पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

देशात २ ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा एक टक्का अधिक पाऊस झालेला असला, तरी त्याचे वितरण असमान असल्यामुळे खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिपाऊस, तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळून चाललेली पिके असे विषम चित्र दिसत असल्यामुळे एकूण खरीप पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

देशात २ ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा एक टक्का अधिक पाऊस झालेला असला, तरी त्याचे वितरण असमान असल्यामुळे खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिपाऊस, तर काही ठिकाणी पावसाअभावी वाळून चाललेली पिके असे विषम चित्र दिसत असल्यामुळे एकूण खरीप पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सरासरीच्या २१ टक्के कमी पाऊस झाला आहे, तर दक्षिण भारतातील काही भागांत सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम राजस्थानात सरासरीपेक्षा १२६ टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. तिथे त्यामुळे ३०० लोक मरण पावले असून, हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. तिथे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

पावसाचे असमान वितरण उरलेल्या कालावधीतही कायम राहिले, तर यंदा लागवड क्षेत्रात वाढ होऊनसुध्दा उत्पादन घटेल. त्याचा परिणाम म्हणून खाद्यतेल, साखर आणि कडधान्यांच्या आयातीत वाढ होऊ शकते, तसेच कापूस, भात व पेंड यांच्या निर्यातीवर मर्यादा येऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.  

मराठवाड्यात सुरवातीला पाऊस वेळेवर आल्यामुळे पेरण्या चांगल्या झाल्या; परंतु नंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पिके अडचणीत आली होती. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले; परंतु पुन्हा पाऊस गायब झाल्यामुळे आता या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवडाभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रामुख्याने सोयाबीन, कडधान्य पिके अडचणीत आली आहेत. 

देशातील प्रमुख राज्यांत पावसाच्या असमान वितरणामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. उर्वरित कालावधीत पावसाने साथ दिली नाही तर भात, कापूस, कडधान्य, तेलबिया पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. असमान पाऊस वितरणाला प्रतिसाद म्हणून काही भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. कांद्याचे भाव पंधरवड्यात दुप्पट झाले, तर टोमॅटोचे दर महिनाभरात चौपट झाले आहेत. 

Web Title: agrowon news weather crop