मशागतीपासून मळणीपर्यंतचे  श्रम यंत्रांमुळे झाले कमी 

मशागतीपासून मळणीपर्यंतचे  श्रम यंत्रांमुळे झाले कमी 

सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका आहे. बहुतांशी भागांत उतारावरची शेती आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने भात हे तालुक्याचे प्रमुख खरीप पीक आहेे. पाटणपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेले कातवडी हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. विहीर व शेततळ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्याची सोय करून शेती बागायती केली आहे. 

पराडकर यांचा यांत्रिकी शेतीचा वारसा 
कातवडी येथील सुभाष महादेव पराडकर हे जुनी अकरावी झालेले ६९ वर्षे वयाचे शेतकरी. तसे त्यांचे सहा भावांचे मोठे कुटुंब होते. दोन भावांचे निधन झाले असून, आज चार भावांची मिळून सुमारे ३० एकर शेती आहे. घरची सदस्यसंख्या सुमारे वीस आहे. सुभाषराव (दुसऱ्या क्रमांकाचे बंधू) यांचे वडील महादेव पराडकर प्रगतशील शेतकरी होते. सन १९७४ मध्ये त्यांनी भात पीक प्रात्यक्षिक स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्या काळातच यांत्रिकीकरणाची गरज ओळखून सन १९७५ मध्ये ट्रॅक्टरची खरेदी त्यांनी केली होती. वडिलांचाच यांत्रिकी शेतीचा वारसा पुढे मुलांनी चालवला, तो आजही कायम आहे. 

पराडकर यांची  यांत्रिक शेती दृष्टिक्षेपात 
    एकूण क्षेत्र- सुमारे ३० एकर. 
पीकपद्धती  

    भात- सुमारे ८ ते १० एकर - (रोपलावणीचा)
    ऊस- तीन ते चार एकर
    भातानंतर गहू, उन्हाळी भुईमूग आदी पिके.
    शेतीतील नवनवीन बदल स्वीकारत यांत्रिकीकरणावर भर दिलाय
    शेती जास्त असल्याने मजूर जास्त लागायचे. त्यावर पर्याय म्हणून आवश्यक विविध ८ ते १० यंत्रे. उदा. टॅक्ट्रर, रोटर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, पल्टी नांगर, फणपाळी, भात तसेच अन्य पिकांसाठी मळणी यंत्र, भात काढणीठी रिपर आदी.  
खरिपातील भाताचे क्षेत्र जास्त असल्याने जास्तीत जास्त यंत्रांचा वापर केला जातो. पाॅवर टिलरच्या साह्याने चिखलणी केली जाते. भात काढणीसाठी रिपरचा वापर केला जातो. काढणीनंतर भाताची मळणीही यंत्राद्वारे होते. त्यामुळे भात पूर्णपणे स्वच्छ होऊन मिळतो. यंत्राद्वारे कमी वेळेत, कमी खर्चात, तसेच दर्जात्मक कामांमुळे भाताचे उत्पादनही वाढले आहे. 

भाताचे एकरी ३० ते ४० क्विंटल, तर पूर्वहंगामी उसाचे एकरी ४० ते ५५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.  

सातत्याने नावीन्याचा शोध 
सुभाषराव सातत्याने नावीन्याचा शोध घेत असतात. कृषी विभागाकडे असलेल्या भात लावण यंत्राचा वापरही त्यांनी करून पाहिला आहे. अनेक वर्षांपासून त्यांची यंत्रांसोबत दोस्ती असल्याने यंत्रांत झालेला बिघाड देखील त्यांना अचूक कळतो व तो दुरुस्त करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे. बंधू वसंत, श्रीकांत, अशोक यांची त्यांना मोलाची साथ मिळते. 

इतर पिकांत यंत्रांचा वापर
शेतजमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटर, फणपाळी, पलटी यंत्रांचा वापर होतो. केवळ भातच नव्हे; तर गहू, ज्वारी, भुईमूग आदी पिकांसाठीही स्वयंचलित पेरणी यंत्राचा वापर केला जातो. पराडकर यांची अडीच एकर हापूस आंब्याची बाग अाहे. बागेतील आंतरमशागतीसाठी, तसेच उसाला भर लावण्यासाठी पाॅवर टिलरचा वापर होतो. जनावरांसाठी घेण्यात आलेला मकादेखील ‘रिपर’द्वारे कापला जातो. कडबाकुट्टी करून हा चारा जनावरांना दिला जातो.  

गोबरगॅस युनिटची उभारणी 
कुटुंबातील सदस्य आपापल्या पद्धतीने शेतीकामांची जबाबदारी घेतात. कुटुंबाकडे गायी, म्हशी मिळून सुमारे २५ जनावरे आहेत. गायींपासून एकूण ५० लिटर, तर म्हशींपासून सुमारे ७० लिटर दूध दररोज मिळते. स्वयंपाकाच्या गॅससाठी सन १९७२ मध्येच ‘गोबरगॅस युनिट’ची उभारणी केली. गरजेनुसार या युनिट्सची संख्या तीनवर नेली आहे. 

दोन शेततळ्यांतून ‘ग्रॅव्हिटी’द्वारे सिंचन 
पाटण तालुक्यात सर्वाधिक पाऊस होत असला तरी रब्बीनंतर या भागात पाणीटंचाई जाणवू लागते. त्यामुळेच सन २००६-०७ मध्ये प्रत्येकी ७५ लाख लिटर क्षमतेची दोन शेततळी घेतली. वीज असताना जलस्रोतांतून शेततळी भरून घेतली जातात. शेततळी उंचावर आहेत. त्यामुळे वीजभारनियमन असताना तीस एकरांतील शिवाराला सायफन किंवा ग्रॅव्हिटी पद्धतीने पाणी देणे शक्य होते. या पद्धतीने प्रत्येक प्लॉट किंवा पिकाला स्वतंत्र पाइपलाइन किंवा सबलाइन केली आहे.

शेतीतील यांत्रिकीकरणाने साधले हे फायदे  
 ट्रॅक्टरचलित भातमळणी यंत्राद्वारे तासाला सहा ते सात क्विंटल भात मळून, स्वच्छ करून मिळतो. पारंपरिक उफणणी पद्धतीत याला खूप कालावधी लागतो. तसेच, वारा असेल तर हे काम सोपे होते. 

भातात चिखलणीचे पारंपरिक काम सुमारे १५ दिवस चालते. पॉवर टिलरच्या वापराने हेच काम केवळ काही तासांमध्ये पूर्ण होते. शिवाय, बैलांची व ते चालवण्यासाठीच्या मजुरांची गरजही कमी होते. 

    भात कापायला पारंपरिक पद्धतीत एकरी १० ते १५ मजूर लागतात. ट्रॅक्टरचलित ‘रिपर’ हेच काम अवघ्या दोन तासांत करते, तेही एका मनुष्याच्या साह्याने. त्यासाठी दोन तासांसाठी केवळ दोन लिटर डिझेल लागते. याचे अर्थकारणच पाहायचे तर पारंपरिक पद्धतीत १५ मजुरांची मजुरी प्रति १५० रुपये याप्रमाणे २२५० रुपये कापणीला लागले असते. हेच काम यांत्रिक पद्धतीत डिझेल व एक मनुष्य या पद्धतीत साधारण चारशे रुपयांमध्ये होते. 

    इलेक्ट्रिक यंत्राद्वारे (१० एचपी क्षमता) सोयाबीनची मळणी तासाला ३ ते ४ क्विंटल, तर ज्वारीची सहा ते सात क्विंटल या प्रमाणात होते.   

    मजुरांच्या खर्चात मोठी म्हणजे ५० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे.

    शेतीतील सर्व कामे वेळेत होत असल्याने व्यवस्थापनाचा दर्जा सुधारून उत्पादनही गुणवत्तापूर्ण घेणे शक्य झाले आहे.

    स्वतःची गरज पूर्ण करून अन्य शेतकऱ्यांनाही भाडेतत्त्वावर ही यंत्रे दिली जातात. त्यातून अतिरिक्त उत्पन्न स्रोत तयार झाला आहे
 

सुभाष पराडकर, ९७६५६२९४३१ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com