देशी साहिवाल गायीच्या दुधाची देसिको ब्रॅंडने विक्री  

देशी साहिवाल गायीच्या दुधाची देसिको ब्रॅंडने विक्री  

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागावर असलेल्या कवळेकट्टी येथील कायम प्रयोगशील असलेल्या महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे २८ साहिवाल देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. सध्या दररोज १२५ लिटरपर्यंत उपलब्ध होणाऱ्या देशी दुधाची मुख्य विक्री कोल्हापूर व काही विक्री बेळगाव येथे देसिको या ब्रॅंडने केली जात आहे. या उपक्रमास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून, त्यातून मंडळाने आपले अर्थकारण उंचावण्यासही सुरवात केली आहे. 

पुणे- बंगळूर महामार्गावर असलेल्या यमकनमर्डी (जि. बेळगाव) गावापासून पाच किलोमीटर अंतरावर कोल्हापूर जिल्ह्यातील कवळेकट्टी (ता. गडहिंग्लज) हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. खरीप बटाटा, सोयाबीन, शाळू ही गावची मुख्य पिके. गावात पावसाचे प्रमाण कमी आहे. नदी दूर असल्याने शेतीसाठीही पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गावात पूर्वी चारशे ते पाचशे एकरांवर बटाटा घेतला जायचा. आता हे प्रमाण पन्नास ते शंभर एकरांवर आले आहे. शेतीत प्रयोगशीलता जपण्याच्या उद्देशाने गावातील ११ शेतकरी २०१३ मध्ये एकत्र आले. त्यांनी महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. मंडळाचे सध्याचे अध्यक्ष बाबूराव पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.  

रेसिड्यू फ्री शेतीपासून सुरवात
सुरवातीला मंडळाच्या शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्री भेंडी, मिरची आदींचे प्रयोग करण्यास सुरवात केली. मुंबई,  कोकणात भाजीपाला पुरवठा करण्याबरोबर अन्य शेतकऱ्यांकडूनही विविध  प्रकारचा भाजीपाला घेऊन तो पुरविण्याचे काम सुरू केले. परंतु पाण्याच्या समस्येमुळे या प्रयत्नात अडथळे आले. त्यानंतर मग अधिक विचारांती दीड वर्षापूर्वी देशी गोसंगोपन व दूधविक्रीचा विचार पुढे आला. शेतकऱ्यांना वैयक्तिकदृष्ट्या ही बाब शक्‍य नसल्याने सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे ठरले. बॅंकेनेही साथ दिली. मग गोठा उभारणीची प्रक्रिया पूर्ण झाली.  

मुक्त गोठ्याच्या  माध्यमातून व्यवस्थापन 
मंडळाचा एक एकर परिसरात गायींचा मुक्त गोठा वसला आहे, त्यासाठी भाडेतत्त्वावर जागा घेतली आहे. सुमारे शंभर ते दीडशे गायी बसतील इतकी त्यांची क्षमता आहे. मात्र सद्यःस्थितीत एकूण २८ गायी आहेत. गोठ्यात फिरण्यासाठी मोकळी जागा, पाणी पिण्यासाठी प्रत्येक कप्प्यात नळांची व्यवस्था आहे. 

दूधनिर्मिती व विक्री  : दूध यंत्राच्या साहाय्याने काढण्यात येते. पाच यंत्रांच्या साहाय्याने ते यंत्रात संकलित केले जाते. तेथून ते चिलिंग यंत्राकडे पाठवले जाते. त्यानंतर त्याचे अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये पॅकिंग होते. त्यानंतर विक्रीसाठी पाठविले जाते. गटाचे सदस्य शाकीर बर्फवाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी दूधविक्रीचा प्रश्‍न सोडवला. बेळगावमध्ये सकाळी व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्या ग्राहकांशी संपर्क साधून देशी दुधाबाबत जागरूकता निर्माण केली. हळूहळू हे दूध पसंतीस उतरू लागले. सध्या एकूण संकलन १२५ लिटरपर्यंत होते. कोल्हापूर येथे प्रमुख विक्री व काही प्रमाणात ती बेळगावला होते.कोल्हापूर येथे सकाळचे तर बेळगावला संध्याकाळी मिळणारे दूध दिले जाते. गो शाळेतून तुपाचीही निर्मिती गरजेनुसार होते. मात्र दुधालाच जादा मागणी असल्याने त्या निर्मितीवर मर्यादा येतात.  

हरियाना, पंजाबमधून  गायींची खरेदी
शांत व दुधासाठी चांगली अशी वैशिष्ट्ये असलेल्या गायीला चर्चेतून पसंती देण्यात आली. विद्यापीठांचे तज्ज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी यांची मदत घेण्यात आली. त्यातून साहिवाल गायीचे नाव पुढे आले. साधारणतः एक लाखापर्यंतची रक्कम प्रत्येकाने गुंतवली. अन्य यंत्रसामग्रीकरिता कॅनरा बॅंकेने कर्ज दिले. सदस्यांनी शेतीचे तारण दिले. अन्य यंत्रणाही उभी करण्यात आली. गोठ्यासाठी सदस्यांपैकी एका सदस्याने आपली जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी होकार दिला.  

दुधाची प्रत टिकवली 
गायींना बेबी कॉर्नचा चारा तसेच सायलेजमधील चारा देण्यात येतो. गायींची काटेकोर स्वछता पाळण्यात येते. गायींसाठी टॉवेलही स्वतंत्र ठेवले आहेत. खास पशुवैद्यकाची नेमणूक केली आहे. गायींची व वासरांची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होते. मानवी हस्तक्षेप कमी केल्याने दुधाची गुणवत्ता टिकवणे शक्य झाले आहे. 

दुधाला ८० रुपये दर 
या प्रकल्पासाठी साधारणपणे पावणेदोन कोटी रुपये खर्च आला. यापैकी सुमारे ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. प्रत्येक गाय दोन्ही वेळचे मिळून सुमारे आठ ते १२ लिटर दूध देते. गाभणकाळानुसार दुधाचे उत्पादन कमी- जास्त होते. दुधाचा लिटरला ८० रुपये दर ठेवण्यात आला आहे.  कोल्हापुरात एका महिला व्यावसायिकेस वितरणाची एजन्सी दिली आहे. बेळगावमध्ये मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने विक्री होते. प्लॅस्टिकऐवजी काचेच्या बाटल्यांमधून दूध उपलब्ध केले आहे. एक लिटर दुधाच्या विक्रीतून दररोज लिटरला सुमारे पंधरा रुपयांपर्यंत नफा शिल्लक राहील असे उद्दिष्ट असते. शेण, त्यापासून तयार होणारे उपपदार्थ यासाठी नफ्यातील रक्कम वापरण्यात येत आहे. दही, ताक आदी पदार्थ तयार करण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत, त्यातून नफ्यात वाढ होण्याचा विश्‍वास मंडळाच्या सदस्यांना आहे. गोठ्यात सध्या सात मजूर कार्यरत आहेत. मंडळाच्या सदस्यांच्या नियमित बैठका होतात. यामध्ये व्यवसायाचा ताळेबंद ठेवण्यात येतो.   

चाऱ्याची विक्री
दुधाशिवाय सायलेज तंत्रातील चाऱ्याचीही विक्री होते. साधारण ४० ते ४५ किलोची बॅग याप्रमाणे पॅकिंग होते. सहा रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. गोवा, कोल्हापूरसह कणेरी मठातूनही त्यास मागणी आहे. गांडूळ खतही तयार केले जाते. 

मंडळाने अनेक अडचणींना तोंड देत यशस्वी वाटचाल सुरू केली. देशी गायीच्या दुधाची दररोज विक्री हे आव्हान मंडळाने कष्टाने पेलले आहे. चांगल्या दर्जामुळे ग्राहकांतून मागणी वाढली. शासनातर्फे शेतकरी मंडळांना प्रत्येक टप्प्यावर अनुदान देण्याची गरज आहे. आम्हाला शासकीय अनुदानाचा लाभ घेता आला. आता हायड्रोपोनिक्स पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेण्याचा विचार आहे. शासनाने शीतसाखळी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा आहे.  
 बाबूराव पाटील, ६३६३९७९२९२ 
अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळ, कवळेकट्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com