मधुर स्वादाचा उसाचा रस अन्‌ पपईही

मधुर स्वादाचा उसाचा रस अन्‌ पपईही

हिंगोली जिल्ह्यातील धार येथील नवनाथ पांडुरंग रणमाळ वयाच्या २२ व्या वर्षांपासून शेतीत आहेत. त्यांची सुमारे २० एकर शेती आहे. त्यातील अडीच एकर जमीन पूर्णा नदीकाठी, अडीच एकर गोजेगांव शिवारात तर १५ एकर औरंगाबाद-जिंतूर-नांदेड राज्य रस्त्यावरील धार फाटा ( ता. औंढानागनाथ, जि. हिंगोली) येथे आहे. 

शेतीचा विकास 
सुरवातीच्या काळात रणमाळ यांच्या शेतात जुनी विहीर होती. परंतु तिची खोली कमी असल्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नव्हते. जिरायती क्षेत्रातून फारसे उत्पादन मिळायचे नाही. मग सन १९८९ मध्ये  दोन किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीवरून पाइपलाइन केली. त्याद्वारे पाणी जुन्या विहिरीत सोडले. त्यानंतर नवीन विहीर खोदली. सिंचनाची सोय झाल्यानंतर सुरवातीला हळद लागवड केली. सन २०१० मध्ये पूर्णा नदीवरून दुसरी पाइपलाइन करून विहिरीमध्ये पाणी आणले. 

सध्याची पीकपद्धती
   चार ते पाच एकर सोयाबीन
   एक ते दोन एकर हळद
   दोन ते तीन एकर कापूस
   ऊस व पपई 
   घरची गरज भागेल एवढ्या प्रमाणात कांदा, लसूण आदींचे उत्पादन 
प्रतिकूलता हीच ठरली संधी 
गावपरिसरात साखर कारखाना आहे. परंतु एकावर्षी कारखान्याने ऊस नेला नाही. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले. औरंगाबाद-नांदेड राज्य रस्त्याला लागून शेतजमीन आहे. या रस्त्यावरून नेहमी रहदारी सुरू असते. परंतु या रस्त्यावर प्रवाशांसाठी चहा-नाश्ता, शीतपेये आदी तत्सम घटकांची सुविधा दूर अंतरापर्यंत नव्हती. नेमकी हीच संधी रणमाळ यांनी अोळखली. 

पपईची थेट विक्री 
राज्य मार्गाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये पपईच्या सुमारे ४०० झाडांची लागवड केली आहे. पपईची विक्री देखील इथल्याच स्टॉलवरून थेट केली जाते. उसाचा रस घेण्यासाठी थांबलेले प्रवासी ताजी, वजनदार पपई पाहून त्याकडे आकर्षित होतात. जागेवरून विक्री केल्यामुळे नफ्यात वाढ होते. 

टप्प्याटप्प्याने लागवड
साधारण जून-जुलै ते फेब्रुवारी या काळात पपईची विक्री होते. त्यासाठी टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. जेणेकरून ती अधिकाकाळ उपलब्ध राहते. 

थेट विक्रीतून तीनपट नफा 
रणमाळ सांगतात की पपई व्यापाऱ्यांना दिली तर क्विंटलला ८०० ते एकहजार रुपये दराने ते खरेदी करतात. हीच पपई थेट ग्राहकांना विकली तर क्विंटलला तीनहजार रुपयांनी जाते. म्हणजेच किलोमागे तीनपट नफा होतो. पपईला इतकी मागणी असते की अनेकवेळा ग्राहकांना त्याची आगाऊ मागणी करावी लागते.

पेरूवर लक्ष केंद्रित 
पपई आणि उसाचा रस या पाठोपाठ रणमाळ यांनी पेरूची मागणी लक्षात घेऊन त्याच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा सरदार आणि ललित वाणांच्या सुमारे २०० झाडांची लागवड केली आहे. 

खास रसवंतीसाठी ऊस 
रणमाळ यांनी खास रसासाठी ऊसशेती केली आहे. त्यासाठी त्यांची विविध वाणांच्या लागवडीचे प्रयोग केले. एकरी ४० ते ६० टन उत्पादन मिळते. जिंतूर ते औंढा राज्य रस्त्यावरील अन्य दोन रसवंतीचालकांनाही रणमाळ यांच्या शेतातून ऊस पुरवठा केला जातो. त्यास प्रतिटन सहाहजार रुपये एवढा दर आहे. शेतातील जवळपास १० टन उसाची विक्री अन्य रसवंती चालकांना करून ५० टन ऊस स्वतःच्या रसवंतीसाठी राखून ठेवतात. रसवंतीमुळे उसाचे मूल्यवर्धन करणे त्यांना शक्य झाले आहे. 

शोधलेली संधी
   या ठिकाणापासून प्रसिध्द तीर्थक्षेत्र अौंढ्या नागनाथ जवळच आहे. तेथेही भाविकांची सतत ये जा सुरू असते. त्यामुळे रस पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी नाही. 
   साधारण फेब्रुवारी ते मे हा कालावधी रसविक्रीसाठी अत्यंत चांगला. जूनअखेरीपर्यंतही हा स्टॉल सुरू असतो. 
   दिवसाला साधारण दीड क्विंटल उसाचे गाळप केले जाते. प्रति ग्लास १० रूपये दर असतो. 
   दिवसाला सुमारे दोनहजार ते तीनहजार रुपये उत्पन्न हाती पडते. 

थेट विक्री  हाच शेतीतील नफा
कारखान्याला ऊस घालण्यासाठी मजुरांपासून मुकदमांपर्यंत मिनतवारी करावी लागते. एखाद्या वर्षी ऊस नाही नेला तर मोठे नुकसान होते. परंतु रसवंती सुरू केल्यामुळे हक्काची ग्राहकपेठ तयार करणे रणमाळ यांना शक्य झाले आहे. तीच बाब फळांच्या बाबतीतही आहे. येत्या काळात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. 

ऊस रसवंतीचा व्यवसाय 
   मुख्य वैशिष्ट्य- राज्यमार्गाला लागून शेत, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला स्टॉल उभारण्याची संधी 
   घरचा दोन एकर ऊस, त्यातून सुरू केली ऊस रसवंती.  
   रस्त्यालगतच्या शेतामध्ये दोन लाख रूपये खर्च करुन निवारा शेडची उभारणी केली. 
   चाळीस हजार रुपये खर्च करुन चरक विकत घेतला. 
   साई रसवंती नावाने ताज्या, दर्जेदार रसाची विक्री सुरू केली.   

उपाहारगृहाची जोड
रसवंतीला उपाहारगृहाची जोड दिली आहे. त्याठिकाणी चहा, काॅफी, दूध यासोबत फराळाचे पदार्थही मिळतात. उसाच्या रसाला कमी मागणी असते त्या वेळी उपाहारगृहाच्या माध्यमातून उत्पन्न सुरू राहते. 

कुटुंबातील सदस्याची मदत 
रणमाळ यांना तीन मुले आहेत. पैकी दीपक रसवंती, उपाहारगृह चालविण्याच्या कामात मदत करतो. गंगाधर बीएचएमएस झाला असून तो पुण्यात असतो. तिसरा मुलगा भागवत डी. फार्मसी अभ्यासक्रमाचे   शिक्षण घेत आहे. वडील पांडुरंग, आई चंद्रभागा, पत्नी गोदावरी यांचीही शेतीत मोठी मदत मिळते.
 : नवनाथ रणमाळ, ९१३०१९८६१२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com