साग वृक्षांची दर्जेदार रोपनिर्मिती आवश्‍यक

साग वृक्षांची दर्जेदार रोपनिर्मिती आवश्‍यक

उत्तम दर्जाची रोपवने तयार करण्यासाठी चांगले गुणधर्म असणाऱ्या झाडाचे बी गोळा करणे महत्त्वाचे असते. काही वनांत बीजोत्पादनासाठी अशा निवडक झाडांना खुणा करून जननवृक्षांची जोपासना केली जाते. त्यांपासून निर्मित रोपट्यांच्या रोपवनांना बीजमळे असे म्हणतात. मात्र त्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात चांगल्या वृक्षांपासून खालील पद्धतीने बिजोत्पादन क्षेत्र तयार करतात. 

बीजसंकलन ः जानेवारी ते मार्च महिन्यात सागाच्या झाडांखालील जागा स्वच्छ करून पडलेली सागाची फळे (साधारणपणे १ सें.मी. व्यास) गोळा करतात. झाडावर राहिलेली फळेही काठीने पाडून गोळा करतात. नंतर फळे पोत्यामध्ये किंवा कोठींमध्ये साठवून ठेवतात. रोपवाटिकेत लावण्यापूर्वी बीजप्रक्रिया केली जाते.

साग रोपवाटिका 
रोपवाटिका तयार करण्यापूर्वी खालील बाबींचा विचार करावा. 
रोपवाटिका ही सागाची झाडे लावावयाच्या शेताजवळ असावी.
मजुरांची पुरेशी उपलब्धता असावी.
रोपवाटिका समतल जागेवर असावी; तसेच जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा व्हावा. 
रोपवाटिकेसाठी मुबलक पाणीपुरवठा असावा.
मोकाट जनावरांपासून संरक्षणासाठी कुंपण असावे.

रोपवाटिकेसाठी मशागत 
रोपवाटिका तयार करण्यासाठी जमीन चांगली नांगरून घ्यावी. त्यानंतर ती ३० सें.मी. खोल खोदून घ्यावी. झाडाची धसकटे, कचरा, इतर झाडेझुडपे, तणांची मुळे, दगड खोदून शेताबाहेर टाकून द्यावीत. कोळपणी करून मातीची ढेकळे बारीक करावीत. जमीन महिनाभर तशीच ठेवावी. जमिनीत वाळू व सेंद्रिय खतांचे २:१ या प्रमाणात मिश्रण करून टाकावे. अशा प्रकारे तयार केलेल्या जमिनीवर १२ मीटर लांब, १ मीटर रुंद व ०.३० मीटर (३० सें.मी.) उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर मे महिन्याच्या शेवटी १०-१५ सें.मी. अंतरावर अर्धा ते १ सें.मी. खोल सरी करून बी पेरावे. ३ ते ४ किलो प्रक्रिया केलेले प्रतिवाफा पेरावे. पेरणीनंतर २० दिवसांनी बी रुजण्यास सुरवात होते. रोपांची वाढ चांगली व्हावी म्हणून २०ः२०ः० हे रासायनिक खत ५०० ग्रॅम प्रतिवाफा या प्रमाणात द्यावे. रोपांना हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. हुमणी जमिनीत रोपाच्या मुख्य मुळाला तोडते. पाने मलूल होऊ लागल्यावरच अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कळते. नियंत्रणासाठी फोरेट १० टक्के १०० ग्रॅम प्रतिवाफा या प्रमाणात वाफा ओलवून टाकावे. एक वर्ष वयाच्या रोपांचा लागवडीसाठी वापर करावा. 

साग जड्यानिर्मिती (स्टंप) 
रोपे साधारणपणे आपल्या हाताच्या अंगठ्याएवढ्या जाडीची झाल्यावर (बुंध्याची वेढी १.५ सें.मी. ते २ सें.मी.) ती काढावीत. गादीवाफे पाण्याने भिजवून त्यातून रोपे खोदून मुळासकट उपटून काढली जातात. रोपाच्या जमिनीलगतच्या फुगीर भागास कॉलर म्हणतात. जड्या तयार करताना मुळाकडील २० सें.मी.चा भाग व खोडाचा १ सें.मी.चा भाग ठेवून उर्वरित भाग धारदार हत्याराने तोडतात. खोडाच्या बाजूस सरळ छाट देतात व मुळाकडील बाजूने तिरपा छाट देतात. छाट देताना जडीचा भाग मधूनच तुटणार (पूर्ण छाट व्हावा) नाही याची काळजी घ्यावी. जड्या तयार केल्यावर त्याची लवकरात लवकर लागवड करावी. एका वाफ्यातून सुमारे ४००-५०० चांगल्या प्रतीच्या जड्या मिळू शकतात.
 डॉ. विजय इलोरकर ः ०७१२-२५२१२७६.
(कृषी वनशेती संशोधन प्रकल्प,
 कृषी महाविद्यालय, नागपूर)

बीजप्रक्रिया
मे महिन्यामध्ये बी २४ तास पाण्यात भिजवून ठेवतात. नंतर कडक उन्हात ४८ तास वाळवतात. हीच क्रिया सतत ३ आठवडे केली जाते.
बी गरम पाण्यात ४८ तास ठेवून नंतर ते उकळत्या पाण्यात टाकतात. पाणी थंड होईपर्यंत पाण्यातच ठेवतात. या पद्धतीमुळे बियाण्याची उगवण २४ तासात होते.
काही दिवस बी पाण्यामध्ये भिजत ठेवून पेरणीकरिता वापरतात.
बी एक वर्षाकरिता उधळी असलेल्या वारुळात गाडून ठेवतात. त्यानंतर हे बियाणे पेरणीस योग्य होते.
फळाचे टरफल मऊ करण्यासाठी ते आलटून पालटून पाण्यात कुजवतात व सुकवतात. या पद्धतीचा जास्त वापर होतो. 
खड्डा पद्धतीमध्ये बी आणि पालापाचोळा व शेणमातीचा आलटून-पालटून एकावर एक थर देतात. खड्डा अशा थरांनी पूर्ण भरून त्याच्यावर रोज २१ दिवसांपर्यंत पाणी टाकतात. त्यानंतर बियाणे काढून पालापाचोळा वेगळा करून बियाणे स्वच्छ धुवून घेतात. बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणीसाठी वापरतात.  
बियाणे २० मिनिटे तीव्र (४० टक्के) सल्फ्युरीक आम्लामध्ये बुडवून ठेवतात. पेरणीपूर्वी बियाणे पाण्याने धुवून घेतात.
सिमेंटच्या ओसरीवर विटांचा १० सें.मी. जाडीचा चारीबाजूने थर करतात. त्यात बी साधारणपणे १५ ऑगस्टपासून तीन ते चार आठवड्यांपर्यंत पावसात पसरून वाळवावे. बी लाकडी चोपण्याने हलकेच बडवून त्यावरील आवरण मोकळे करावे. त्यामुळे फळाचे कठीण कवच मऊ होते. फळावरील मखमली आवरण निघून कठीण कवचावर उभ्या रेषा, चार मोकळी छिद्रे स्पष्ट दिसू लागतात.
सिमेंटच्या ओट्यावर किंवा चटईवर बियाण्याचा १० सें.मी. जाडीचा थर देतात. त्यावर सारख्या प्रमाणात पाणी देतात. त्यानंतर काही दिवसांनी बियाण्याची उगवण प्रक्रिया सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com