पावसाच्या स्थितीनुसार  करा पिकाचे नियोजन

डॉ. भगवान आसेवार, डॉ. आनंद गोरे,  प्रा. मदन पेंडके 
बुधवार, 31 मे 2017

भारतीय हवामान खात्याने यंदाच्या पावसाबाबतचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात ९६ टक्के पाऊसमानाचे भाकीत केले असून, यात कमी अधिक ५ टक्के गृहीत धरले आहे. आपल्या भागातील पावसाच्या प्रमाणानुसार पिकांचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये शाश्वतता मिळवता येते. 

भारतीय हवामान खात्याने यंदाच्या पावसाबाबतचा पहिला प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यानुसार देशात ९६ टक्के पाऊसमानाचे भाकीत केले असून, यात कमी अधिक ५ टक्के गृहीत धरले आहे. आपल्या भागातील पावसाच्या प्रमाणानुसार पिकांचे नियोजन केल्यास उत्पादनामध्ये शाश्वतता मिळवता येते. 

मागील पाच ते सहा वर्षांचा अनुभव लक्षात घेता केवळ एक ते दोन वर्षे सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे; तर अन्य ३ ते ४ वर्षे सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याचे लक्षात येते. सन २०१४ आणि २०१५ मध्ये अपुऱ्या पावसामुळे मराठवाडा विभागात खरीप पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली.

हा मागील विचार करता या वर्षीचा खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा असून, मागील अनुभवातून शेतीचे व्यवस्थापन करावे लागेल. 

बदलत्या व लहरी पावसातही खरीपातून अपेक्षित उत्पादन व उत्पादकता मिळविण्यासाठी पीक पद्धती व एकंदरीत पीक व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. 

शास्त्रीय पद्धतीने जमीन व पावसाचा विचार करून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पीक व पीकपद्धतीबाबत विविध शिफारशी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भावी आपत्कालीन स्थितीसाठी पीक नियोजनही उपलब्ध केले दिले आहे.

पावसाचे आगमन वेळेवर (१५ ते ३० जून ) किंवा (७ जून ते ३० जून ) दरम्यान झाल्यास मराठवाडा विभागात घेतली जाणारी नियमित पिके मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कपाशी, मका, खरीप ज्वारी, पेरसाळ, बाजरी, खरीप भुईमुग व संबंधित आंतरपीक पद्धती घेता येतील. विशेष करून मूग, उडीद, भुईमूग या पिकांची पेरणी ३० जून पर्यंत होणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा ७ जुलै पर्यंत या पिकाची पेरणी करता येते. त्यापेक्षा उशीर झाल्यास या पिकांच्या उत्पादनात घट येते.

मान्सुन ३० जून पर्यंत किंवा ७ जुलै पर्यंत आला नाही. म्हणजे पावसात एक आठवडयाने उशीर झाल्यास मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. उदा. ०८ जुलैपर्यंत पाऊस लांबला तर मूग, उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरीत बाजरी, तीळ, सूर्यफुल, संकरीत ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे लागेल. 

पावसास दोन ते तीन आठवड्यांनी उशीर झाल्यास म्हणजे पावसाचे आगमन १६ जुलै दरम्यान झाल्यास, संकरीत ज्वारी, भुईमूग व कपाशी या पिकांऐवजी संकरीत बाजरी, सूर्यफुल, तूर, एरंडी या पिकाबरोबरच तूर + सोयाबीन, बाजरी + तूर, एरंडी + धने, एरंडी + तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. विशेष करून सोयाबीन आणि कपाशी या शेतकऱ्यांच्या दृष्टिने महत्त्वाच्या पिकांची पेरणी ( किंवा लागवड) उशिरात उशिरा ३१ जुलैपर्यंत करावी. त्यानंतर या पिकांची पेरणी/लागवड करू नये.

नियमित पावसाळा ४ ते ६ आठवडे उशिराने सुरू झाल्यास कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा.

घ्यावयाची काळजी 
कापसाची पेरणी खोल व मध्यम खोल काळया जमिनीतच करावी . हलक्या जमिनीवर कपाशीस लागवड करू नये.
कपाशी + तुर (१०:२ किंवा ६:१) आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा लागेल.
सोयाबीन + तुर (४:२) या आंतर पीक पध्दतीचा अवलंब करावा.
सोयाबीन पिकांची पेरणी रूंद वरंबा सरी पध्दतीने करावी.
तुर पिकांची लागवड शिफारशी प्रमाणे वाणांची निवड करून व योग्य अंतरावर करावी.
मध्यम ते भारी जमिनीत कपासी सोबतच तुर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.
हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीकरीता दुबार पीक पध्दतीचा अवलंब करावा. (मुग, रब्बी ज्वारी, संकरीत ज्वारी-करडई/हरभरा, सोयाबीन-हरभरा)
मध्यम जमिनीत सुर्यफुल, तुर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.
हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळ, एरंडी, सारखी पिके घ्यावीत.
कपाशीमध्ये तूर (६:१ किंवा१०:२) सोयाबीन (१:१), मुग (१:१) किंवा उडीद (१:१)  या प्रमाणे आंतरपीक घ्यावीत.
सोयाबीन पिकामध्ये एमएयूएस-७१,एमएयूएस१५८, एमएयूएस-१६२ अशा वाणांची निवड करावी.
तुर पिकामध्ये भारी जमीन ( एक ते दोन सिंचन असल्यास) बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७११, बीडीएन ७०८ या वाणांची निवड करावी. 
जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी. पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरून त्याचा पिकांना लाभ होईल.
प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीन सारख्या पिकामध्ये घरचे बियाणे वापरू शकतो. पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणीसाठी वापरता येते. घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (‍कमीत कमी ७० टक्के असावी).
बीज प्रक्रियेसाठी रासायनिक व जैविक घटक मिळवून ठेवावेत. 
पेरणी करतांना योग्य अंतरावर व खोलीवर पेरणी करावी (उदा. सोयाबीन पिकामध्ये ५ ते ६ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये) 
शिफारशीप्रमाणे हेक्टरी बियाणे पेरणीसाठी वापरावे. (हेक्टरी रोपांची /झाडांची संख्या योग्य प्रमाणात ठेवावी).
वेळेवर आंतरमशागत करून तण नियंत्रण करावे जेणे करून अन्नद्रव्ये, जमिनीतील ओलावा, जागा, सुर्यप्रकाश यासाठी पिकांना स्पर्धा होणार नाही तसेच किड व रोगांना तणामुळे आश्रय मिळणार नाही.
एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांच्या शिफारस मात्रे सोबतच शिफारस केलेली सेंद्रीय खतांची मात्रा द्यावी. किंवा ५० ते ७५ टक्के रासायनिक खतासोबत २५ ते ५० टक्के सेंद्रीय खताचा वापर करावा. जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म वाढतात. उदा. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल, मुख्य व सुक्ष्म अन्न्द्रव्याचा समतोल व उपलब्धता वाढेल, जमिनीचे तापमान राखण्यास मदत होईल, आवश्यक जिवाणूंची संख्या वाढेल, सेंद्रीय कर्ब वाढेल.

Web Title: agrowon Plant management by the condition of rainy season