जीएसटीमुळे बेदाणा सौदे प्रभावित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

सांगली - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) परिणाम बेदाण्याच्या सौद्यावर झाला आहे. बाजार समितीत बेदाण्याची आवक घटली आहे; तर व्यापारी जीएसटीच्या नोंदणीत व्यस्त आहेत. अद्यापही या कराबाबत स्पष्टता नसल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी सौदा करण्यासाठी धजावत नाहीत, असे चित्र दिसते आहे. 

सांगली - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) परिणाम बेदाण्याच्या सौद्यावर झाला आहे. बाजार समितीत बेदाण्याची आवक घटली आहे; तर व्यापारी जीएसटीच्या नोंदणीत व्यस्त आहेत. अद्यापही या कराबाबत स्पष्टता नसल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी सौदा करण्यासाठी धजावत नाहीत, असे चित्र दिसते आहे. 

तासगाव बाजार समिती हे बेदाण्याचे आगार आहे. जीएसटीनंतर सौदे सुरू झाले आहेत. मात्र, तासगाव आणि सांगली बाजार समितीत बेदाण्याची आवक मंदावली आहे. या करप्रणालीमुळे बेदाण्याचे दर वाढणे अपेक्षित होते. असे न होता बेदाण्याचे दर कमी झाले असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बेदाण्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तासगाव बाजार समितीत गुरुवारी (ता. ६) ३८० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यापैकी २५० टनाची विक्री झाली आहे. हिरवा बेदाणा ९५ ते १३५, पिवळा बेदाणा ९० ते १३० आणि काळा बेदाणा २५ ते ६० रुपये प्रति किलो असे दर मिळाले. 

मुळात यंदाच्या हंगामात बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यातच बेदाण्यावर जीएसटी लावण्यात आली. तरीसुद्धा बेदाण्याचे दर वाढणार अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात सौदे सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आले की, बेदाण्याचे दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे बेदाणा सौद्यामध्ये न काढता शीतगृहामध्ये ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. बेदाण्याचे दर कमी झाल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

मागणीत घट
बेदाण्याला ५ टक्के जीएसटी आकारणी केली जात आहे. यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांनी बेदाणा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. सध्या या भागातील बेदाणा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

व्यापारी तुपाशी, शेतकरी उपाशी
बेदाण्यावर ५ टक्के जीएसटी लावला आहे. तो कर शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांकडून कमी दरात बेदाणा खरेदी करून तो ग्राहकांना जीएसटी लावून विक्री केल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. एकीकडे शेतकऱ्यांना दर कमी मिळत असताना ग्राहकांकडून जीएसटी वसूल करून व्यापारी मात्र ‘तुपाशी’आहेत. जीएसटीमुळे बेदाणा सौदे प्रभावित याचवेळी शेतकरी बेदाण्याचा दर कमी झाल्याचा दावा करत आहेत. तर व्यापारी दर वाढल्याचे ठाम पणे सांगत आहेत. यामुळे व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती आहे. 

जीएसटीमुळे बेदाणा विक्रीसाठी नेला नाही. दर वाढण्याएेवजी कमी झाले आहेत. पुढील आठवड्यात बेदाणा विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन जाणार आहे. दर कसा मिळतो याची चिंता लागली आहे.
- बी. आर. यादव, बेदाणा उत्पादक, चिकोडी, बेळगाव

Web Title: agrowon news sangli news GST