भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड जमीन सुधारणा 

भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड जमीन सुधारणा 

सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी व खतांचा अतिवापर झाल्याने क्षारपड जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. ही जमीन पिकाऊ व सुपीक बनवण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील आहेत. वाळवा तालुक्यातील उरुण इस्लामपूर येथील अभिजित बाळासाहेब पाटील हा त्यापैकीच युवा शेतकरी. 

जमीन सुधारण्यासाठीचे प्रयत्न
अभिजित यांचे एम.कॉम.पर्यंत शिक्षण झाले आहे. इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ते सध्या क्‍लार्क आहेत. त्यांचे वडील शेतीच करायचे. एकूण शेती सात एकर. 

त्यातील पाच एकर क्षारपड होती. त्यामुळे ती असून नसल्यासारखी होती. दोनच एकरांत काय ते उत्पन्न मिळायचे. त्यामुळे आर्थिक ताणही जाणवायचा. प्रगतिशील विचारांचे अभिजित यांनी हीच पाच एकर क्षारपड जमीन सुधारण्याचे ठरवले. 

विचारांना कृतीची दिशा मिळाली 
सांगली शहरापासून जवळच असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने भूमिगत निचरा प्रणाली तंत्राचा विकास केला आहे. ही माहिती इस्लामपूर नजीकच्या कै. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याकडून अभिजित यांना मिळाली. त्यांनी संशोधन केंद्रात धाव घेतली. तेथे निचरा प्रणालीचे कार्य, खर्च आदी सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, मुंबई येथील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था  शेतकऱ्यांना याच प्रणालीविषयी शेतकऱ्यांत जागृती करीत होती. अभिजित यांना नेमक्या याच काळात या तंत्राची व त्याबाबत मदत करणाऱ्या तज्ज्ञांची गरज होती. विचारांना कृतीची दिशा मिळाली. त्यानुसार संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर अभिजित यांच्या शेतात तंत्राचा वापर करण्याचे नक्की केले. मुख्य म्हणजे त्याचा खर्चही संस्थाच करणार होती. 

 या होत्या अडचणी  
जमीन क्षारपड असल्याने उगवण क्षमता कमी होती. 
 पाणी साचून राहत असल्याने निचरा होत नसे 
 शेती पडून होती 
 ऊस उत्पादकता केवळ १५ ते२० टन होती. 

त्यासाठी केला भूमिगत 
निचरा प्रणाली तंत्राचा वापर 

 पाच एकर क्षारपड क्षेत्र निश्चित केले. 
 संपूर्ण क्षेत्राचा आवाका लक्षात घेऊन जमिनीत तीन फूट खोल पाइप बसविली. 
 यात सुमारे चार पाइप्स वापरल्या. प्रत्येकी दोन पाइपमध्ये ६० फूट अंतर ठेवले.
 पाइपची लांबी सुमारे सहाशे ते सातशे फूट होती.   
 समांतर निचरा प्रणाली पद्धत वापरली. 
 
  या झाल्या सुधारणा  
जमिनीची सुपीकता वाढू लागली 
 वाफसा लवकर येऊ लागला 
 पांढऱ्या मुळींची वाढ झाली 
 एकरी उत्पादन वाढू लागले 

त्याची आकडेवारी (एकरी)  
पीक      पूर्वी    सद्यःस्थितीत 
हरभरा    २ ते ३.३ क्विंटल     ९ क्विंटल
सोयाबीन    ६ क्विंटल         १५ क्विंटल 
ऊस    १५ ते २० टन    ५० ते ६० टन 

या गोष्टींची घेतली जाते काळजी  
 मशागत ३५ एचपी ट्रॅक्‍टरच्या वापराने. त्यामुळे शेताचा तुडवा होत नाही 
 तणनाशकांचा वापर टाळला जातो 
 कुट्टीद्वारे पाला मातीआड केला जातो 
 गरजेएवढाच पाण्याचा व हिरवळीच्या खतांचा वापर 

क्षारपड जमिनीत विक्रमी उत्पादन 
क्षारपड जमिनीची सुधारणा केलेल्या शेतात २०१६-१७ च्या सुरू हंगामात उसाचे ३४ गुंठ्यात ९४.९४२ टन उत्पादन (हेक्टरी २७९. २४ टन) घेण्यात अभिजित यशस्वी झाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे (व्हीएसआय, पुणे) दक्षिण विभागात सुरू उसाचे अधिक उत्पादन मिळवल्याबद्दल ऊसभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्माान करण्यात आला आहे. 

 अभिजित बाळासाहेब पाटील, ८२७५५९२२९३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com