तण व्यवस्थापनातून सेंद्रिय घटकांची उपलब्धता

प्रताप चिपळूणकर
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

तणाच्या जमिनीवरील भागापेक्षा खालील मुळांचे जाळे खत करण्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. तणे जागेवरच वाळून मुळांचे जाळे आकसून जमिनीत पोकळ्या तयार होतात. यामुळे जमिनीत हवा खेळती रहाते. पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची वाढ होऊन पिकाचे चांगले पोषण होते.

व्यवसायात अडचणी निर्माण होणे ही त्या व्यवसायाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. अडचणी सोडविण्यातून नवीन कल्पनांचा उगम होतो, नवीन तंत्रांचा शोध लागतो. सेंद्रिय खत व्यवस्थापन या विषयांलाही हेच नियम लागू पडतात. मला गेल्या काही वर्षात नाशिक, सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागांना भेटी देण्याचा योग आला. यातून द्राक्षशेतीत सेंद्रिय खत व्यवस्थापनात भरपूर बदल करण्यास वाव असल्याचे जाणवले. 

प्रचलित सेंद्रिय खत व्यवस्थापन 
द्राक्ष शेतीत शेणखत, कंपोस्ट खताचा वापर सर्वात जास्त केला जातो. शेणखतांमुळे फळांची प्रत सर्वात उत्तम मिळत असल्याने शेणखतावर खर्च करणारे शेतकरी आहेत. शेणखतास मागणी जास्त व मर्यादित पुरवठा यामुळे इतर अनेक पर्यायांचा वापरही केला जात आहे. यामध्ये साखर कारखान्यातून उपलब्ध होणारे मळीखत, ऊस तुटून गेल्यानंतर उपलब्ध होणारे पाचट द्राक्षबागेत आच्छादनासाठी वापरले जाते. बागेत अखाद्य पेंडींचा वापर काही प्रमाणात होतो. या व्यतिरिक्त पावसाळ्यात बागेत हिरवळीचे खत करून ते कापून बोधावर आच्छादन केले जाते. हिरवळीच्या खतासाठी तागाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 

शेणखतातून मिळणारे खत हलक्‍या दर्जाचे, काष्ठमय पदार्थ कुजवून तयार होणारे खत उत्तम दर्जाचे असे लक्षात आल्यामुळे द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीतून मिळणारा काष्ठमय भाग जागेलाच कुजवून त्याचे खत काही बागायतदार करतात.  ऊस पट्टयात भागात ऊस खोडकी गोळा करावयास आज कोणीही येत नाही. तीच परिस्थिती द्राक्षशेतीच्या परिसरातही झाली आहे. हे  परिवर्तन बागेसाठी फायद्याचे आहे. या काष्ठमय भागाचा वापर करावा की नाही यावर काही मतप्रवाह आहेत. या काड्यावर रोगकिडीचे अवशेष असतात. यामुळे हा काष्ठमय भाग गोळा करून बाहेर नेऊन जाळून अगर पुरून टाकावा, असा एक मत प्रवाह आहे. सेंद्रिय खताची कमतरता, रोग कीड नियंत्रणासाठी नवीन उपलब्ध होणारी कीडनाशके, फवारणीची सुधारित यंत्रे यामुळे हा काष्ठमय भाग बागेतच कुजविण्याकडे शेतकऱ्यांची प्रवृती वाढत आहे. 

सेंद्रिय घटकांचा वापर 
बहुतेक बागायतदार दोन अगर चारचाकी पॉवर टीलरने आंतर मशागत करून बाग स्वच्छ ठेवतात. बोधात चर काढून उपलब्ध शेणखत भरतात. पावसाळ्यापूर्वी आच्छादन केलेला उसाचा पाला रोटाव्हेटरने नांगरुन चुरा करून मातीत मिसळला जातो. पावसाळ्यात हिरवळीचे खत म्हणून ताग करून पुढे घड छाटणीपूर्वी कापून बोधावर ठिबक खाली आच्छादन केले जाते. हिरवळीचे खत म्हणजे ताग अगर धैंचा हे आपल्याकडे समीकरण झाले आहे. अलीकडील काही वर्षांत या तंत्रात अनेक नवीन विचारांची भर पडली आहे. 

सेंद्रिय पदार्थ पीक वाढत असताना जागेलाच कुजले पाहिजेत. जास्तीत जास्त काळ कुजत राहिले पाहिजेत. 
 कुजणे व वाढणे या समांतर चालणाऱ्या क्रिया आहेत.
कुजण्यास जड असणारे पदार्थ कुजविणे. छाटणीतील काष्ठमय घटक कुजविणे.

तणांचे करा खत
बागेत उगवणाऱ्या तणापासून खत करण्यास शिकले पाहिजे. याचे अनेक फायदे आहेत. जास्तीत जास्त प्रकारच्या पाला पाचोळा, हिरवळीचे खत, गवतवर्गीय तणांचे खत, द्विदल तणापेक्षा जास्त चांगले. 

बागेत उगविणाऱ्या तणांचा अभ्यास केल्यास द्विदलच्या तुलनेत गवतवर्गीय तणांची संख्या बहुतेक वेळा जास्त असते. नवीन शास्त्र असे सांगते, की बिघडलेल्या अगर उत्पादकता कमी झालेल्या जमिनी द्विदल वर्गीय तणांच्या सोटमुळापेक्षा एकदल वर्गीय तंतुमय मुळांकडून जास्त चांगल्या व लवकर सुधारतात. 

बागेत कित्येक जाती, प्रजातींचे गवत उगवते. निसर्ग हे तणांचे मिश्रण गरजेनुसार उत्तमरीत्या बनवित असतो. 

हिरवळीच्या खतासाठी पावसाळ्यात तणे वाढविण्यास वाव द्यावा. तणाकडून जमिनीची सुपिकता गुणधर्म बदलत जातील तसे तणांचे प्रकारही आपोआप बदलत जातात. कोवळे तण स्वतःच्या दृष्टीने उपयोगाचे नाही. 

तणाच्या जमिनीवरील भागापेक्षा जमिनी खालील मुळांचे जाळे खत करण्यासाठी जास्त महत्त्वाचे. तण जमिनीवर वाढेल, तितका मुळांचा पसारा जमिनीखाली खोलवर वाढेल.

तणे मुळासकट उपटून अगर कापून बोधावर आच्छादन करण्यापेक्षा आडवीकरून त्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत तणनाशक फवारावे. तणे मेल्यानंतर वाळू लागतात. मुळांचे जाळे आकसून जमिनीत लहान मोठ्या पोकळ्या तयार होतात. यामुळे जमिनीत हवा खेळती राहील. हवेच्या योग्य उपलब्धतेमुळे पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची चांगली वाढ होऊन पिकाचे उत्तम पोषण होते.

जमिनीमध्ये उपयुक्त बुरशींची संख्या वाढते. यातून जमिनीची कणरचना सुधारेल, निचरा शक्ती वाढेल. कुजण्यास जड असणारे पदार्थ बुरशीकडून कुजविले जातात. या बुरशी फक्त मृत सेंद्रिय पदार्थांच्या कुजविण्याच्या कामात वाढतात. त्या जीवंत वनस्पतीवर वाढत नाहीत. यामुळे अशा बुरशीपासून पिकाला कोणताही धोका नसतो. शास्त्रात असे बुरशीचे वाढणे हे सुपिकता वाढीचे निदर्शक मानले जाते. 

मोठी वाढलेली तणे पुढे तणनाशकाने मारून वाढली आहेत, ती तशीच बागेत ठेवणे. तणांचा जमिनीवरील भाग कापून बांधावर आच्छादन करणे, जमिनीखालील भाग रोटाव्हेटर फिरवून टाकणे असे काही प्रकार प्रचलित आहेत. नवीन शास्त्रानुसार तज्ज्ञांच्या सल्याने शिफारशीत तणनाशकाने तण नियंत्रण करून पुढे कोणतीही आंतर मशागत न करता, रानाची हलवाहलवी न करता शून्य मशागतीवर जमीन ठेवणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. 

एकदा बागेत सेंद्रिय पदार्थ भरपूर वाढले की पाणी कमी लागते. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. यामुळे त्यांचा वापर कमी करणे शक्‍य आहे. रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. कीडनाशकांच्या फवारण्या कमी होतात. पावसाळ्यात अनुकूल हवामानामुळे गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्वच्छ जमिनीत अन्नद्रव्यांची उचल वाढते. त्यामुळे पर्ण देठातील नत्राचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असते. नत्र वाढणे हे रोगकिडींना आमंत्रण देण्याप्रमाणे आहे. अनेक बागायतदार केवळ या कारणासाठी तणे वाढवितात. 

तणे जागेलाच मारल्यानंतर कुजून त्याचे खत होते. या कुजण्याच्या क्रियेतून काही सेंद्रिय आम्ले तयार होतात. ही आम्ले जमिनीचे शुद्धीकरण करतात. अशा जमिनीतील उत्पादनाचा दर्जा उच्चतम पातळीचा असतो. 

कोणतेही पीक वाढत असता काही त्याज्य पदार्थांची निर्मिती होत असते. हे पदार्थ अल्कधर्मी असतात. हे पदार्थ जमिनीत साठत जातात. या साठ्याची ठराविक मर्यादा ओलांडल्यानंतर अन्नद्रव्या बरोबर हे अपविष्ठ पदार्थही वनस्पतीत शोषले जातात. असे झाल्यास फळांची मूळ चव, स्वाद, सुगंध लुप्त होतो. उत्पादनाचा दर्जा ढासळतो. आता बाजारात मिळणाऱ्या बहुतेक कृषी उत्पादनाची चव पहिल्यासारखी लागत नाही, अशी तक्रार जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकण्यास मिळते. याचे खापर बहुतेकवेळा रसायनांच्या वापराला दिले जाते. 

सेंद्रिय पदार्थ जागेलाच सतत कुजविण्याने निर्माण होणाऱ्या आम्लामुळे अपविष्ठ पदार्थ व रसायनांचे शेषभाग याचे विघटन होऊन जमिनीचे शुद्धीकरण केले जाते. जे पिकाच्या दर्जासाठी गरजेचे आहे. 

आपला भर जमिनीबाहेर सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे चांगले कुजलेले खत, गांडुळ खत टाकण्यावर आहे. अशा परिस्थितीत ही आम्ले बाहेर तयार होतात व काम नसल्यामुळे संपून जातात. यामुळे जमिनीच्या शुद्धीकरणाला वावच शिल्लक रहात नाही. याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

Web Title: agrowon news Organic components