गावरान तूरडाळीचा तयार केला ‘अंबिका’ ब्रॅंड

विनोद इंगोले
मंगळवार, 4 जुलै 2017

यवतमाळ जिल्ह्यातील सुदर्शन देशमुख यांना सोयाबीन, तूर आदी पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून तूरडाळ निर्मिती व विक्री व्यवसायाचा सक्षम पर्याय मिळाला आहे. अस्सल चवीची गावरान तूरडाळ हे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल.

परसोडा (ता. आर्णी, जि. यवतमाळ) या गावाशी जवळची सुमारे २० खेडी जुळलेली आहेत. आर्णी-दिग्रस मार्गावर हे गाव अाहे. त्यामुळे आर्णी व दिग्रस या दोन्ही तालुक्‍यांच्या ठिकाणी जायचे असल्यास याच गावावरून जावे लागते. आर्णी येथे डाळ मिल नाही. परिणामी, शेतकऱ्यांनी एक किंवा दोन पोती तूर प्रक्रियेसाठी नेल्यास त्यावर प्रकियेस स्थानिक उद्योजकाकडून नकार मिळतो. गावातील सुदर्शन देशमुख यांनी शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेतली. त्यातूनच गावातच डाळप्रक्रिया सुरू करण्याचे ठरवले. 
 
शेतकरी गटाद्वारे उद्योगाची उभारणी 
परसोडा गावात डेबुजी शेतकरी गट कार्यरत आहे. गटाचे अध्यक्ष सुरेश गावंडे असून, सुदर्शन यांचा मुलगा विक्रम गटाचा सदस्य आहे. गटाच्या माध्यमातून तूरडाळ प्रक्रियेसाठी मिली डाळमिल उभारण्याचे ठरले. विक्रम यांचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याच्या या पदवी अभ्यासाचा उपयोग सुदर्शन यांनी करून घ्यायचे ठरवले. आज विक्रम या व्यवसायात कार्यरत आहे.  

गुंतवणूक 
मिनी डाळ मिलची खरेदी सुमारे तीन लाख रुपयांना करण्यात आली. कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून त्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यासाठी जगदीशकुमार कांबळे यांनी सहकार्य केले. गटाच्या योजनेतून हे शक्य झाले. शेडच्या उभारणीवर सुदर्शन यांनी सुमारे एक लाख ८० हजार रुपये खर्च झाले. उद्योगासाठी ३० बाय ३० फूट जागा लागली. थ्री फेजचे वीज कनेक्शन आहे. एकूण किमान पाच लाख रुपयांची गुंतवणूक असल्याचे सुदर्शन सांगतात. महिन्याकाठी विजेसाठी खर्च ८०० रुपयांपर्यंत होतो.  

असे आहे व्यवसायाचे स्वरूप 
परिसरातील शेतकरी आपली तूर घेऊन येतात. त्यांना प्रति क्‍विंटलमागे ३०० रुपये शुल्क आकारून डाळ तयार करून दिली जाते.

एका क्‍विंटलपासून सुमारे ६५ किलो डाळ, दोन किलो कनोर (चुरी) व बाकी भुसा हे घटक संंबधित शेतकऱ्यांना दिले जातात. भुशाचा उपयोग पशुखाद्य म्हणून होतो. 

तूर खरेदी करून त्याची डाळ तयार करूनही सुदर्शन त्याची विक्री करतात.

गेल्या दोन ते तीन वर्षांत ७० क्विंटलपर्यंत डाळ हंगामात तयार करून दिली जाते.

यंदाची ही आकडेवारी होती ४० ते ४५ क्विंटल 

शेतीला पूरक व्यवसाय
फेब्रुवारी ते मे असा चार महिन्यांपर्यंत तूरडाळ प्रक्रियेचा व्यवसाय सुरू राहतो. त्यानंतर पावसाळा सुरू होत असल्याने तूर सुकविण्यासाठी सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी, तूरडाळीची प्रत खालावते. 
या व्यवसायातून सुमारे २५ ते ३० टक्के नफा मिळतो. सोयाबीन, तूर अशा शेतीला तो पूरक ठरतो. 
शिवाय पशुखाद्यही चांगल्या प्रकारे मिळते. दोन कामगारही नेमले आहेत. त्यांना रोजगार मिळतो. 

असे केले मार्केटिंग 
सुदर्शन यांच्या भावाचे आर्णी येथे किराणा मालाचे दुकान आहे. त्यामुळे तेथेही डाळ विक्रीस ठेवली जाते. 
घाऊक व्यापाऱ्यांना डाळीचे ‘सँपल’ दाखविले जाते. मुलगा विक्रम ‘मार्केटिंग’ची जबाबदारी सांभाळतो. आहे. सन २०१७ मध्ये सुमारे ६० क्‍विंटल डाळीची खरेदी व्यापाऱ्यांकडून झाली. त्यासोबतच १८ क्‍विंटल थेट विक्री करण्यात आली. येत्या काळात व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी आर्णी येथे तूरडाळ विक्री केंद्र उघडून थेट ग्राहकांना विक्रीचा विचार आहे. त्यासाठी दुकानाची खरेदी केली अाहे.  

पत्रकार परिषद घेऊन मार्केटिंग 
सुदर्शन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या डाळीचे महत्त्व पटवून दिले. त्यासंबंधीच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर ग्राहकांचाही प्रतिसाद वाढल्याचे सुदर्शन म्हणाले. 

दुधाळ जनावरांचे संगोपन
सुदर्शन यांच्याकडे चार म्हशी असून सुमारे ४० लिटर दूध मिळते. शासकीय दुग्ध योजनेचे दर परवडणारे नसल्यामुळे आर्णीतील हॉटेल व्यवसायिकांना दुधाची विक्री होते.  

शेतीचे नियोजन 
सुदर्शन यांची दहा एकर शेती आहे. सोयाबीन, कपाशी या पारंपरिक पिकांची लागवड ते करतात. सात एकरांवर सोयाबीन असते. यातच तुरीचे आंतरपीक घेण्यावर भर आहे. अरुणावती सिंचन प्रकल्प वीस किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पाचे पाणी हंगामात शेतीसाठी उपलब्ध होते. त्यासोबतच विहिरीचाही पिकांना आधार मिळतो असे ते सांगतात. 

डाळीचा ब्रँड
पाच व ३० किलो पॅकिंगमधून आपल्या तूरडाळीची विक्री सुदर्शन यांनी केली. सन २०१५-१६ मध्ये त्यांनी १२० रुपये प्रति किलोप्रमाणे डाळ विकली. ज्या वर्षी तुरीचा दर ज्याप्रमाणे राहील त्या प्रमाणात डाळीचा दर ठरतो. यंदाच्या वर्षी डाळीचा दर ६५ रुपये राहिला. अंबिका गावरानी डाळ असा ब्रॅंड तयार केला आहे. 
तेल, पाणी यांचा वापर करून तुरीवर प्रक्रिया होते. त्याला ‘पॉलिशिंग’ केले जात नाही. त्यामुळे तुरीतील पौष्टिक घटक कायम राहतात. त्यामुळे ग्राहकांची देखील याच तुरीला अधिक मागणी असल्याचे सुदर्शन यांनी सांगितले. गावरान तूरडाळ असा उल्लेख त्यांनी पॅकिंगवर केला आहे.  

प्रक्रिया उद्योगाची वैशिष्ट्ये
स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून ४० हजार रुपयांचे अनुदान.
तीन महिने हंगामात होते डाळीवर प्रक्रिया.
अंबिका "गावरान तूरडाळ'' या कॅचलाइनने होते डाळ विक्री.
एम.बी.ए. शिक्षण घेतलेल्या मुलाकडे मार्केटिंगची जबाबदारी.
सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक 
शेतकऱ्यांकडून देखील तूरखरेदी.
बाजार दराने होते शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी.
तूरडाळ प्रक्रिया उद्योगावर दोघांना मिळाला रोजगार.
दुधाळ जनावरांचे संगोपनावर भर.
ग्राहकांकडून मागणी वाढल्याने थेट विक्रीचे नियोजन.
आर्णी येथे लवकरच सुरू करणार आउटलेट.

सुदर्शन देशमुख, ७०३८७०९१९२

Web Title: agrowon news tur dal