सोयाबीनचे दर नीचांकी पातळीवर

सोयाबीनचे दर नीचांकी पातळीवर

अकोला - या हंगामात सोयाबीनचे दर गेल्या दहा वर्षांत सर्वांत नीचांकी पातळीवर उतरले आहेत. बाजारपेठेत १४०० ते २५०० दरम्यान सोयाबीन विकत असून, बहुतांश शेतकऱ्यांना सरासरी दोन हजारांचाही दर मिळवताना त्रास होत आहे. त्यातच उत्पादकतासुद्धा अवघी एक ते चार क्विंटलपर्यंत असल्याने अनेकांना उत्पादन खर्चही निघेनासा झालेला आहे. 

या हंगामात सोयाबीनची आवक सुरू झाल्यापासून बाजारातील सोयाबीनचे दर घसरले आहेत. दरवर्षी कृषी निविष्ठा, मजुरी, मशागतीचे दर वाढत असताना सोयाबीनच्या दरात मागील दोन ते तीन वर्षांपासून फारशी वाढ झाली नाही. या वर्षी ३०५० रुपयांचा हमीभाव जाहीर झालेला असताना सातत्याने सोयाबीन सरासरी २२०० ते २५०० दरम्यान विकत आहे.  २५०० हा दर अत्यंत मोजक्‍या सोयाबीनला मिळत आहे. गेल्या वर्षीही दिवाळीपूर्वी सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठे तहसीलदारांच्या दालनात टाकले होते तर कुठे जिल्हाधिकाऱ्यांना सोयाबीन भेट दिली होती. या वर्षी तर त्यापेक्षाही बिकट स्थिती आहे. 

पावसामुळे अनेकांचे सोयाबीन काळवंडले असून, शासनाचा हमीभाव मिळवायचा असेल तर एफएक्‍यू दर्जाचा माल लागतो. धान्य काळवंडल्याने यामध्ये बसत नाही. पर्यायाने खुल्या बाजारात व्यापारी मनमानी भावाने सोयाबीनची खरेदी करू लागले आहेत. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. बाजार समित्यांमध्ये खुलेआम हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. राज्यात सोयाबीनला २०१५-१६ मध्ये १६०० व त्याआधी २००८-०९ मध्ये १८०० रुपये क्विंटल हा कमीत कमी दर मिळाला होता. आता त्याहीपेक्षा नीच्चांकी दरांनी खरेदी सुरू झाली आहे. अवघे १४०० रुपयांपासून बोली लागत आहे. दरवर्षी उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे, तर सोयाबीनची आवक वाढल्याने बाजार समित्यांचे यार्ड ओसंडून वाहत आहेत.

सोयाबीनचे वर्षनिहाय हमीभाव व प्रत्यक्ष दर
२००८-०९ ला हमीभाव १३९० रुपये क्विंटल होता. तेव्हा सोयाबीन १८०० ते २६०० रुपये क्विंटल विकले. यानंतर दुसऱ्या वर्षी हमीभाव १३१० केल्या गेला. तरी सोयाबीन दोन हजार ते २७०० रुपये विकले. यानंतर २०१३-१४ मध्ये हमीभाव २५०० वर पोचला. या वर्षी सोयाबीन ३७०० पर्यंत पोचले. या वर्षासाठी आजवरचा सर्वाधिक ३०५० रुपये हमीभाव जाहीर झालेला आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारात केवळ १४०० ते २५०० पर्यंतच भाव मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com