डाळिंबापासून ज्यूस, ड्रिंक, कॅंडी

डाळिंबापासून ज्यूस, ड्रिंक, कॅंडी

नगर जिल्ह्यातील निळवंडे येथील राम आहेर या इंजिनिअर तरुणाने शेतीबरोबर प्रक्रिया उद्योगातही वाटचाल केली आहे. सध्या त्याने आधुनिक व स्वच्छ निर्मिती प्रक्रिया पद्धतीचा प्रकल्प उभा केला आहे. डाळिंबापासून ज्यूस, ड्रिंक, कॅंडी अशी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने बनवली जातात. त्यातून आर्थिक स्रोत भक्कम करताना परिसरातील शेतकऱ्यांच्या मालालाही त्याने मार्केट दिले आहे. 

नगर जिल्ह्यातील संगमनेरचा पट्टा हा डाळिंब शेतीचा म्हणून अोळखला जातो. तालुक्यातील निळवंडे परिसरातही डाळिंबाच्या बागा पाहण्यास मिळतात. गावातील राम संपत आहेर यांची एकत्रित भावंडांची शेती आहे. राम मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांचे वडील संपत शिक्षक होते. आज ते हयात नाहीत. आई तसेच दोन भाऊ लक्ष्मण व संजय यांच्या मदतीने राम शेती करतातच, शिवाय स्वतःचा डाळिंब प्रक्रिया उद्योगही ते हिरिरीने सांभाळतात. 

राम यांच्या शेतीचा प्रवास 

सन २००६ मध्ये ‘इंजिनिअरिंग’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राम यांनी हिंजवडी, पुणे येथे प्रोडक्ट डिझाइन विषयातील नोकरी धरली. नोकरी करताना घरच्या शेतीकडेही अोढा होता. साहजिकच घरच्या शेतीतच उल्लेखनीय काही करावे असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे २०१० मध्ये नोकरी सोडून दिली व ते गावी परतले. घरचे १५ ते २० एकर डाळिंब आहे. त्या वेळी या पिकाला दर चांगला मिळत होता. पुढे तीन ते चार वर्षांमध्ये दर जास्त असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या पिकाकडे वळले. त्यामुळे दर खाली येऊ लागले. 

प्रक्रिया उद्योगाचा ‘टर्निंग पॉइंट’ 
 
कमी मिळणाऱ्या दरावर काय उपाय करावा, याचा विचार सुरू झाला. त्या वेळी एक कल्पना सुचली. भारतात फळे व भाजीपाला यावर फक्त एकूण उत्पादनाच्या ५ टक्केच प्रक्रिया होते. आपणही डाळिंबावर प्रक्रिया सुरू केली तर? कारण त्याची उत्पादने जास्त काळ टिकू शकतात व हमखास बाजारपेठ मिळू शकते. विचारांना अशी चालना मिळाली. राम ‘इंजिनिअरिंग’चे विद्यार्थी असल्याने त्यांचा शेती प्रक्रियेशी तसा काहीच संबंध नव्हता. त्या वेळी काही मित्रांनी त्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन घेण्यासंबंधी सुचवले. त्यानुसार तेथील काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्नप्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ डॉ. विक्रम कड यांना राम भेटले. तेथे मिळालेल्या सखोल मार्गदर्शनातून प्रक्रिया उद्योगाचा मार्ग सापडला. 

उद्योगाची तयारी 

उद्योग यशस्वी करण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास झाला. यातच पुढे जायचे नक्की केले. लागणाऱ्या मशिनरी, अन्य तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू केला. प्रकल्प उभारणी, यंत्रनिवड व खरेदीपर्यंत डॉ. कड यांनी संपूर्ण मार्गदर्शन                   केले.

डाळिंब प्रक्रियेचीच निवड का? 

निळवंडे व संगमनेर परिसरात डाळिंबाचे उत्पादन जास्त होते. म्हणजेच कच्चा माल सहज उपलब्ध आहे. दुसरी बाब म्हणजे डाळिंबाचे आरोग्यविषयक फायदेही भरपूर आहेत. या फळात ‘अँटिऑक्सिडंट’ घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्यदायी उत्पादन म्हणून ते ग्राहकांपुढे आणले तर फायदा होणार होता. डाळिंबाचे दर आपल्या हाती नाहीत. मात्र, आपल्या मालावर स्वतः प्रक्रिया केली व तो स्वतःच्या ब्रँडने विकला तर त्याला अधिक किंमत मिळते. ही किंमत ठरवण्याचा अधिकार आपल्याला मिळतो, असे राम यांना वाटले. 

 राम आहेर - ९५९५९६९७२६

कच्च्या मालाची उपलब्धता  
राम यांनी परिसरातील सुमारे शंभर डाळिंब उत्पादकांचा गट तयार केला आहे. त्यामाध्यमातून डाळिंबे (कच्चा माल) खरेदी केली जातात. बाजारभावापेक्षा २० टक्के दर त्यांना अधिक दिला जातो, असे राम यांनी सांगितले.  

  उद्योग क्षमता व ब्रॅंड 
पाच गुंठ्यात उभारला प्रकल्प 
उद्योगाची सध्याची क्षमता एक टन प्रति आठ तास म्हणजेच दिवसाला तीन टन डाळिंब फळांवर प्रक्रिया होऊ शकते.
यंत्रे- ज्यूसर, पाश्चरायझर, डाळिंब दाणे वेगळे करणारे एरील सेपरेटर, पल्पर आदींसह  पॅकिंग, लेबलिंग आदी आवश्यक सर्व यंत्रसामग्री.
उत्पादनांची वैष्णवी या ब्रॅंडने विक्री  
पोम एनर्जी असेही  उत्पादनाला नाव 
पत्नी सौ. अनीता यांची उद्योगात मोठी साथ

उत्पादने 
डाळिंब ज्यूस (कॉन्संट्रेटेड) 
रेडी टू ड्र्रिंक (पेय) (एनर्जी ड्रिंक) 
जेली (कॅंडी) 
रेडी टू ड्रिंक पेय २०० मिलि, ५०० मिलि व एक लिटर पॅकिंगमध्ये अाहे. त्याची एमआरपी अनुक्रमे १५, ५० व ९० रुपये अशी आहे, तर ज्यूसची किंमत लिटरला १४० रुपये आहे. 
उत्पादनांना ‘फूड सेफ्टी’विषयक ‘एफएसएसएआय’ संस्थेचा परवाना घेतला आहे.  
हा भाग तसा अवर्षणप्रवण आहे. मात्र प्रवरा नदीवरून पाइपलाइन घेत पाण्याची सोय केली आहे.

गुंतवणूक
जागा राम यांची स्वतःचीच आहे, त्यामुळे त्यावरील खर्च वाचला. मशिनरी व अन्य खर्चासाठी सुरवातीला सुमारे १५ लाख रुपये खर्च आला. विस्तारीकरण करताना तो ३५ लाख रुपयांपर्यंत आला आहे. कर्जासाठी विविध बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागले. मात्र, बॅंक आॅफ इंडियाने मदत केल्याचे राम म्हणाले.    

मार्केट
उत्पादनांना मार्केट मिळवण्यासाठी सुरवातीला फार मोठा संघर्ष करावा लागला. अनेक बऱ्या-वाईट अनुभवांतून जावे लागले. अथक प्रयत्नांतून आता मार्केट मिळवणे शक्य झाले आहे.  
पुणे, मुंबई, नाशिक व नगर या ठिकाणी प्रत्येकी एक स्टॉकिस्ट आहे. त्यांच्यामार्फत पुढे वितरण होते. 
ग्राहकांकडून उत्पादनांना उत्साहवर्धक प्रतिसाद असल्याचेही राम म्हणाले. 

रोजगारनिर्मिती 
राम सांगतात, की मी जेव्हा नोकरी सोडली तेव्हा अनेकांनी खूप नावे ठेवली. परंतु आज जो उद्योग उभा केला आहे, यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या २५ ते ५० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
प्रक्रिया युनिटमध्ये आठ महिला व सहा पुरुष काम करतात. तसेच, उत्पादन वितरण साखळीमध्ये ३० ते ४० जण काम करतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या मालाला दर उपलब्ध झालाच, शिवाय बेरोजगार तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला. मार्केटिंगसाठी देखील व्यवस्थापक व त्यांच्या हाताखाली काही व्यक्तींची नेमणूक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com