वयाच्या ऐंशीतही शेतीत जागविलेली तडप

ज्ञानेश उगले
शुक्रवार, 23 जून 2017

अगदी लहानपणापासून शेती सांभाळणारे नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील नाठेबाबा आज वयाच्या एेंशीमध्ये आहेत. पहाटे पाचला दिवसाची सुरवात करीत १५ एकरांतील द्राक्षांचं व्यवस्थापन ते या वयातही तरुणाच्या तडफेनं सांभाळतात. विविध प्रयोगांद्वारे स्वतःची शेती घडवीत इतरांना मदत केली. आज एकूण शेतीच संकटाच्या गर्तेत असताना नाठेबाबा मात्र सकारात्मक शेतीची ऊर्जा आजच्या पिढीला देत त्यांचे प्रेरक झाले आहेत.

अगदी लहानपणापासून शेती सांभाळणारे नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील नाठेबाबा आज वयाच्या एेंशीमध्ये आहेत. पहाटे पाचला दिवसाची सुरवात करीत १५ एकरांतील द्राक्षांचं व्यवस्थापन ते या वयातही तरुणाच्या तडफेनं सांभाळतात. विविध प्रयोगांद्वारे स्वतःची शेती घडवीत इतरांना मदत केली. आज एकूण शेतीच संकटाच्या गर्तेत असताना नाठेबाबा मात्र सकारात्मक शेतीची ऊर्जा आजच्या पिढीला देत त्यांचे प्रेरक झाले आहेत.

नाठे नाना, नाठे बाबा, चांदोरकर आदी नावांनी कोंडाजी शिवराम नाठे यांची चांदोरीच्या (ता. निफाड, जि. नाशिक) पंचक्रोशीत ओळख आहे. बाबा ऐंशीव्या वयात आहेत. सतत क्रियाशील आणि सकारात्मक राहणं यामुळेच मी कायम ठणठणीत आहे असं सहजतेनं सांगत नाठे बाबा आपल्या आरोग्याचं रहस्य उलगडतात. चांदोरी, त्यापासून काही किलोमीटरवरील नायगाव व सिन्नर तालुक्यांतील निमगाव देवपूर आदी ठिकाणी बाबांची शेती आहे. त्यांची प्रेरणा घेऊन दुष्काळी भागात अनेक शेतकरी प्रगतिशील शेती करीत आहेत. 

मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्‍वर्याचा राजा 
डोंगराळ भागात वळणावळणाने बाबांच्या शेतीकडे जाताना रस्त्याच्या चहूबाजूंनी दूरवर उजाड डोंगरच नजरेत भरतात. शेताच्या परिसरात मात्र हिरवाई दिसते. शेनिन व झिनफंडेल या वाइन द्राक्ष वाणांच्या १५ एकरांवरील द्राक्ष बागा. खाली खडकाळ, मुरमाट जमीन, जमिनीच्या नैसर्गिक उतारानुसार केलेली लागवड, निचऱ्यासाठी दर पाच एकरांच्या उपगटातून काढलेला लांब रुंद चर, पाण्यासाठी बोअरचा प्रयोग. क्षेत्राच्या मधोमध बाजूला विशाल शेततळे. शेततळ्याला लागून बाबांची छोटी झोपडी. त्यात एकांताचा आस्वाद घेतानाच कविता, लेखन करणे हे बाबांनी जपलेले छंद... अतीव कष्टातून नवं जग निर्माण करणाऱ्याचा "मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्‍वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजविल्या चैतन्याच्या बागा'' हा कृतार्थ अनुभव.. 

उमेद वाढविणारी शेती 
पंधरा एकरांवरील डोंगराळ क्षेत्र विकसित करायच्या वेळी (१९९५) बाबांचं वय होतं चौसष्ठ. अधिक धावपळ न करता बाबांनी विश्रांती करावी हा मुलांचा सल्ला त्यांनी धुडकावला. भांडवलासाठी बॅंक ऑफ इंडियाकडून २७ लाखांचे कर्ज काढले. चार महिने शेतात झोपडी बांधून तिथेच मुक्काम केला. डोंगराळ जमीन काही प्रमाणात सपाट केली. विहीर खणली. जानेवारी २००१ मध्ये सलग १५ एकरांवर वाइनच्या दोन द्राक्ष वाणांची लागवड केली. उत्पादनाच्या पहिल्याच वर्षी संपूर्ण क्षेत्रात एकरी सरासरी दीड टन उत्पादन मिळालं. पाणीटंचाईचा चटका जाणवू लागला, तरी त्या वर्षी (२००३) पहिल्या वर्षी इतकच उत्पादन मिळाले. सन २००४ मध्ये एकरी ३ टन व पुढची ८ वर्षे एकरी सरासरी ५ ते ६ टनांप्रमाणे उत्पादनात सातत्य ठेवले. 

कसोटी पाहणारा काळ 
सन २००८ मध्ये मुंबईत झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने पर्यटन उद्योगाला धक्का बसला. त्याचा थेट परिणाम वाइन उद्योगावर झाला. पुढची तीन वर्षे वाइन उद्योगासाठी अडचणीची ठरली. शेतकरी व वाइन उद्योजकांमधील करार मोडले. वाइन द्राक्ष उत्पादकांनी बागा तोडल्या. नाठे बाबांच्या शेतीचेही नुकसान झाले. जेमतेम उत्पन्न मिळाले. पण बाबांनी हिंमत सोडली नाही. 

हिकमती बाबा 
उपलब्ध भांडवलाचा योग्य विनियोग आणि त्यासाठी किमान खर्च करणे हे ध्येय बाबांनी ठेवले होते. बाग लागवडीच्या फिटिंगसाठी त्यांनी कुठल्याही तंत्रज्ञाची मदत घेतली नाही. स्वत: आराखडे तयार करून अँगल, तारा, बांबू आदी ‘फिटिंग मजुरांकडून करवून घेतले. कामाला पाच महिने लागले. मात्र ते गुणवत्तेने पूर्ण होईपर्यंत बाबांनी डोळ्यात तेल घालून प्रत्येक कामावर जातीने लक्ष दिले. प्रत्येक दोन एकरांचे टप्पे बनवून फक्त कडेच्याच सरीला लोखंडी अँगल वापरले. संपूर्ण १५ एकरांसाठी एकूण २० टन अँगल्स, पाच टन तार व साडेतेरा हजार बांबू लागले.  

पाणी नियोजन 
डोंगराळ जमीन सपाट करण्याचे काम सुरू असतानाच विहीर खोदाई सुरू केली. खडकाळ जमिनीत फारसे पाणी लागले नाही. बोअरवेलचाही प्रयोग निकामी ठरला. हार मानायची नाही हे पक्के ठरवले होते. ३५ बाय ३५ मीटर क्षेत्रफळाचे शेततळे खोदायला सुरवात केली. त्यातील पेपर उच्च गुणवत्तेचाच असेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. मागील सहा वर्षांपासून या पेपराने कोणताही दगा दिला नसल्याचे बाबा अभिमानाने सांगतात. 

कामाचे चोख व्यवस्थापन
आज वयाच्या एेंशीतही बाबा बागेचे चोख व्यवस्थापन ठेवतात. पावसाळ्यात बागेत तण वाढते. सप्टेंबरमध्ये गवताची कापणी करून बोदावर त्याचे मल्चिंग केले जाते. पावसाळा संपण्याच्या दरम्यान प्रति द्राक्ष वेलीला दोन किलो शेणखत दिले जाते. शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांचा वापर होतो. आतापर्यंत एकदाही "ॲन्थ्रॅक्‍नोज'' रोग द्राक्षावर दिसून आला नसल्याचे निरीक्षणही बाबांनी नोंदविले. 

कंपन्यांसोबत करार
वाइन उद्योगातील कंपन्यांसोबत बाबा करार करतात. गेल्या चार वर्षांपासून एकाच कंपनीला बाबा द्राक्षे पुरवत आहेत. कंपनीचे काही निकष, अटी असतात. त्यांच्यानुसार गुणवत्ता येण्यासाठी एकरी सहा टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले जाते. प्रति किलो ३५ रुपयांपासून ४८ रुपयांपर्यंत दर मिळतात. 
- कोंडाजी नाठे, ९३२६५१५७८०

दररोज सकाळी शेतातला पहिला फेरफटका पिकांविषयीची आत्मीयता जागवतो. निसर्गाच्या सहवासात आरोग्य ठणठणीत राहते. जिद्द, आत्मविश्‍वास आणि आधुनिक दृष्टिकोन घेऊन शेती केली तर ती लाभदायी होते.
- कोंडाजी नाठे
 

माणूस म्हातारा केव्हा होतो? 
या प्रश्‍नाचं उत्तर जो माणूस शिकणं थांबवतो, तेव्हा तो म्हातारा होतो. मग त्याचं वय २० असो की ८०, त्याने फरक पडत नाही असं एका तज्ज्ञानं दिलं होतं. नाठे बाबांच्या बाबतीत ते पुरेपूर लागू होतं.
 

द्राक्षशेती रुजविण्यात योगदान 
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेती रुजविण्यात नाठेबाबांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांनी १९७० मध्ये चांदोरीत एक एकरावर थॉमसन व १६ एकरांवर अनाबेशाही वाण लावले. सन १९८० मध्ये ते महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक झाले. पुढील तीन वर्षे पदावर चांगले काम केले. निफाड तालुक्‍यातील सोनगाव, चाटोरी, शिंगवे, चितेगाव, खेरवाडी, चांदोरी या भागांत द्राक्षशेती रुजविण्यात, शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोपे पुरविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. तब्बल ४० वर्षे टेबल ग्रेप्स उत्पादनाचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर २००० मध्ये जाणीवपूर्वक वाइन द्राक्षशेतीकडे वळले. टेबल ग्रेप्सच्या तुलनेत या शेतीत खर्च, धावपळ, ताणतणाव कमी राहत असल्याचे बाबा सांगतात. त्यांचा एक मुलगा वाइन उद्योग व सिंचन उद्योगातील कंपनीशी संबंधित आहे. एक मुलगा शेतीच पाहतो.

Web Title: agrowon news kondaji nathe success in agriculture