नागपुरात बटाट्याचे दर स्थिर

विनोद इंगोले
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर - मध्य प्रदेशसह राज्याच्या विविध भागातून होणारी बटाट्याची आवक वाढती असल्याने गेल्या आठवड्यात बटाट्याचे दर स्थिर होते. यापुढील काळातदेखील त्यात फार वाढ होईल, अशी शक्‍यता नसल्याचे व्यापारी सांगतात. 

नागपूर - मध्य प्रदेशसह राज्याच्या विविध भागातून होणारी बटाट्याची आवक वाढती असल्याने गेल्या आठवड्यात बटाट्याचे दर स्थिर होते. यापुढील काळातदेखील त्यात फार वाढ होईल, अशी शक्‍यता नसल्याचे व्यापारी सांगतात. 

बाजारात गेल्या आठवडाभरात बटाट्याची दररोजची सरासरी आवक ३ हजार क्‍विंटलची आहे. ऑगस्ट महिन्यात ही आवक साडेचार हजार क्‍विंटलपर्यंत पोचली. येत्या काळात बटाटा आवक वाढण्याची चिन्हे असल्याने दरात वाढीची शक्‍यता फारच कमी असल्याचे व्यापारी सूत्र सांगतात. मात्र मागणी वाढल्यास बटाटा दरात अत्यल्प अशी १०० ते १२५ रुपये प्रती क्‍विंटलची वाढ होईल. बाजारात कांद्याच्या दरात काही अंशी तेजी आहे. गत आठवड्यात कांदा अवघा ८ ते १० रुपये किलोने विकल्या गेला. या आठवड्यात मात्र कांद्याची विक्री ३५ ते ४० रुपये किलोने होत आहे. मागणी आणि आवकमधील तफावतीमुळे हे घडले आहे. यापुढील काळात कांदा आणखी वधारण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली. लाल कांद्याची बाजारातील आवक १००० तर पांढऱ्या कांद्याची १३०० क्‍विंटलपर्यंत आहे. लसणाची सरासरी आवक १००० क्‍विंटल असून दर २००० ते ४००० रुपये प्रती क्‍विंटलवर स्थीर आहेत. अद्रक (आले) आवक मध्ये मोठे चढउतार गेल्या आठवड्यात झाले. आवक कमी जास्त होत असली तरी दर मात्र स्थिर आहेत. २००० ते ३५०० रुपये प्रती क्‍विंटलने आल्याचे व्यवहार होत आहेत. आल्याची आवक ४९५ ते १५०० क्‍विंटल होत आहे. ५००० ते ६००० रुपये प्रति क्‍विंटल असलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण सुरू झाली आहे. ३५०० ते ४००० रुपये प्रत क्‍विंटलवर टोमॅटो पोचला आहे. 

गव्हाचे दर स्थिर
बाजारात सरबती गव्हाचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. दररोज प्रती क्‍विंटल २०० याप्रमाणे गव्हाची आवक आहे. दर २२०० ते २६०० रुपये प्रती क्‍विंटल असा स्थिर आहे. यात तेजीची शक्‍यता तूर्तास नसल्याचे व्यापारी सांगतात. लुचई तांदूळ २०० ते २५० क्‍विंटलची आवक असून २००० ते २३०० रुपयांवर हा तांदूळ गेल्या आठवड्यापासून स्थिर आहे. हरभऱ्यात काहीशी तेजी आल्याचे चित्र आहे. ४४०० ते ५१७२ रुपये प्रति क्‍विंटलचा दर हरभऱ्याला मिळाला. तूर ३४०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहे.

Web Title: agrowon news potato nagpur