शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजना

गणेश कोरे
रविवार, 25 मार्च 2018

दुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम पर्याय आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविल्या जातात.

महामंडळाची राज्यामध्ये पडेगाव (जि. औरंगाबाद), बिलाखेड (जि. जळगाव), दहीवडी, (जि. सातारा), महूद (जि. सोलापूर), रांजणी (सांगली), अंबेजोगाई (जि. बीड), मुखेड (जि. नांदेड), तीर्थ (जि. उस्मानाबाद), पोहरा (जि. अमरावती), बोंद्री (जि. नागपूर)  ही  केंद्रे कार्यरत आहेत.

सुधारित जातीचे मेंढे नर व बोकड यांचे पैदाशीकरिता वाटप 
महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रावर डेक्कनी व माडग्याळ जातीच्या मेंढ्या, तसेच उस्मानाबादी, संगमनेरी व बेरारी जातीच्या शेळ्या आहेत. प्रक्षेत्रावर शेळ्या-मेंढ्यांची पैदास करून त्यापासून उत्पादित होणारे जातिवंत उस्मानाबादी, संगमनेरी व बेरारी जातीचे सुधारित बोकड व डेक्कनी व माडग्याळ जातीचे सुधारित मेंढेनर स्थानिक शेळ्या, मेंढ्यांची गुणवत्ता सुधारण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येतात.

मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण  
 महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर मेंढी आणि शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापनाचे तीन दिवसाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाची सोय उपलब्ध. 
 गोखलेनगर, पुणे येथील मुख्यालयाच्या ठिकाणी शेळी-मेंढी पालनाचे प्रशिक्षणाची सोय.
यांत्रिक लोकर कातरणी 
 महामंडळामार्फत विजेवर चालणाऱ्या यंत्राद्वारे मेंढ्यांची लोकर कातरणी करून दिली जाते.

लोकर खरेदी आणि लोकरीच्या  वस्तूची निर्मिती व विक्री  
 महामंडळ मेंढपाळांकडील लोकर खरेदी करून त्या लोकरीपासून स्थानिक उत्पादकांकडून जेन निर्मिती करून घेण्यात येते. त्यामुळे स्थानिकरीत्या स्वयंरोजगार निर्माण होण्यास मदत होत आहे. 
 महामंडळामार्फत लोकरीच्या शाली, ब्लॅंकेट्‌स, सतरंज्या, गालीचे, आसने, जेन इ. वस्तूंची निर्मिती करून त्याचा ग्राहकांना पुरवठा करण्यात येतो.

सुधािरत जातीचे चारा बियाणे  व संकरित गवत ठोंबांचे उत्पादन व पुरवठा 
 महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या-मेंढ्यांकरिता उपयुक्त असलेले सुधारित जातीचे चारा बियाणे 
व संकरित गवतांचे ठोंब उत्पादित करून शेळी-मेंढी पालकांना रास्त दरात उपलब्ध करून दिले जातात.

शेळी-मेंढी पालन व्यवस्थापन व उपयुक्त चारा पिकांचे अभ्यागतांस प्रात्यक्षिके 
 महामंडळाच्या प्रक्षेत्रावर राज्यातील विविध भागांतील भेटी देणाऱ्यांना शेळी पालन व्यवस्थापन व सुधारित जातीच्या चारा पिकांचे प्रात्यक्षिके दाखविली जातात.

पैदासक्षम शेळ्या-मेंढ्यांचे गटवाटप  
 शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळी-मेंढीपालन योजनेंतर्गत लाभार्थींना वाटण्यात येणाऱ्या पैदासक्षम मेंढ्या-शेळ्यांचे गट महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवरून लाभार्थींच्या पसंतीनुसार जिवंत वजनावर पुरविले जातात.

बकरी ईदनिमित्त बोकड वाटप कार्यक्रम 
 महामंडळातर्फे मुस्लिम बांधवांना बकरी ईद सणानिमित्त रास्त किंमतीमध्ये बोकड-मेंढेनर उपलब्ध करून देण्यात येतात.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना 
 राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 
महाराष्ट्र राज्यातील मेंढ्यांच्या संख्येत होणारी घट विचारात घेता राज्यातील मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी ‘राजे यशवंतराव होळकर महामेष योजना'' राबविण्यात येत आहे. यामध्ये खालील सहा मुख्य घटकांचा समावेश आहे.
 पायाभूत सोयी-सुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढीगट वाटप करणे.
 सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे वाटप.
 मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान वाटप.
 मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान वाटप.
 कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास बनविण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान वाटप.
 पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप.
 टीप ः या योजनेअंतर्गत चालू वर्षात प्राप्त झालेल्या निधीमधून प्रथम स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता २० + १ मेंढी गट वाटप सुरू आहे.

केंद्रीय लोकर विकास मंडळ वस्रोद्योग मंत्रालय, जोधपूर पुरस्कृत मेष व लोकर सुधार कार्यक्रम 
 महाराष्ट्र राज्यातील डेक्कनी जातीच्या मेंढ्याची उत्पादकता वाढविण्यासाठी मेष व लोकर सुधार प्रकल्पांतर्गत नगर, नाशिक, धुळे, पुणे, सांगली व सोलापूर या जिल्ह्यामधील ३३११ मेंढपाळांच्या तीन लाख मेंढ्या दत्तक घेण्यात आल्या अाहेत. 
 जंतनाशक पाजणे, बाह्य कीटक निर्मूलन, लसीकरण, आजारी मेंढ्यांचे उपचार इ. सुविधा पुरविण्यात येत आहेत.
 स्थानिक मेंढ्यांची प्रतवारीमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता जातिवंत मेंढेनर पैदाशीकरिता वाटप करण्यात येत आहे. 
 ः ०२० - २५६५७११२
(पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news schemes for goats and sheep