तंत्रज्ञान, प्रयोगशीलतेतूनच विकास घडविलेले कडेगाव

गुरुवार, 18 जानेवारी 2018

जालना हा उद्योग नगरीचा जिल्हा. याच जिल्ह्यातील कडेगावने शेती उद्योगात प्रयोगशीलता, प्रात्यक्षिक, तंत्रज्ञान, पूरक उद्योगाचा स्वीकार या बाबींमधून आर्थिक उन्नतीचा मार्ग निवडला आहे. कपाशी पिकात पथदर्शक काम केल्यानंतर पोल्ट्री, रेशीम शेती तसेच विविध पिकांच्या सुधारीत वाणांच्या लागवडीतून काळासोबत चालण्याची इथल्या शेतकऱ्यांची धडपड दिसून येते. आपल्या कुटुंबांचे व पर्यायाने गावाचे अर्थकारण उंचावण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

जालना जिल्हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा म्हणूनच अोळखला जातो. याच जिल्ह्यातील कडेगाव या गावाने शेतीत उल्लेखनीय भरारी घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिथे अन्य भागांत कपाशी उत्पादकांना ८ ते १० क्‍विंटलवर समाधान मानावे लागे, तिथे कडेगावच्या नॉन बीटी कपाशी उत्पादकांनी एकरी सुमारे १४ पासून १८ क्‍विंटलपर्यंत तर सरासरी दहा क्‍विंटलपर्यंत उत्पादन घेण्याची किमया एकेकाळी करून दाखविली होती. त्यांच्या या शेती व्यवस्थापनाची दखल देशाबरोबरच परदेशातील तज्ज्ञांनीही घेत कडेगावला भेट दिली होती. या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीची पाहणी केली होती.  

निक्रा प्रकल्पाचा मोठा आधार 
कडेगाव हे तसे उपक्रमशील गाव म्हणूनच अोळखले जाते. आता हेच पाहा. जालना-खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगावात निक्रा प्रकल्प राबविला जातो आहे. अवर्षणप्रवण भागासाठी असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती व पीकपद्धतीत बदल करण्यासह त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पूरक उद्योगाची जोड शेतकऱ्यांना दिली जाते आहे. 

पंचावन्न कुटुंबांना  रेशीम शेतीचा आधार
 मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम रेशीम उद्योगाने केले आहे. कपाशीत चांगले प्राविण्य मिळवलेल्या कडेगावच्या शेतकऱ्यांनी तीन वर्षापासून रेशीम उद्योगाचीही कास धरली आहे. सुमारे २५ शेतकऱ्यांकडे हा उद्योग आहे. त्याला यंदा नव्याने तीस शेतकऱ्यांची जोड मिळाली आहे. वर्षाला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला आहे. 

चौदा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्राची साथ 
जालना येथील कृषी विज्ञान केंद्राची कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनात कडेगावच्या शेतकऱ्यांना तब्बल14 वर्षापासून साथ व तेथील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळते आहे. 

कापूस एकात्मीक कीड व्यवस्थापनासंदर्भातील मार्गदर्शनापासून सुरू झालेले कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य अव्याहतपणे सुरू आहे. कडेगावच्या शेतकऱ्यांची जिद्द चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती आम्हालाही आकर्षित करीत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ  सांगतात. 

प्रगतिशील शेतीची    प्रमुख वैशिष्ट्ये  
     कपाशीची चार बाय दीड किंवा तीन बाय दीड फुटावर लागवड करण्याचा पॅटर्न.  
     कपाशीत एकात्मीक कीड नियंत्रण व्यवस्थापन तसेच लागवडीआधी खतांचा वापर करून त्यांचा कार्यक्षम वापर करण्याचा आदर्श.  
     प्रकाश सापळा नियंत्रणासाठी सुमारे दोनशे प्रात्यक्षिके घेणारं गाव. 
     ‘कॉटन कनेक्‍ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद, वर्धा व यवतमाळ या तीन जिल्ह्यांत शंभरावर गावात कापूस पिकविण्याबाबतचं मार्गदर्शन करण्याची संधी गावातील बाबासाहेब काटकर यांना मिळाली. 

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया 
माझी बारा एकर शेती आहे. मात्र अवर्षणप्रवण स्थितीमुळे शेतीला जोड देण्याशिवाय पर्याय नव्हता. जालना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना कुक्‍कुटपालनाचा उद्योग मिळाला. उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण झाले.
- बद्रीनाथ मोरे, ८५५४०८११११ 

रेशीम उद्योगानं आम्हाला खरं सावरलं. गेल्या वर्षीपासून एकरी काही लाखांपर्यंतची रक्कम हाती येऊ लागली आहे. पाण्याची सोय असल्यानं आता बॅच वाढवणे शक्य झाले आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याला हा उद्योग कारणीभूत ठरतो आहे.  
- प्रतापसिंग मारग, ७८७५४६५४२२, धरमसिंग मारग- ९६३७५८५२५४ 
  
कापूस शेतीला पर्यायी म्हणून रेशीम उद्योगाची निवड केली. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली चोपण जमिनीत तुतीची लागवड यशस्वी करून दाखविली. 
- दत्तू निंबाळकर, ९८९०६०४०९६ 

चौदा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्राने गावात वेगवेगळी शेती प्रात्यक्षिके घेतली. तंत्रज्ञानाशी नाळ जुळविण्यात कृषी विज्ञान केंद्राची सर्वच ‘टीम’ यशस्वी झाली. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे अर्थकारण प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहिले. एकीचे बळ काय असते हे गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे. 
- भीमराव जाधव, सरपंच, कडेगाव, ९१५८३९२४६९ 

तंत्रज्ञान, प्रयोग यांचा स्वीकार करणारे कडेगावचे शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांचा व आमचाही उत्साह वाढवताहेत. त्यांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल झाला आहे.  
 - अजय मिटकरी, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जालना, ७३५००१३१४७

    रेशीम शेतीतील कौशल्य 
 रेशीम शेतीत दोन बॅचमध्ये साधारणपणे दीड ते दोन महिने अंतर पडते. अळ्यांची वाढ पूर्ण झाली की त्या कोषावर धागा टाकण्याची प्रक्रिया सुरू करतात. पुढे चार ते पाच दिवस त्या काहीच खात नाहीत. हे पाच दिवस, धागा काढणी एक दिवस, विक्रीतील तीन ते चार दिवस असे एकूण दहा दिवस व पुन्हा दोन दिवसांनी छाटणीचे काम रेशीम उत्पादक करतात. कडेगावचे रेशीम उत्पादक मात्र अळी कोषांवर धागा टाकण्यास गेली की तुतीच्या छाटणीकडे वळतात. वेळेच्या नियोजनामुळे मधले अंतर दहा ते वीस दिवसांनी वाचते. शिवाय बुंध्यापासून थोड्या वरती छाटणी केल्याने पाणीटंचाईत टिकून राहण्याची क्षमता वाढल्याचे शेतकरी सांगतात. 

   कुक्‍कुटपालन 
गावात प्रत्येकी पाच व्यक्‍तींचा सहभाग असलेली तीन व स्वतंत्र वीस अशी कुक्‍कुटपालनाची सुमारे २३ युनीट्स निर्माण करण्यात आली आहेत. सुरवातीला दोनशे पक्षी प्रत्येक गटाला देण्यात आले होते. जवळपास १६ हजार रुपये खर्चून देण्यात आलेल्या या पक्ष्यांच्या विक्रीपोटी प्रत्येक गटाला सुमारे ३२ हजार रुपये मिळाले. गटातील प्रत्येक सदस्याला या व्यवसायातून चांगले अर्थार्जन मिळण्याची सोय झाली आहे.