मिझो मिरची जागतिकदृष्ट्या ठरतेय महत्त्वाची 

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

भारत देशाची जैविक विविधता अत्यंत समृद्ध आहे. केवळ मिरची हा घटकदेखील घेतला तरी त्याचे वेगवेगळे प्रकार पाहण्यास मिळतात. हीच प्रादेशिक वा भौगोलिक विविधता त्या उत्पादनाला जीआय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरते. दोन आठवड्यांपूर्वी आपण नागालॅंड मिरचीचे महत्त्व जाणून घेतले. 

भारत देशाची जैविक विविधता अत्यंत समृद्ध आहे. केवळ मिरची हा घटकदेखील घेतला तरी त्याचे वेगवेगळे प्रकार पाहण्यास मिळतात. हीच प्रादेशिक वा भौगोलिक विविधता त्या उत्पादनाला जीआय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरते. दोन आठवड्यांपूर्वी आपण नागालॅंड मिरचीचे महत्त्व जाणून घेतले. 

मागील आठवड्यात आपण मिझोराम राज्यातील “बर्डस आय” या नावाने अोळखल्या जाणाऱ्या मिझो मिरचीची काही माहिती घेतली. या मिरचीला २०१४ मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. गडद लाल रंग आणि झणझणीत चव अशी या मिरचीची खासीयत आहे. संपूर्ण मिझोराम राज्यात म्हणजे आठ जिल्ह्यांमध्ये या मिरचीचे तीन वेगवेगळ्या प्रतवारीत उत्पादन घेतले जाते. ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी अशी ही गुणवत्तेची वर्गवारी आहे. त्यामुळेच त्यांचा वापरही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवण्यासाठी केला जातो.

अशी आहे प्रतवारी 
ग्रेड ए- या मिरचीच्या जीआयसाठी तयार करण्यात आलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे ग्रेड ए ही सगळ्यात लहान, अधिक चमकदार व लाल रंगाची मिरची आहे. ती सर्वात पातळ अाहे. शिवाय सर्वात जास्त झोंबणारी मानली जाते. या मिरचीची गुणवत्ता इतर मिरच्यांच्या तुलनेत सर्वोच्च मानली जाते. त्यामुळेच या मिरचीला बाजारात जास्त मागणी आहे. ग्रेड बी- या ग्रेडची मिरची “ए” ग्रेड मिरचीपेक्षा थोडी जाड आणि आकाराला लांब असते. चवीला ती थोडी कमी तिखट असते. ग्रेड सी- ही मिरची इतर गुणधर्मांमध्ये ग्रेड “बी” मिरचीसारखीच असते. मात्र या मिरचीचा आकार अन्य प्रकारांपेक्षा थोडा लांब असतो. 

मिझो मिरचीचे महत्त्व
मिझो मिरची ही या राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी एक आहे. त्यामुळे या राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे महत्त्वाचे उत्पादन म्हणून त्याकडे पाहिले जाते. मिझो मिरचीचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात लोणची, चटण्या आणि इतर मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चीन, थायलंड, व्हिएतनाम येथे लोकप्रिय असलेल्या न्यूडल्सबरोबर बनविल्या जाणाऱ्या चटण्यांसाठी या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मिझोराममध्ये या मिरचीच्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात क्षमता अाहे. शेजारील राज्ये आणि बांगलादेश या मिरचीसाठी महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. या ठिकाणी दरवर्षी जवळपास दोन हजार टन मिरची विकली जाते.

जीआयमुळे स्थान भक्कम 
जीआय मिळाल्याने या मिरचीने आता परदेशात आपले स्थान अतिशय भक्कम केले आहे. या मिरचीला देशात ५० ग्रॅमसाठी २०० रुपये म्हणजे प्रति किलोसाठी ४००० रुपये बाजारभाव मिळत आहे. परदेशातही मिझो मिरचीची मागणी वाढत आहे. ‘एक्स्पोर्ट- इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मिझो मिरचीच्या निर्यात क्षमतेबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. भारतातून ही मिरची अग्रक्रमाने निर्यात होऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. मिझोराम सरकारनेही जीआय प्राप्तीनंतर आणि विशेष करून संबंधित बॅंकेच्या माहिती संदर्भाने या मिरचीला परदेशी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. मागील एका भागात आपण स्पाईस बोर्ड ऑफ इंडिया आणि भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने भारतीय जीआय प्राप्त मसाल्यांच्या प्रसारासाठी तयार करीत असलेल्या आराखड्याबद्दल जाणून घेतले. अशावेळी शेतकऱ्यांनी जीआय संबंधीचे सरकारी धोरण आणि आंतरराष्ट्रीय संधी यांचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आपल्या स्थानिक मालाचा शोध घेऊन ते प्रकाशात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ 
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Web Title: agrowon news Mizo Chili