जलयुक्तमुळे शिवारे झालीत पाणीदार

जलयुक्तमुळे शिवारे झालीत पाणीदार

बुलडाणा - राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पाणी जिरवण्यात यश अाले अाहे. यामुळे शिवारे पाणीदार झाली अाहेत.  

जलयुक्त शिवार अभियानाने बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने चांगले बाळसे धरले आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३० गावे पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये जलसंधारणाची विविध प्रकारची नऊ हजार १३२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमातून जिल्ह्यात ४५ हजार २७० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे; तसेच ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली; तर २० हजार हेक्टरवर दोन वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली. २०१६-१७ मध्ये  दुसऱ्या टप्प्यात २४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी काढण्यात येऊन गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची कामे होऊ शकतात, याबाबत निश्चितता करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील २४५ गावांमध्ये तीन हजार २९६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ८८ कामे प्रगतिपथावर आहेत. या टप्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून १७ हजार १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे; तसेच सात हजार २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर एका वेळेस संरक्षित सिंचन होणार आहे. त्याचप्रमाणे २०१७-१८ मध्ये तिसऱ्या टप्प्यात १९५ गावे निवडली अाहेत. या गावात करावयाच्या कामांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी ८० गावे यामध्ये प्राधान्याने निवडण्यात आली होती. जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजलच्या कमतरेतुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. भूजलस्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या ८० गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे. सतत बाहेरून पाणी आणून या गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे. या गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी निश्चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला खोलीकरण व रुंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. 

‘जलयुक्त’च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे. या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गाव शिवारात पाणीसाठा जलसंधारणाच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शेतकरी सिंचन करून पिके घेत आहेत. खामगाव तालुक्यातील तोरणा नदीवर निर्माण करण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बांधमुळे अटाळी, आंबेटाकळी, शिर्ला नेमाने व लाखनवाडा परिसरातील शेतकरी दुबार पीक घेत आहेत. 

अवर्षण पट्ट्यामधील भूजल पातळीत वाढ 
मोताळा तालुक्यातील अवर्षण असलेल्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भूजल पातळीत वाढ झाली आहे. खांडवा गाव पाणीदार बनले आहे. या गावातील शिवारात सात साखळी सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे दुष्काळाने होरपळणारे येथील शिवार जलयुक्त बनले आहे. खारपाण पट्ट्यामधील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यांमध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्टची कामे झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानामध्ये पहिल्या दोन टप्प्यांत १२०५ साखळी सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; तसेच ९३८  सिमेंट नालाबांध पूर्ण करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com