अल्पभूधारक दांपत्याची  प्रेरणादायी शेती

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

भौगोलिकदृष्ट्या पूर्णपणे डोंगराळ आणि सागरी किनाऱ्यावर असणाऱ्या कोकणातील अनेक जिल्ह्यांत हेच चित्र दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथील बागवे दांपत्य म्हणजे केवळ दोन एकर शेती असलेले म्हणजे अल्पभूधारक शेतकरी. मात्र वर्षभर दोन हंगामांत एका एकरात विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत त्यांनी उत्पन्नाचा स्राेत कायम वाहता ठेवला आहे. थेट विक्री व जोडीला जांभूळ, देशी अंडी यांच्या विक्रीतूनही उत्पन्नाला जोड दिली आहे. 

(संतोष बागवे, ९६५७४०३५२०,  ९४०४२१८७०३)

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली या मुख्य शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर कसाल (ता. कुडाळ) हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील गांगुची राई या भागात बागवे कुटुंब राहते. संतोष, पत्नी संजना व दोन मुले असा हा परिवार आहे. पदवीधर झाल्यानंतर काही काळ नोकरी करण्याचा प्रयत्न संतोष यांनी केला. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने आहे त्याच शेतीतून अर्थार्जनाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.
  
एक एकरातील जिद्दीची शेती 
बागवे कुटुंबाची शेती आहे केवळ दोनच एकर. त्यातील एक एकर क्षेत्र तर काजू, पपई, लिंबूच्या झाडांनी सामावले आहे. उर्वरित क्षेत्र केवळ एक एकर. पण बागवे कुटुंबाची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. ते क्षेत्र त्यांनी भाजीपाला पिकांसाठीच राखीव ठेवले आहे. हेच क्षेत्र वर्षभरातील उत्पन्नाचा मुख्य स्राेत आहे. बागवे दांपत्य वर्षभर शेतात अथक कष्ट करीत असते. 

भाजीपाला पिकांचे वर्षभराचे नियोजन  
वर्षभरात पावसाळा व उन्हाळा अशा दोन हंगामांत भाजीपाला पिकवला जातो. पावसाळा हा कोकणातला मुख्य हंगाम. या हंगामात पडवळ, दोडका, कारली, काकडी, भेंडी, भोपळा, चिबूड अशी पिकांची विविधता असते. अर्थात त्यासाठीचे क्षेत्र पाच ते दहा गुंठ्यांपुरतेच मर्यादित असते. 

खरे तर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू लागते. पण विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर भाजीपाला घेण्याची कसरतही हे दांपत्य करते. उन्हाळ्यात मुळा, वांगी, नवलकोल, मोहरी, वाल, मिरची आदी पिके घेतली जातात. काही वेळेला आंतरपिकेही घेतली जातात.  

कामांना वेळही पुरत नाही 
कोकणातदेखील मजुरांची व दराची समस्या मोठी आहे. मग संतोष व संजना हेच दोघे शेतात अधिकाधिक राबतात. अगदी गरजेएवढीच मजुरांची मदत घेतात. दुपारी तीननंतर शेतमाल काढणीचे नियोजन सुरू होते. पालेभाज्यांच्या पेंढ्या करणे, त्या व्यवस्थित ठेवणे, फळभाज्या निवडून त्या एकत्र ठेवणे अशी एकेक कामे आवरत रात्रीचे दहा, अकरा कधी वाजतात हेदेखील समजत नाही. 

पतीला आधार देणाऱ्या संजनाताई  
संजनाताई दहावी शिकलेल्या. माहेरी असल्यापासूनच कष्टाची सवय. पती संतोष यांना शेतीत त्यांनी समर्थ साथ आणि आधार दिला. एकत्रित प्रयत्न व एकमेकांबाबतचा जिव्हाळा याच बाबी त्यांचा संसार समाधानी करण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.  

मुलांना चांगले शिक्षण  
बागवे दांपत्याची दोन्ही मुले इंग्लिश माध्यमात शिकतात. प्रथमेश दहावीत तर श्रावणी आठवीत शिकते. सुटीच्या दिवशी दोघे आई-वडिलांना शेतीत शक्‍य ती मदत करतात. 
 भाजीपाला शेतीचा अभिमान

बागवे दांपत्याला आपल्या शेतीचा अभिमान आहे. गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत कमी क्षेत्रातील भाजीपाला शेतीत सातत्य ठेवले आहे. चांगले अर्थार्जन केले  आहे.    

बागवे दांपत्याचे कुशल व्‍यवस्थापन   
 आठवड्याचे पाच दिवस बाजारात बसूनच हातविक्री.
 विक्री संपल्यानंतर दुपारनंतर पुन्हा भाजीपाला काढणीची तयारी. रात्रीपर्यंत काम सुरू.  
 महिन्याला सुमारे पंधरा हजार रुपयांपर्यंतचे सर्वसाधारण उत्पन्न एकरातील भाजीपाला पिकांतून मिळते. याच जोडीला उन्हाळ्यात जांभूळ विक्री केली जाते. अन्य शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून तो वाशी मार्केटला पाठविण्याचे काम संतोष करतात. किलोला ६० ते ७० रुपये दर मिळतो. त्यातूनही चांगली उलाढाल होते. 
 घरच्या २० कोंबड्या आहेत. आठवड्याला देशी अंड्यांच्या विक्रीतून दोनशे-तीनशे रुपये हाती येतात.
 बागवे सांगतात की भाजीपाला विक्रीतून दिवसाला एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंतची कमाल कमाई होते. अर्थात तेजी-मंदीवर ही बाब अवलंबून असते. 
 गणेशोत्सव काळात मुंबइतील चाकरमानी हमखास गावी येत असतो. यातच श्रावण महिना असल्याने भाजीपाल्याची मागणी अधिक असते. त्यावेळी विक्री व पर्यायाने उत्पन्नातही वाढ होत असल्याचे संतोष म्हणाले. अशीच स्थिती मार्गशीर्ष महिन्यातही असते.  

सर्व विक्री  थेट ग्राहकांना  
सर्व भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकांना करण्याचाच बागवे दांपत्याचा शिरस्ता आहे. सकाळी आठच्यादरम्यान घरातील सर्व कामे आवरून आठवड्याची बाजारपेठ गाठली जाते. कसाल हीच जवळची मुख्य बाजारपेठ आहे. त्याशिवाय आमरद, ओरोस, कणकवली यादेखील अन्य बाजारपेठा आहेत. ज्यावेळी संतोष बाजारात विक्रीस जातात त्यावेळी संजना शेती पाहतात, आणि संजना जेव्हा बाजारपेठेत जातात त्यावेळी संतोष शेतीची कामे करतात. दोघांमधील हा समन्वयच महत्त्वाचा ठरला आहे. 

क्षेत्र अल्प असले तरी त्यातूनही संसार चांगल्या प्रकारे फुलवता येतो हे बागवे कुटुंबीयांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांची शेती दिशादर्शक ठरावी यासाठी आम्ही आवश्यक तंत्रज्ञानाचे सहकार्य आमच्या केंद्रामार्फत देत आहोत.
- डॉ. विलास सावंत, विशेष विशेषज्ञ (विस्तार), कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग 

Web Title: agrowon news santosh bagwe story