नुकसान डोळ्यांपुढं आलं की दिवस जातच नाही...

नुकसान डोळ्यांपुढं आलं की दिवस जातच नाही...

‘यंदा पावसानं असं केलं की पीक काढणीला आलं, पण ते काढायच्या लायकीचं राहील नाही. दोन अडीच महिन्यांपासून पाऊस नाही. कापूस एकरी सव्वा किंटल पिकतोया. ऊस तर आज पेटवून देण्याच्या स्थितीत हाय. कुणी त्याला तोडायला पण घेणार नाही, जनावरांच्या खायच्या लायकीचा नाही. सव्वा ते दीड एकरात यंदा पपईची लागवड केली, पण माल लगडला अन पाणी संपलं. पंधरवडा झाला शेतात आलोच नाही. येऊ वाटंना अन त्याच्याकडे पाहू वाटंना. कोणाला काय बोलावं हे पण समजंना. उपसलं कष्ट अन आता झालेलं नुकसान डोळ्यांपुढं आलं की दिवस जातच नाही, करमतच नाही,’ असे शेतकरी रमेश लोंढे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगावचे शेतकरी रमेश लोंढे यांनी पावसाअभावी त्यांच्या शेतीपिकावर ओढवलेलं संकट, त्यामधून निर्माण झालेले प्रश्न, अस्वस्थ करणारी परिस्थिती बीड जिल्ह्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची प्रचिती देते आहे. बीड जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६४ हजार हेक्टर. यंदा जवळपास ७ लाख १५ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक ३ लाख २७ हजार हेक्टरवर कपाशी, तर त्यापाठोपाठ २ लाख ३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती.

वाळून गेली भेंडी
गेवराई तालुक्यातील सावरगाव, शिंदखेड, वडगाव येथील शेतकरी निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन घेतात. वर्षात किमान तीन पीक या शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता ठेवतात. पण यंदा पावसानं त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. सावरगावचे भेंडी उत्पादक बंडू जाधवर म्हणाले, यंदा या तीनही गावांतील जवळपास ५० ते ५५ शेतकऱ्यांनी १६ ऑगस्टला भेंडी लागवड केली. पण त्यानंतर पाऊसच गायब झाल्यानं लावलेली भेंडी वाळून गेली. शिवाय पुढेचं पीकही नाही.

निम्म्यापेक्षा जास्त मंडळांत  ५० टक्केही पाऊस नाही
बीड जिल्ह्यात एकूण ६३ महसूल मंडळे आहेत. त्यापैकी ३४ मंडळांत वार्षिक सरासरी पावसाच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. केवळ ५ मंडळांत ७० ते ७५ टक्के पाऊस पडला असून, २४ मंडळात ५० ते ७० टक्के पाऊस पडला आहे. सहा मंडळांत वार्षिक सरासरीच्या केवळ २१ ते २८ टक्केच पाऊस पडला आहे. त्यामध्ये राजुरी मंडळात केवळ २१ टक्केच पाऊस पडला आहे.

भूजलपातळीत चिंतेत घातली भर
 शिरूर कासार, धारूर तालुक्यातील भूजलपातळी ३ मीटरपेक्षा जास्त घटली आहे. तर माजलगाव तालुक्यातील भूजलपातळीत तब्बल ५.१० मीटर इतकी घट नोंदली गेली आहे. गेवराई तालुक्यातील भूजलपातळीत २.४० मीटर, पाटोदा, वडवणी, अंबाजोगाई, केज तालुक्यातील भूजलपातळीत १ मीटरपेक्षा जास्त, तर बीड, आष्टी, परळी तालुक्यांतील भूजलपातळीत ०.३७ ते ०.९० मीटरपर्यंत घट नोंदली गेली आहे. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाभरातील १२६ विहिरींचे सप्टेंबरअखेर निरीक्षण नोंदविले.

सोयाबीन हातचे गेले
पावसाने गरजेच्या वेळी दगा दिल्याने मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उत्पादनात हेक्टरी मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली आहे. हेक्टरी सरासरी ८ क्विंटल ३२ किलो उत्पादित होणारे सोयाबीन यंदा केवळ २ क्विंटलच पिकले.

ऊसतोडीला जाण्याचे प्रमाण वाढले 
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख. दरवर्षी जाणाऱ्या या ऊसतोड कामगारांच्या संख्येत यंदा आजवर २० ते २५ टक्क्यांची भर पडली आहे. गेवराई तालुक्यातील ठाकरवाडीचे कल्याण चव्हाण म्हणाले, दरवर्षी गावातील ५० टक्के लोक ऊसतोडणीला जायचे. यंदा ही संख्या ७५ टक्क्यांवर गेली. चकलांबा, माटेगाव, खलेगाव, जळगाव, धोंडराई, पिंप्रीदेव, सुशिवडगाव आदी गावातूनही मोठ्या प्रमाणात लोक ऊसतोडीला चाललेत. काय करावं आताच प्यायला पाणी जनावरांना चारा नाही, उरलेलं दहा-बारा महिने धकवायचे कसे हा प्रश्न प्रत्येकासमोर हाय. अनेकांनी जनावर विकली, पण अनेकांनी ती न विकता त्यांना जगविण्यासाठी ऊसतोडीला जाण्याचा निर्णय घेतला. 

कापसाच्या व्यापारावर गदा
दरवर्षी दरदिवशी किमान ३० ते ३५ ट्रक कापूस खरेदी होणाऱ्या उमापूरच्या बाजारपेठत यंदा शुकशुकाट आहे. साधारणतः दसऱ्यापासून सुरू होणारी ही कापूस खरेदी यंदा सुरू नाही. फेब्रुवारीपर्यंत किमान चार महिने चालणारा हा धंदा बंद असल्यानं किमान पाचशेवर मजुरांच्या हाताला मिळणार काम थांबलय. उमापूर गावात जवळपास सात विहिरी, दोन बारव. आजघडीला प्रत्येकीला एक ते २ फूट पाणी. पावसाने अर्ध्यावर्ती डाव मोडल्याने गावशिवरातील चार हजार हेक्टरपैकी जवळपास ५०० हेक्टरवर होणाऱ्या हंगामी बागायतीची आशा संपल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

पाणी चाऱ्यासाठी भटकंती
किमान तीन किलोमीटर चालल्याशिवाय जनावरचं पोट भरत नाही. त्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिथं पाणी मिळत तिथं जावं लागतं. यंदा पाण्यानं सारं अवघड करून टाकल्याचे गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीचे काकासाहेब परदेशी व भागवत गवारे सांगत  होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com