जल-मृद्संधारण, कृषी तंत्रातून ग्रामविकास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

अजित खताळ, सरपंच हिवरे, ता. कोरेगाव, जि. सातारा

अजित खताळ, सरपंच हिवरे, ता. कोरेगाव, जि. सातारा
जळगाव येथे झालेल्या अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत मी सहभागी झालो होतो. ही महापरिषद आमच्या ग्रामविकासाला दिशा देणारी ठरली. आमचे हिवरे हे गाव दुष्काळीपट्ट्यात असल्याने कायम पाणीटंचाई होती. महापरिषेदतून आल्यावर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामविकासाचा आराखडा तयार केला. आराखड्यानुसार विविध कामांची सुरवात केली. लोकसहभाग आणि श्रमदानातून मातीचे लहान-मोठे ३४ बंधारे बांधले. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवत गावात बांधबंदिस्ती केली. गावशिवारात २५,००० मीटर सलग व खोल समतल चरी काढल्या. लोकसहभागातून ओढा जोड प्रकल्प पूर्ण केला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने तनिष्का महिला गट तयार केला आहे. या माध्यमातून गावात बंधाऱ्याचा गाळ काढला.गेल्या पाच वर्षांपासून महिल्यांच्या हस्ते ध्वजावंदन केले जाते.

लोकसहभाग, इन्फोसिस कंपनी आणि आय डब्ल्यू एम पी या योजनेतून सात संगणक, एलसीडी प्रोजक्टर देऊन गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आधुनिक डिजिटल वर्ग तयार केला. शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. गावातील २०० लाभार्थींना सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिवरे ते नलवडेवाडी खिंडीचा रस्ताचे काम सुरू केले आहे. गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना राबवली आहे. आरओ प्लांटच्या माध्यमातून दहा रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी घरपोच केले जाते. ग्रामपंचायत इमारत, सामाजिक सभागृह बांधले आहे. यात्रेनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे अायोजन करण्यात येते.

शेती आणि वनीकरणावर भर 
गावात ४०० एकर वैयक्तिक क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. याचा फायदा डाळिंब, सीताफळ, ऊस लागवडीस झाला आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी परराज्यांत दरवर्षी सहलींचे अायोजन केले जाते. गावालगत असलेल्या वनविभागात ग्रामपंचायत व वनविभागाच्या संयुक्त विद्यमानाने ५५ हजार झांडाची लागवड केली आहे. यातील ८५ टक्के जगवली आहेत. वनविभागात नऊ मोठे बंधारे व २० हेक्टर क्षेत्रावर खोल सलग समतल चरी काढल्या आहेत. गावात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी असून, गेल्या पाच वर्षांपासून वणवा पूर्ण बंद करण्यात आला असल्याने वनग्राम म्हणून गाव घोषित करण्यात आले  आहे. वनविभागाच्या काही अटी व शर्थीवर वनविभागाची ५५० एकर शेत जमीन गावासाठी घेतली आहे. त्यामध्ये आम्ही वनशेती करणार आहोत.

जलसंधारण व मृद्संधारण यशस्वी कामामुळे पाणी फाउंडेशन अयोजित सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचे पहिले प्रशिक्षण सेंटर गावामध्ये सुरू करण्यात आले आहे. यशदातर्फे विविध राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचा एक दिवसाचा अभ्यास दौरा अायोजित करून हिवरे पॅटर्न विविध राज्यात पोचला आहे. 

गायरानात सीताफळाची बाग  
गावाच्या मालकीच्या ३३ एकर गायरान क्षेत्रावर तीन वर्षांपूर्वी ५,५०० सीताफळच्या बाळानगरी जातीच्या रोपांची लागवड केली. या बागेस पाणीपुरवठा होण्यासाठी लोक सहभागातून विहीर खोदली. लोकसहभाग आणि १३ वा वित्त अयोग, पर्यावरण, ग्रामपंचायत स्वनिधीतून बागेस पाइपलाइन केली. पाण्याच्या बचतीसाठी सर्व बागेस ठिबक सिंचन  केले आहे. सीताफळ रोपांची चांगली वाढ झाली आहे. भविष्यात गावामध्ये सीताफळ प्रक्रिया उभारणार आहोत. हा प्रकल्प गावाच्या मालकीचा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. 

अजित खताळ, ८६००११०११३

Web Title: agrowon news jalgaon news agriculture