esakal | यांत्रिकीकरणाचा आदर्श सांगणारी राऊत यांची व्यावसायिक शेती
sakal

बोलून बातमी शोधा

यांत्रिकीकरणाचा आदर्श सांगणारी राऊत यांची व्यावसायिक शेती

राऊत कुटुंबीयांची शेती बोरगाव दोरीपासून (ता. अचलपूर, जि. अमरावती) वीस किलोमीटरवरील मासोद येथील जिल्हा परिषद शाळेत किशोर राऊत शिक्षक आहेत. शेतीशी नाळ जुळलेली असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळतच शेतीच्या आदर्श व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले.

यांत्रिकीकरणाचा आदर्श सांगणारी राऊत यांची व्यावसायिक शेती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राऊत कुटुंबीयांची शेती बोरगाव दोरीपासून (ता. अचलपूर, जि. अमरावती) वीस किलोमीटरवरील मासोद येथील जिल्हा परिषद शाळेत किशोर राऊत शिक्षक आहेत. शेतीशी नाळ जुळलेली असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळतच शेतीच्या आदर्श व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. सकाळी सात ते नऊ या वेळेत ते शेतावर असतात. शाळा सुटल्यानंतर पुन्हा सायंकाळचा वेळ ते शेतीलाच देतात. शाळा व शेती अशी दुहेरी कसरत करताना यांत्रिकीकरणामुळे बराचसा भार हलका होतो असा त्यांचा अनुभव आहे. वडील जनार्दन यांची शेती व्यवस्थापनात मोठी मदत होते. एक विहीर व ट्यूबवेलचा पर्याय आहे. सतरा एकरांपैकी १३ एकर क्षेत्र ठिबकखाली आहे.

फवारणी झाली सुलभ  
राऊत यांच्याकडे सोयाबीन, हरभरा, गव्हाच्या मळणीसाठी थ्रेशर आहे. त्यावरच ‘लोखंडी फाउंडेशन’ तयार करण्यात आले. पुली व बेल्ट लावत त्याचे ‘आरपीएम’ मॅच करण्यात आले. त्या माध्यमातून तयार होणाऱ्या दाबाच्या आधारे संत्रा बागेत फवारणी केली जाते. थ्रेशरच्या अवघ्या दहा हॉर्सपॉवर शक्‍तीचा वापर त्यासाठी होतो. फवारणी यंत्राला सुमारे ८०० फूट पाइप जोडला असून सहाशे लिटरच्या तीन टाक्‍यांमध्ये द्रावण तयार केले जाते. त्यानंतर ते पाइप्सद्वारे फवारण्याचे काम होते. आपल्या डोक्‍यातील कल्पना राऊत यांनी ‘वेल्डिंग वर्कशॉप’ असलेल्या व्यावसायिकला सांगून तसे यंत्र बनवून घेतले. त्यासाठी पंधराशे रुपये खर्च आला. यंत्राच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार झाडांवरील फवारणीचे काम शक्‍य होते. पाच लिटर डिझेलची गरज भासते. मजुरी व वेळेत त्यातून मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.   

तीस वर्षांपूर्वीची संत्रा लागवड 
अचलपूर तालुक्‍यापासून मेळघाट २४ किलोमीटरवर आहे. सातपुडा पर्वतरांगाही या भागात आहेत. येथील वातावरण संत्र्याला पोषक आहे. राऊत यांच्याकडे ३० वर्षांपूर्वीची बाग आहे. एकरी सुमारे दहा ते १२ टन उत्पादकता मिळते. एक हजार संत्रा फळांची विक्री अडीच ते तीन हजार रुपये याप्रमाणे गेल्या वर्षी करण्यात आली. त्यासाठी एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. बागेतील गवताच्या काढणीसाठी ब्रश कटरचा वापर होतो. गवताचा कुजल्यानंतर खत म्हणून बागेत उपयोग होतो.  

मजुरांसोबत कौटुंबिक नाते
सुमारे १७ एकरांच्या शेती व्यवस्थापनासाठी दोन मजूर कुटुंबे काही वर्षांपासून कार्यरत आहेत. या कुटुंबांना दुचाकी घेऊन दिल्या आहेत. दवाखाना तसेच गरजेच्या वेळीही पैशांची उपलब्धता केली जाते. त्यामुळे मजुरांशी ऋणानुबंध जुळले आहेत.  

केळी उत्पादनाकडे लक्ष केंद्रित
 व्यासायिक पीक म्हणून सहा वर्षांपासून केळी लागवडीत सातत्य
 ठिबकच्या माध्यमातून जीवामृत. त्यासाठी आवश्‍यक शेण आणि गोमूत्रासाठी देशी गायीचा सांभाळ, गेल्या वर्षी एकरी २७ ते ३० टन केळीचे उत्पादन 
 केळी, संत्रा बागेतील आंतरमशागतही छोट्या ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने   
 आले, हळद यांचीही शेती. नव्याने अडीच एकरांवर संत्रा लागवड. आंतरपीक म्हणून ढेमशाची लागवड   

विविध अवजारांचा वापर 
पल्टी नांगर, व्ही-पास, पट्टीपास, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र आदी सामग्री राजकोट (गुजरात) येथून आणली आहे. तेथे दर्जेदार अवजारे योग्य किमतीस मिळतात, असे राऊत सांगतात. छोटा ट्रॅक्‍टरच्या इंधन टाकीला पूर्वी ‘लॉक’ नव्हते. त्यामुळे डिझेल चोरीला जाण्याची शक्‍यता होती. कंपनीच्या एका कार्यक्रमात त्यांनी सूचना मांडली. त्याची दखल घेत कंपनीने इंधन टाकीला लॉक देण्यास सुरवात केली आहे. कल्टीवेटर जमिनीच्या आत किती खोल गेले पाहिजे यासाठी ट्रॅक्‍टरच्या एचपीची क्षमता त्यांनी एका ट्रॅक्‍टर उत्पादक कंपनीच्या निदर्शनास आणून दिली. मग कंपनीने मोठ्या ट्रॅक्‍टरच्या धर्तीवर आपल्या नव्या मॉडेलच्या छोट्या ट्रॅक्‍टरमध्ये तशी सुविधा बसवून दिली. फवारणीसाठी इटालियन गन आहे.

पेरणी यंत्र व जनसेट 
सोयाबीन, तूर, हरभऱ्यासाठी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर
दिवसभरात आठ एकरांची पेरणी त्यामुळे शक्‍य
बी आणि खते देण्याचे कामही त्याद्वारे शक्‍य मजुरी, वेळ व पैसे यात मोठी बचत होते. 
ट्रॅक्‍टरचलित जनसेटचा पर्याय. वीजपुरवठा नसेल आणि पिकाला पाण्याची तातडीची गरज असेल त्याच वेळी हा पर्याय. प्रति तासाला अडीच ते तीन लिटर डिझेलची गरज 

किशोर राऊत, ९४२२३५४९३०

loading image