फुलगावात ग्रामस्थांच्या कर्तृत्वाने लक्ष्मी आली सोनपावलांनी 

चंद्रकांत जाधव
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

फुलगाव (ता. भुसावळ, जि.जळगाव) येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या शिवारातील जलसंकट दूर करण्यासाठी सिमेंट नालाबांध, साठवण बंधारे शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करून घेतले. यासोबत गावातील शाळा, परिसर स्वच्छता यावर भर दिला. योजना प्रभावीपणे राबवून या गावाने आदर्श गाव योजनेत यश मिळवून एकीतून विश्‍वास व विकास हा मंत्र दिला. यासोबत शेतशिवारातील जलसंकट दूर करून या गावात समृद्धीदेखील जणू सोनपावलांनी चालून आली आहे.

जळगाव जिल्ह्यात फुलगाव (ता. भुसावळ) हे गाव भुसावळ शहरापासून पुढे मुक्ताईनगरकडे जाताना जवळपास सात किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर महामार्गालगत गाव वसले असल्याने येथे पोचणे तसे सुकर आहे. शेती हाच या गावातील ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. यासोबत गावाजवळच दीपनगर औष्णीक विद्युतनिर्मिती केंद्र व केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची आयुध निर्माणी (ऑडर्नन्स फॅक्‍टरी) आहे. अर्थातच येथे गावातील अनेक जण सेवेत आहेत. 

गावाला सैनिकांची परंपरा 
विशेष बाब म्हणजे भारतीय सैन्यातही फुलगावातील जवळपास अडीचशे तरुण आहेत; तर सुमारे ३७५ जण भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले आहेत. भारतीय स्वातंत्र लढ्यातही गावातील १२ स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले होते. यामुळे गावाला सैनिकांचे गाव म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. ग्रामविकासातही योगदान देण्यामध्ये इथल्या प्रत्येकाचा हिरिरीने सहभाग राहिला आहे. याच जोरावर गावाने आदर्श गाव योजनेचा पुरस्कार २००९-१० मध्ये प्राप्त केला. 

असे आहे फुलगाव
 लोकसंख्या सुमारे ५३०० 
 शिवारातील शेती काळी कसदार, हलक्‍या प्रकारची 
 कपाशी, भाजीपाला, केळी ही पिके. 
 सुमारे ३७६ हेक्‍टर क्षेत्र. पैकी ७५ टक्के क्षेत्र ओलिताखाली 
 
शेतीविकासाची कास 
गावातील शेतीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या सदस्यांपर्यंत सर्वांनी पुढाकार घेतला. गावातील क्षेत्र कूपनलिका, विहिरी यामुळे ओलिताखाली होते; पण उन्हाळ्यात विहिरींना पाणी कमी व्हायचे. ही बाब लक्षात घेता गावानजीकची भोगावती नदी व महंमदपुरा नाला यावर सिमेंट नालाबांध, साठवण बंधारे बांधायला सुरवात केली. सन २००७-०८ पासून हे काम हाती घेण्यात आले. जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, रोजगार हमी योजना यांची मोठी मदत झाली. यातून भोगावती नदीवर १३ बंधारे; तर महंमदपुरा नाल्यावर १७ लहान मोठे बंधारे उभारण्यात आले. यातील जे बंधारे नादुरुस्त झाले त्यांच्या दुरुस्तीसंबंधीदेखील सातत्याने पाठपुरावा करून घेण्यात आला. मे महिन्यात गावात पूर्वहंगामी कपाशी लागवड सुरू होते. केळीचीही अनेक जण लागवड करतात. पीक उत्पादनाबाबतही अनेक शेतकरी अग्रेसर आहेत. 

शेततळ्यांकडे लक्ष केंद्रित 
पाण्याचा शाश्‍वत स्रोत निर्माण व्हावा यासाठी २०००९-१० या काळात शेततळे योजनेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. कृषी विभागाच्या संपर्कात अनेक शेतकरी आले. यातून जवळपास १८ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.  

गांडूळ खत, दशपर्णी अर्कनिर्मिती प्रशिक्षण 
ग्रामस्थांना नैसर्गिक शेती करता यावी, यासाठी काही शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला. ग्रामपंचायत इमारतीच्या आवारामध्ये गांडूळ खतनिर्मिती युनिट व दशपर्णी अर्कनिर्मिती यंत्रणा उभारण्यात आली. सन २००८ मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला. या सेंद्रिय घटकांच्या निर्मितीबाबत मार्गदर्शन सातत्याने केले जाते. अलीकडील दोन-तीन वर्षांत कापूस लागवड सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात गांडूळ खत याबाबत विशेष मार्गदर्शन केले जाते. 
 
शंभर टक्के करवसुली 
गावात करवसुली शंभर टक्के प्रमाणात केली जाते. शक्यतो कुणीही थकबाकीदार नाही. वसुलीच्या बळावर गावात अनेक उपक्रम राबविणे शक्‍य झाले आहे. वसुलीबाबत गावात दवंडी पिटावी लागत नाही किंवा कुणाला सक्ती केली जात नाही. ग्रामस्थ दरवर्षी मार्च महिन्यापूर्वी आपला कर भरतात. 

माजी सैनिकांची वसाहत 
फुलगावच्या शिवारातच माजी सैनिक वसाहत आहे. जवळपास दोनशे कुटुंबांचे वास्तव्य आहे. इथे प्रत्येक घरासमोर वृक्षांची लागवड झाली असूून शंभर टक्के रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण केले आहे. वसाहतीत अनेक रहिवाशांनी परसबाग फुलविण्याचे काम केले आहे. वृक्ष लागवड, जोपासना यांचा अनेकांना छंद आहे. यातूनच गावाच्या मुख्य रस्त्यांवर अनेक वृक्ष आज जोपासले जात आहेत. आपण एखाद्या शहरातील ‘कॉलनी’तच फिरत असल्याचे इथे आल्यानंतर जाणवते. गावात कचरा संकलनासाठी ‘मिनी ट्रॅक्‍टर’ आहे. छोटा टॅंकर गावात लग्न व समारंभासाठी पाणी वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला जातो. 

आमचे गाव विविध विकास योजना राबविण्यात यशस्वी झाले आहे. त्यात सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. शासकीय योजनांचीही प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 
- ललिता प्रवीण महाजन, सरपंच 

आदर्श योजनेत आम्ही भरीव काम केले आहे. गावातील सर्वांनी स्वच्छता, शेतीविकास, करवसुली, साक्षरता या बाबींवर भर दिला. शासकीय यंत्रणांचीही मोठी मदत झाली. 
राजेंद्र साहेबराव चौधरी- 
माजी जिल्हा परिषद सदस्य, ९४२२२८४५०२

  
एकी, सहकार्य व योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय ग्रामविकास होत नाही. हेच सूत्र लक्षात घेऊन आम्ही काम केले. त्यातून विविध योजना यशस्वी झाल्या. 
 राजकुमार पंढरीनाथ चौधरी, माजी सरपंच, ९२२६१५८७३७   

गावाच्या विकासात प्रत्येक ग्रामस्थाचे योगदान आहे. ज्या ज्या वेळी कुठली योजना आणायचा विषय झाला त्या त्या वेळी प्रत्येकाचा प्रतिसाद सकारात्मक होता. यातूनच पाणी, स्वच्छता या संदर्भात चांगले काम झाले. 
प्रवीण रघुनाथ महाजन, पोलिस पाटील 

शासन सर्वांसाठी आहे, फक्त शासनाचा ग्रामविकासाचा हेतू, उपक्रम यांची जाणीव करून घेऊन योजना खऱ्या अर्थाने ग्रामस्थांपर्यंत पोचवायला हव्यात. याच विचारातून गावात विधायक काम झाले.
- के. ए. भंगाळे, ग्रामसेवक 

आमचे गाव आजघडीला अनेक पुरस्कार प्राप्त करून ग्रामविकासात सर्वांच्या पुढे आहे. त्यासाठी शासन, गावातील शेतकरी, महिला वर्ग अशा सर्व घटकांचे सहकार्य मिळाले. 
- अशोक लक्ष्मण शिंदे, ग्रामस्थ , ‘निर्मलग्राम’ सहभागातील ठळक बाबी 

गाव निर्मळ, सुंदर व्हावे यासाठी एकी केली 
ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करून प्रमुख रस्ते मोकळे करणे, रस्तेविकास यांचा आराखडा तयार केला
गावातील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण. आजच्या घडीला ९५ टक्के रस्त्यांचे काम पूर्ण
शौचालयांची सुविधा नव्हती त्यांच्यासाठी सार्वजनिक शौचालये उभारली. त्याच्या वापराचा टक्का ९८  टक्‍क्‍यांपर्यंत पोचला. 
स्वच्छतेचा संस्कार रुजविण्यात आला. 
या संदर्भात प्रभावशाली काम केल्याने २०००८ मध्ये निर्मलग्राम पुरस्कार
गावाच्या वेशीवर भव्य प्रवेशद्वार आहे. त्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा वड, पिंपळ, कडूनिंब व अन्य वृक्ष लावून त्यांचे संवर्धन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news phulgaon Villager jalgaon