पावसामुळे भातशेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पिरंगुट, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - मारणेवाडी (ता. मुळशी) येथे १५ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने भात पिकासह शेतजमीन वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

पिरंगुट, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - मारणेवाडी (ता. मुळशी) येथे १५ ऑक्‍टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने भात पिकासह शेतजमीन वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मारणेवाडी परिसरातील भात पीक सध्या काढणीला आलेले आहे, मात्र अचानक ढगफुटी झाल्याने भात शेतातील उभ्या पिकावर डोंगरातून वाहून आलेले दगड, गोटे, माती, झाडे यांचा थरच बसला आहे. अवघे पीक माती आणि दगडगोट्यांखाली गाडल्याने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे. असे असूनही शासनाचा एकही प्रतिनिधी या अस्मानीकडे फिरकलादेखील नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने येथील नुकसानाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि भरपाई द्यावी, अशी मागणी मारणेवाडीचे माजी उपसरपंच रामदास पोळेकर यांनी केली आहे. 

मारणेवाडी येथील बहुतांशी शेतकऱ्यांच्या भात पिकात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने काढणीला आलेले पीक भुईसपाट झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटलेले आहेत. भात पीक वाहून गेलेले आहे. येथील शेतकरी भाऊसाहेब तुकाराम मारणे यांच्या सुमारे एक एकर क्षेत्रातील भात पिकावर डोंगरातून वाहून आलेले गोटे व मातीचा थर साचला आहे. सगळेच पीक गाडल्याने मोठे नुकसान झाले आहे.  

याबाबत उरवडे येथील तलाठी उज्ज्वला पवार म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामांसाठी महसूल विभागाची यंत्रणा अडकल्याने परिसरातील नुकसानाची पाहणी करता आलेली नाही. मात्र मारणेवाडी तसेच परिसरातील नुकसानाची पाहणी करून पंचनामे केले जातील व शासनाला त्याचा अहवाल सादर केला जाईल.’’

Web Title: agrowon news rain Paddy field damage