कागदी लिंबाचा हस्त बहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहार धरणे लिंबात शक्य होत नाही. अशा वेळी शिफारशीत संजीवकांचा वापर करून हस्त बहाराचे व्यवस्थापन करावे.

ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहार धरणे लिंबात शक्य होत नाही. अशा वेळी शिफारशीत संजीवकांचा वापर करून हस्त बहाराचे व्यवस्थापन करावे.

कागदी लिंबात विशिष्ट बहार धरणे शक्य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही. कारण, एखाद्या विशिष्ट बहारासाठी ताण दिला तर त्या वेळी अगोदरच्या बहाराची फळे अपक्व स्थितीतच गळून पडतात. उदा. मृग बहर घेतल्यास झाडावर आंबे बहाराची फळे २ ते २.५ महिन्यांची असतात. आंबे बहार घेतल्यास झाडावर हस्त बहाराची फळे वाटाण्याएवढी असतात. ती पाण्याच्या ताणामुळे गळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे ताण देण्याच्या पद्धतीचा वापर करून एखादा विशिष्ट बहार धरणे लिंबूत शक्य होत नाही. अशा वेळी विशिष्ट संजीवकांचा वापर करून हस्त बहाराचे व्यवस्थापन करावे. 

कागदी लिंबू बागेस जरी वर्षातून तीन वेळा नवीन पालवी व त्याबरोबर फुले येत असली, तरी संत्रा व मोसंबीसारख्या नवीन पालवीवर किंवा वाढीवर फुले येत नाहीत. तीन ते चार महिने वयाच्या जुन्या पक्व फांद्यावरच फुले येतात. म्हणून आपणास हव्या असणाऱ्या बहराचे उत्पादन मिळण्यासाठी अशा फांद्या तीन ते चार महिने वयाच्या जुन्या व पक्व असणे आवश्यक आहे. 

हस्त बहराच्या व्यवस्थापनात खत व्यवस्थापन, कार्बोहायड्रेटस आणि नत्र यांचे प्रमाण, संजीवकांचा वापर, कीड व रोगांचे योग्यवेळी नियंत्रण महत्त्वाचे असते. 

क्लोरमेक्वाट क्लोराइड, जिबरेलीक ॲसिड, एनएए, पोटॅशियम नायट्रेट इत्यादींचा वापर फायदेशीर आढळून आलेला आहे. 

क्लोरमेक्वाट क्लोराइडसारख्या वाढ नियंत्रकामुळे शेंडावाढ मंदावते. रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. 

हस्त बहर धरण्यासाठी कागदी लिंबू झाडांना आॅगस्ट- सप्टेंबरमध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो; परंतु या वेळी जर पाऊस असेल, तर बागेला ताण बसत नसल्यामुळे तसेच हवामान प्रतिकूल असल्यास फुलोऱ्याचे प्रमाण कमी मिळते. 

सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त १० ते १५ टक्के असते. हस्त बहरातील फुलोऱ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आॅगस्ट - सप्टेंबर महिन्यामध्ये क्लोरमेक्वाट क्लोराइड २ मि.लि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दोन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात. 

शिफारसी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि अखिल भारतीय समन्वित लिंबूवर्गीय फळे संशोधन प्रकल्प, तिरुपती या ठिकाणी कागदी लिंबू हस्त बहार उत्पादनवाढीसाठी घेण्यात आलेल्या प्रयोगानुसार वाढ विरोधक व संजीवकांच्या फवारणीची शिफारस करण्यात आलेली आहे.
सप्टेंबरमध्ये क्लोरमेक्वाट क्लोराइड ( २ मिलि/लिटर) फवारणी करावी.
आॅक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. 
या फवारणीमुळे फुलोऱ्याचे प्रमाण वाढून हस्त बहाराच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
सध्या ज्या शेतकऱ्यांची जूनमधील जिबरेलीक ॲसिडची फवारणी चुकली असल्यास त्यांनी क्लोरमेक्वाट क्लोराइड २ मि.लि प्रतिलिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात केल्यास फाजील शेंडावाढ मंदावते, रोग प्रतिकारक शक्ती सुधारते.
आॅक्टोबरमध्ये फळगळ कमी करण्यासाठी एनएए हे संजीवक १० मिलि ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

खत व्यवस्थापन ः 
नवीन पालवी आल्यावर त्या फांद्याची व्यवस्थित चांगली वाढ होण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन वाढीपूर्वी सुरवातीच्या काळात नियमित खतांचा पुरवठा करणे जरूरीचे आहे.
बागेस खते देताना एका हप्त्यात न देता तीन हप्त्यांत प्रत्येक बहाराच्या वेळी द्यावीत. 

पूर्ण वाढलेल्या झाडास ६०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद, ६०० ग्रॅम पालाश, १५ किलो शेणखत, १५ किलो निंबोळी पेंड, ५०० ग्रॅम व्हॅम,१०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक,  १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलियम, १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम प्रतिझाड प्रतिवर्ष द्यावे. या खतापैकी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश, शेणखत, निंबोळी पेंड व संपूर्ण जिवाणू संवर्धकाची मात्रा जून महिन्यात देणे गरजेचे असते. शेतकऱ्यांनी ही खतमात्रा दिलेली असेलच.  राहिलेले ६० टक्के नत्र सप्टेंबर-आॅक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दोन समान हप्त्यात विभागून द्यावे.

हस्त बहराच्या उत्पादनवाढीसाठी जून-जुलै महिन्यात खत व्यवस्थापन व्यवस्थित असल्यास जूनमधील नवीन वाढ तीन-चार महिन्यांच्या वयाची असेल. 

फळे तयार होण्यास ५ ते ५.५. महिने लागत असल्यामुळे विशिष्ट बहार घेण्यापेक्षा तीनही बहाराची फळे घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. बागेत वेळोवेळी टिचणी करून जमीन भुसभुशीत करावी त्यामुळे जमिनीत हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण राहिल्यास मुळांचे कार्य व्यवस्थित राहते.महात्मा फुले कृषी विद्यापीठाने साई शरबती व फुले शरबती या जाती स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित केलेल्या आहेत. या जातींचे उत्पादन इतर स्थानिक प्रचलित जातीपेक्षा जास्त असून, एकूण उत्पादनापैकी २४ ते २५ टक्के फळे उन्हाळी हंगामात मिळतात. त्यामुळे लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी.

दत्तात्रय जगताप - ७५८८६९५३३६
(अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Web Title: agrowon news Paper lemon