वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ

वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ

सध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी, लोकप्रिय नसतील, पण संकटात मोठा आधार ठरू शकतील अशा पिकांच्या तो शोधात आहे. अशीच काही पिके शेतकऱ्यांना खुणावत आहेत.

शेतकऱ्याच्या उत्पन्नात ती चांगली भरही घालत आहेत. जळगावच्या बाजार समितीत अशा पिकांची आवक व मागणी सध्या पाहण्यास मिळते आहे.

कमी खर्चातील वाल 
वालाच्या शेंगांचे उत्पादन बारमाही व कमी पाण्यात येते. हिवाळ्यात तर १२ ते १४ दिवस पाणी देण्याची फारशी गरज नसते. जळगाव जिल्ह्याच्या सिमेवरील औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्‍यातून शेतकरी वाल शेंगा घेऊन जळगाव बाजार समितीत येतात. जूनमध्ये लागवड केल्यानंतर उत्पादन दोन ते अडीच महिन्यांत सुरू होते. पावसाळ्यात खंड किंवा पाण्याचा ताण पडला तर एखाद्या वेळेस सिंचनाची गरज भासते. रासायनिक खतेही फार लागत नाहीत. जमीन हलकी, मध्यम असली तरी वाल चांगले उत्पादन देऊन जाते. अगदी मे महिन्यापर्यंत शेगांचे उत्पादन सिल्लोडमधील मांडणा, लिहाखेडी, उंडणगाव, चिंचपूर, बहुली, पालोद, गोळेगाव, वडाळा, वडोद, मवळेहट्टी आदी गावांमधील शेतकरी घेतात. 

दररोज चार मालवाहू मोटर्स
मांडणा व परिसरात वालासह अन्य भाज्यांचे उत्पादन चांगले असल्याने वाहतुकीचे भाडेशुल्क  कमविण्यासाठी या एकट्या गावात १४ मालवाहू मोटर्स युवकांनी घेतल्या आहेत. सध्या विविध भाज्यांच्या दररोज चार गाड्या भरून जळगावच्या बाजार समितीत येतात. वाल शेंगांचे दर दोन महिन्यांपासून २० ते १५ रुपये प्रति किलो या दरम्यान राहिले आहेत.

अवीट चवीची मेहरुण बोरे 
 जळगाव तालुक्‍यातील प्रसिद्ध मेहरुणची बोरेही जळगाव बाजार समितीत दाखल झाली आहेत. अवीट गोडीच्या, आकाराने लहान या बोरांना चांगला उठाव असतो. जळगाव तालुक्‍यातील बोरनार, बेळी, जळगाव खुर्द, नशिराबाद भागातून ही बोरे येतात. त्यांना किलोला २० रुपये दर मागील २० दिवसांपासून मिळतो आहे. प्रतिदिन १२ क्विंटल आवक आहे. बोराला अन्य पिकांच्या तुलनेत सिंचनाची फार गरज नसते. बांधावरचे पीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तण, खते व्यवस्थापन याबाबतचा खर्चही नगण्य असतो. ज्यांच्याकडे पाच ते सहा झाडे आहेत ते शेतकरी दोन दिवसाआड बोरे वेचून बाजार समितीत आणतात. मागणी असल्याने अडतदार आगाऊ नोंदणीही करतात. 

उत्पन्नाची जोड 
शेवग्याचे जे दर डिसेंबरमध्ये असतात ते मार्चमध्ये मिळत नाहीत. मार्चमध्ये १० ते १२ रुपये प्रतिकिलो दर असतो. अर्ध्या एकरात सरासरी दर लक्षात घेता ५० हजार रुपयांचे उत्पादन मिळू शकते. मेहरुण बोरांचे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान उत्पादन मिळते. सरासरी १५ रुपये प्रति किलो दर मिळतो. हंगामात २० ते २५ हजार रुपये मिळतात. वालाचे २० गुंठ्यात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत उत्पादन घेतले तर सरासरी १५ रुपये प्रति किलो दरानुसार किमान २० हजार रुपये हाती पडतात. 

वाल शेंगांची लागवड अनेक वर्षांपासून करतो. सध्या दररोज दीड क्विंटल शेंगा मिळत असून त्यांचे दर १५ रुपये प्रति किलोपेक्षा कमी मिळालेले नाहीत. 
- गजानन लोखंडे, ९९२३२८१४३३ मांडणा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) 

कारले, वांगी, भेंडी घेतो. लसूण पातीला सध्या चांगली मागणी आहे. उन्हाळ्यात लग्नसराई व अन्य कार्यक्रमांमुळे काटेरी वांगी उन्हाळ्यात घेण्याचे नियोजन असते. कारले पिकात अधिक श्रम लागतात. पण दरांची हमी असते. 
- कृष्णा पाटील, ७०६६७०२९४३ पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव  

मेहरुणची बोरे व तुरीच्या ओल्या शेंगांचे उत्पादन घेतो. बोरांची काही झाडे बांधावर आहेत. तूर शेंगांची काढणी दर आठ दिवसांनी करतो. बोरे दर दोन दिवसांनी बाजारात आणतो. त्यांना २० रुपये तर शेंगांना ३० रुपये प्रति किलो दर असतात. 
- सुरेश लक्ष्मण चौधरी, ७७०९९०५००९ बेळी, ता. जि. जळगाव 

शेवग्याचा आधार 
शेवगासुद्धा दुष्काळात आधार देत असल्याचे शेतकरी सांगतात. एकतर कमी पाणी, लागवड केल्यानंतर किमान चार ते पाच वर्षे व्यावसायिक उत्पादन मिळते. त्यात आंतरपीकही घेता येते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, धरणगाव तालुक्‍यांतून शेवग्याची आवक होत आहे. सध्या ५० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे शेतकऱ्यनी सांगितले.

अन्य भाज्यांचीही साथ  
बाजार समितीत मागील पाच दिवसांत कारले प्रतिदिन चार क्विंटल, गवार तीन क्विंटल, शेवगा तीन क्विंटल, वाल शेंगा पाच क्विंटल अशी आवक झाली. या सर्व भाज्यांचे दर टिकून आहेत. ही पिके शेतकऱ्यांना दुष्काळात आधार देणारी ठरत आहेत. गवार, कारले, गिलके यांच्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन व श्रम करावे लागतात. मात्र जलस्त्रोत कमी असल्याने १० ते २० गुंठ्यात ही पिके घेण्याचा प्रयत्न असतो. गिलके, कारल्यांच्या वेलांना आधार म्हणून मंडप उभारावे लागतात. दररोज किंवा दिवसाआड काढणी करायची असते. पण क्षेत्र कमी असल्याने कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊन, मजुरी खर्च वाचवून शेतकरी व्यवस्थापन करतात. कारले किलोला ३० रुपये तर गिलके २० ते २५ रुपये असे दर आहेत. मेथीला पाणी दिवसाआड लागते. ती १० ते १५ गुंठ्यात घेतली आहे. मेथीची आवक अधिक असली तरी किमान १२ रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com