्यापासून आवड व त्यातही वडील मोहनलालजी यांचा शेतीचा वारसा त्यांना मिळाला आहे. पूर्वी संत्रा, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर यासारखी पिके घेतली जायची. मोहनलालजींनी शेती व्यवस्थापनात आदर्श जपला होता. सन १९७२ मध्ये वसंतराव नाईक यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या उद्यानविद्या विभागातील पहिल्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. वडिलांचाच हाच प्रयोगशीलतेचा वारसा विठ्ठलदास यांनी पुढे जपला.

अभ्यास दौऱ्यातून मिळाली दृष्टी 
सन २०११ च्या दरम्यान कुटुंबासह अष्टविनायक दर्शनासाठी विठ्ठलदास गेले असता या भागातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागांना त्यांनी भेटी दिल्या. यात बारामती येथील गोविंद बागेचा समावेश होता. तेथील व्यवस्थापनाचे बारकावे जाणून घेत त्याच धर्तीवर आपल्या शेती पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 

चौदा एकरांतील शेतीचे व्यवस्थापन
मणियार यांनी आज फळबाग केंद्रित शेतीवर भर दिला आहे. आपल्या १४ एकरांत त्यांनी पेरू, सीताफळ व पपई हीच पिके ठेवली आहेत. यात पेरू व सीताफळात पपईचे आंतरपीक घेतले जाते. 

पेरू- इलाहाबाद सफेदा, ललीत आणि श्‍वेता या जाती आहेत. ‘क्‍लस्टर’ नसल्याचे कारण सांगत कृषी विभागाकडून या बागेला अनुदान नाकारण्यात आले. परंतु, त्या मागे न लागता फळबाग लागवडीचा आपला उद्देश साधला. पेरुची लागवड २०११ च्या दरम्यानची आहे. आठ बाय पाच फूट लागवड अंतरातील या पेरूची सुमारे १५०० झाडे आहेत. शक्यतो एकच बहार घेतला जातो. विक्री थेट व्यापाऱ्यांना होते. ग्राहकांकडूनही पेरुला मागणी राहते. दर सरासरी १७ ते २५ रुपयांपर्यंत मिळतो. दरवर्षी छाटणीवर भर राहतो.  

सीताफळाचा ब्रँड
सन २०१२ च्या दरम्यान सरस्वती-७ जातीच्या सिताफळाची लागवड केली. जुन्या बागेचे लागवड अंतर   ८ बाय ५ फूट तर बाळानगर जातीच्या नव्या एक एकरांचे लागवड अंतर १२ बाय १० फूट  आहे. 

सघन पद्धतीने लागवडीचा प्रयोग केला असून या भागातील अशी ही एकमेव बाग असल्याची शक्यता मणीयार यांनी बोलून दाखवली. तंत्रशुद्ध पद्धतीने बागेचे व्यवस्थापन होते. या बागेला सीताफळ महासंघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.

उत्पादन 
गेल्यावर्षी हंगामात सुमारे २७ हजार फळांचे उत्पादन त्यांनी घेतले. वडिलांकडूनच फळबागेचे धडे मिळाल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्याच नावाने मोहन सीताफळ नावाचा ब्रॅण्ड विकसीत केला आहे. याच नावाने पॅकिंग करून अल्पावधीतच गुणवत्तेच्या बळावर त्यास बाजारपेठ मिळविण्यातही मणियार यांना यश मिळाले आहे. दोन ते अडीच किलोचा बॉक्‍स तयार केला जातो. त्यास गुणवत्तेनुसार १५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. साधारण २५० ग्रॅम ते कमाल एक किलो वजनापर्यंत फळे मिळतात.  

पपईचा प्रयोग 
पेरू आणि सीताफळ बागेत पपई लागवड केली जाते. या पिकाचा सुमारे सात- आठ वर्षांचा अनुभव आहे. पपई पक्व झाल्यानंतर विकण्याअैवजी कच्ची म्हणूनच विकली जाते. या पपईचा फराळी चिवड्यात वापर केला जातो. भाजी म्हणूनही तिला मागणी आहे. हीच संधी मणियार यांनी शोधली. किलोला १५ रुपये सरासरी दर कच्च्या पपईला मिळतो. कळमणा (नागपूर)  येथील बाजार समितीत कच्च्या पपईचे खरेदीदार असल्याचे ते सांगतात.

बहूविध फळबाग
फळपीक आधारित शेतीवर लक्ष केंद्रित करीत थायलंड जातीच्या लिंबांचाही प्रयोग केला आहे. त्याची सातशे झाडे तर थाई पेरूचीही झाडे लावली आहेत. इस्रायली तंत्रज्ञानानुसार संत्र्याची ४०० रोपे लावली आहेत. संत्र्याची बेडवर लागवड आहे. गरजेनुसार फळपिकांत सधन लागवड पद्धतीचा अवलंब केला. 

वांगी पिकात सातत्य
एक ते अर्धा एकरात रोटेशन पद्धतीने वर्षभर वांगी घेतली जातात. वांग्याला वर्षभर मागणी राहते. किमान १० रुपये प्रति किलोचा दर मिळतो. आठवड्यातील दोन दिवस गावातील शेतकऱ्यांचा भाजीपाला बाजारात पाठवला जातो. त्याच गाडीतून आपला माल मणीयार बाजारात पाठवितात. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होते. 
- विठ्ठलदास मणियार, ९८२२७१६८८२

मणियार यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
पारंपरिक पिकांऐवजी फळ व भाजीपाला पीक पद्धतीवर भर.
संपूर्ण १४ एकर शेती ठिबकखाली. शेतीसाठी दोन विहिरींचा पर्याय.  
फळबाग तणविरहीत ठेवण्याला प्राधान्य.
इस्रायली पद्धतीने संत्रा लागवड व त्यात शेवगा
केंद्रीय कापूस संशोधन संस्था व लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन संस्थेकडून मार्गदर्शन 
पाच ते सहा गायी (जर्सी व गावरान). दररोज एकूण सुमारे १६ ते १८ लिटर दूध मिळते. पंधरा लिटर दुधाची डेअरीला २४ रुपये प्रति लिटर दराने विक्री.

ॲग्रोवनची प्रेरणा
दैनंदिन शेती व्यवस्थापनात ॲग्रोवन हा सच्चा मार्गदर्शक ठरल्याचे मणीयार सांगतात. राज्यातील फळपीक उत्पादकांच्या व्यवस्थापनातील बारकावे यशोगाथांच्या माध्यमातून जाणून त्यानुसार शेती व्यवस्थापनात बदल करतो असे ते म्हणतात.  

दररोजची सकाळ शिवारात
दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत मणियार शेतात वावरतात. त्यानंतर ते आपला किराणा व्यवसाय सांभाळतात. शनिवारी बाजार बंद राहतो. त्या दिवशी ते दिवसभर शेतातच असतात. 

ठिबकद्वारे शेणस्लरी   
सेंद्रिय किंवा शेणस्लरी ठिबकमधून देणारे सयंत्र त्यांनी नगर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी सुभाष तनपुरे यांच्याकडून विकत घेतले आहे. तनपुरे यांनी त्याची निर्मिती केली आहे. येत्या काळात सेंद्रिय शेतीवर भर दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com