बटाटा, तरकारीसाठी प्रसिद्ध मंचरची बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पुणे जिल्ह्यातील मंचरची बाजारपेठ बटाटा व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वाधिक बटाट्याची विक्री बेणे म्हणून खरीप व रब्बी हंगामात मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केली जाते. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर भागातील शेतकऱ्यांकडून या वाणाला मागणी वाढली आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे १९ कोटी ९७ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या बटाटा वाणापासून आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. बाजार समितीची एकूण वार्षिक उलाढाल १७० कोटी ७३ लाख ६८ हजार रुपये आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचरची बाजारपेठ बटाटा व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वाधिक बटाट्याची विक्री बेणे म्हणून खरीप व रब्बी हंगामात मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केली जाते. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर भागातील शेतकऱ्यांकडून या वाणाला मागणी वाढली आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे १९ कोटी ९७ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या बटाटा वाणापासून आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे. बाजार समितीची एकूण वार्षिक उलाढाल १७० कोटी ७३ लाख ६८ हजार रुपये आहे. त्यामध्ये कांदा व अन्य तरकारी (भाजीपाला) या शेतीमालाचा समावेश आहे, अशी माहिती मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त जयवंतराव निकम यांनी दिली. बाजार समितीच्या आवारात गेल्या ४३ वर्षांपासून ४८ अडत्यांमार्फत बटाटा वाणाची विक्री केली जाते. पंजाब, हरियाणा राज्यातून बटाटा वाण येथे विक्रीसाठी आणला जातो.  

मेथी, कोथिंबिरीकडे शेतकऱ्यांचा कल 
आंबेगाव तालुक्‍यातील सुमारे साठ गावांतील शेतकरी मेथी व कोथिंबिरीचे नेहमी उत्पादन घेत असतात. सध्या कोथिंबिरीच्या जुडीला ३४ रुपये तर मेथीच्या जुडीला १८ ते २० रुपयांपर्यंत बाजारभाव आहे. सुमारे ४० दिवसांच्या कमी कालावधीत नगदी पैसे मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. वर्षभरात एक कोटी ६९ लाख ४१ हजार कोथिंबीर व मेथी जुड्यांची आवक झाली. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना १५ कोटी सात लाख २७ हजार रुपये मिळाले, अशी माहिती मंचर बाजार समितीचे भाजीपाला अडतदार संदीप सावळेराम गांजाळे यांनी सांगितली.

नोटाबंदी व शेतकरी संपामुळे मोठे आर्थिक नुकसान
नोटाबंदीच्या कालावधीत शेतमालाची आवक कमी झाली होती. तेव्हापासून शेतमालाचे बाजारभाव घसरले आहेत. अजून त्यामध्ये म्हणावी अशी सुधारणा झाली नाही. गेल्या महिन्यात शेतकरी संपाचा परिणाम येथील बाजार समितीवर मोठ्या प्रमाणात झाला. सलग आठ दिवस येथील बाजार समितीचे व्यवहार बंद होते. शेतकऱ्यांचे चार कोटी ५५ लाख रुपयांचे व बाजार समितीचे चार लाख ५५ हजार रुपयांचे शुल्क त्यामुळे बुडाले. मालाला हमीचा बाजारभाव मिळाल्यास शेतकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे देवदत्त जयवंतराव निकम यांनी सांगितले.

आंबेगावात पिकांची विविधता 
आंबेगाव तालुक्‍यात बाराही महिने शेतीला पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी मिरची, गवार, वांगी, फ्लॉवर, बीटरूट, मका, कांदा, बटाटा अशा विविध पिकांचे चांगले उत्पादन घेतात. शेतकऱ्यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. अडत्यांच्या व खरेदीदारांच्या स्पर्धेतून शेतमालाला येथे अधिक बाजारभाव मिळतो. सन २०१६- १७ मध्ये १७ लाख ३८ हजार ५०५ डागांची आवक येथे झाली. त्यापासून शेतकऱ्यांना ९० कोटी तीन लाख ३६ हजार रुपये मिळाले. येथील तरकारी माल कल्याण, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, गुजरात राज्यात या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. असे मंचर बाजार समितीच्या तरकारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.

Web Title: agrowon news manchar market potato