गाव तसे छोटे, कामांतून झाले मोठे

Agrowon Special news
Agrowon Special news

पूर्णा नदीच्या खोऱ्यात सर्वत्र खारपाणपट्टा विस्तारला आहे. याचे चटके बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावाने आजवर झेलले. आता मात्र गाव सामूहिक प्रयत्नांतून विकासाच्या वाटेवर निघाले आहे. जलसंधारणाच्या कामांतून जलसंपन्न होत आहे. सुमारे हजार लोकसंख्येच्या गावाने जलसंधारण, स्वच्छ ग्राम, शिक्षण, शेती अशा विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन शाश्‍वत विकासाचे मॉडेल उभे करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर हा टोकावरचा म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला तालुका आहे. तालुक्यातील पूर्णेच्या काठावरील गावे खारपाणपट्ट्यात येतात. या क्षेत्रात बारमाही सिंचनाला मर्यादा आहेत. यापैकीच एक गाव म्हणजे काकोडा. येथील विहिरींमधील पाणी ना पिण्यासाठी चांगले ना शेतीसाठी. त्यामुळेच अनेकांना किडनी किंवा अन्य आजारांना सामोरे जावे लागले. तरुणपिढी गावचे नेतृत्व करू लागल्यापासून चित्र बदलण्यास सुरवात झाली. सध्या सरपंचपदी पर्वणी शत्रुघ्न मानखैर यांची वर्णी लागली आहे. गावकऱ्यांच्या पाठबळामुळे त्यांच्याच कुटुंबात गेल्या १२ वर्षांपासून गावचे सरपंचपद आहे.

जलसंधारणाच्या क्षेत्रात कामगिरी 
काकोडा गावाने खरी कमाल केली ती जलसंधारणाच्या कामांमध्ये. खारपाणपट्टा असल्याने जमिनीतील पाण्याची प्रत चांगली नव्हती. मग पावसाचे पाणी अडवून त्याचा वापर करण्याच्या मुद्द्यावर ग्रामस्थ एक झाले. हातात हात देऊन पुढे आले. त्यातूनच मागील वर्षांत गावशिवारात जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने गावाला अधिक प्रोत्साहन दिले. गावच्या शेजारी असलेल्या नदीचे खोलीकरण करून त्यावर बंधारे बांधण्यात आले. एकजुटीतून गावात तब्बल ४० शेततळी उभारली गेली. या वर्षी झालेल्या दमदार पावसाने गावात झालेल्या प्रत्येक कामाची प्रचिती आली आहे.मागील पाच- सहा वर्षात पाणीटंचाईने हंगामी सिंचन थांबले होते. आता गोड्या पाण्याच्या भरवशावर रब्बीत कांदा, हरभरा घेणे शेतकऱ्यांना शक्य होईल असे सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न मानखैर यांनी सांगितले. 

काकोडा निर्मल ग्राम
काकोडा या छोट्याशा गावात प्रवेश करताच स्वच्छता दिसून येते. प्रत्येक गल्ली-बोळातील रस्ते स्वच्छ, चकाचक, सिमेंट काँक्रीटचे आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पेव्हर ब्लॉक्स बसविले आहेत.

घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सुका व ओला कचरा जमा केला जातो. गावातील सांडपाणी चार ठिकाणी मोठे खड्डे करून एकत्र करण्यात येते. रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम केल्याने सांडपाण्याचा निचरा गावाबाहेर व्यवस्थित होण्यास मदत झाली. छोट्याशा गावातील रस्त्यांनी बदलते स्वरुप दाखविले आहे. ग्रामपंचायतीने गावात मुख्य पाच ठिकाणी सौरऊर्जेवर लागणारे दिवे लावले आहेत. गावकऱ्यांनी लोकसहभागातून काकोडा-बेलखेड या शेतरस्त्याचे काही अंतरापर्यंत काम पूर्ण केले आहे. केलेल्या  कामांची दखल म्हणून २००६-२००७ मध्ये गावाला निर्मल ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आजही कामांत सातत्य आहे. 

काकोडा विकासकामे : ठळक बाबी 
  एकूण ४४ शेततळ्यांची निर्मिती
  गावठाणात १० शेततळी
  सीसीटी- ५०० घनमीटर
  कंटूरबांध- ४०० घनमीटर
  मातीनाला बांध-७ 
  नाला खोलीकरण-१६ हजार घनमीटर
  जलसंधारणामुळे गावशिवारात तीन- चार मीटरने 
पाणीपातळीत वाढ 

पर्यावरण क्षेत्रात कार्य 
अनेक वर्षांपासून येथील गावकऱ्यांचा पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग राहिला आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे हजार वृक्षांचे रोपण झाले. पैकी ७०० झाडे वाचविण्यात आली. वनखात्यानेही या गावात ई-क्लास जमिनीवर आठहजार रोपांचे संवर्धन सुरू केले. पर्यावरणातील या कामासांठी गावाला २००७-०८ मध्ये पुरस्कार देण्यात आला.

मिळू लागले  गोडे पाणी 
काकोडा ग्रामस्थांना गेल्या काही महिन्यांपासून वान प्रकल्पातील गोड्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. लवकरच गावाची जलवाहिनी व टाकीचे काम पूर्ण होऊन घरोघरी गोड पाणी पुरविले जाणार असल्याचे सरपंच मानखैर म्हणाल्या.

व्यापारी गाळे, बचत भवन
तरुणांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने व्यापारी गाळे ग्रामपंचायतीने बांधले. गावातील १० ते १२ महिला बचत गटांचे एकत्रीकरण, सशक्तीकरण करण्यासाठी शासनाच्या सहकार्याने बचत भवन बांधण्यात आले आहे. त्याचा वापर बैठकांसाठी, विचार विनिमयासाठी होऊ लागला आहे.

पर्वणी मानखैर - ७०५७१२६४०९
आर. एल. कपले - ९५४५६७५७५९, ग्रामसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com