भाजीपाला रोपनिर्मितीद्वारे शून्यातून प्रगती

भाजीपाला रोपनिर्मितीद्वारे शून्यातून प्रगती

सतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून आर्थिक उत्पन्नाची जोड दिली. ऊसतोड कामगार ते प्रगतिशील शेतकरी होण्यापर्यंत त्यांचा प्रवास प्रसंशनीय अाहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तेर हे एेतिहासिक गाव आहे. येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसप (ता. उस्मानाबाद) गावातील तेर- मुरूड मार्गावर नरवडे बंधूंची वडिलोपार्जित सहा एकर शेती अाहे. सोयाबीन, तूर, ज्वारी अादी पारंपरिक पिके घेताना अच्युतराव नरवडे कांदारोपनिर्मिती करीत. मात्र घरचा खर्च भागत नसल्याने ते व त्यांचा थोरला मुलगा दयानंद कधी ऊसतोड कामगार म्हणून, तर कधी रस्तानिर्मितीच्या कामासाठी जात. मात्र, मजुरीवर फार काळ विसंबून चालणारे नव्हते. नरवडे कुटुंब घरच्या प्रगतीची स्वप्ने पाहात होते. 

संघर्षातून रोपनिर्मिती व्यवसाय
सन २००५च्या दरम्यान दयानंदरावांनी त्यादृष्टीने पावले उचलली. भाजीपाला रोपवाटिकेचा पर्याय त्यांना योग्य वाटला. एक गुंठ्यात बांबूच्या साध्या शेडनेटमधून सुरुवात केली. विविध भाजीपाला रोपांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग २०११ मध्ये ‘एनएचएम’मधून एक लाख २० हजार रुपयांचे कर्ज घेत पाच गुंठ्यांवर रोपनिर्मितीचे शेडनेट उभारले. त्याला ९६ हजार रुपये अनुदान मिळाले. पाण्याचा प्रश्न होताच. तो सोडवण्याबरोबर विक्री, मार्केटिंगही प्रभावी करायचे होते. अनेकवेळा अपयश आले, तरीही संघर्ष व चिकाटी सोडली नाही.  

कर्जाची परतफेड 
हळूहळू व्यवसायात जम बसू लागला. रोपांचा दर्जा चांगला असल्यामुळे आसपासच्या गावांमध्ये प्रसिद्धी होऊ लागली. खरेदीसाठी शेतकरी शेतावर येऊ लागले. मागणी जास्त अाणि पुरवठा कमी असे होऊ लागले. मग २०१४-१५ मध्ये कोरडवाहू शेती अभियानांतर्गत कर्ज घेत शेडनेट क्षेत्र १० गुंठ्यांवर नेले. ‘ॲडव्हान्स’ घेऊन रोपनिर्मिती सुरू केली. त्यामुळे खर्चाचा मेळ बसून ताजा पैसा हातात येऊ लागला. दयानंदरावांनी ऊसतोड, मजुरीची कामे बंद केली. धाकटे बंधू गणेश यांची मार्केटिंगसाठी मदत घेतली. व्यवसायात वृद्धी होऊ लागली. इतक्या वर्षांच्या वाटचालीत अनुदान व शेतीतील उत्पन्न या जोरावर कर्जाची परतफेड करणे शक्य  झाले. आज रोपनिर्मिती व्यवसाय एक एकरावर नेण्यापर्यंत नरवडे यांनी मजल मारली आहे.

नरवडे यांची शेतीपद्धती  
भाजीपाला रोपवाटिका - एक एकर
रेशीम शेती - एक एकर
उर्वरित क्षेत्र - पारंपरिक पिके, फळबागेचे नियोजन व काही रिकामे  

रेशीम शेतीची जोड
रोपनिर्मिती व्यवसायाला रेशीमशेतीची आर्थिक जोड दिली आहे. त्यासाठी रेशीम उत्पादकांच्या प्रकल्पांना भेटी देऊन पूर्ण माहिती मिळवली. सन २०१६ मध्ये एक एकरात तुतीची लागवड केली. पन्नास बाय २२ फूट अाकाराचे शेड उभारले. प्रति अंडीपुंजापासून ७५ किलो, तर कमाल ९६ किलो कोष उत्पादन मिळवले अाहे. वर्षातून चार बॅचेस घेतल्या जातात. शेतकऱ्यांची संख्या अधिक असेल त्या वेळी कर्नाटकात कोष विक्रीस घेऊन जाणे परवडते. अन्यथा, अौरंगाबाद येथे शासकीय केंद्र व लातूरमधील छोट्या व्यापाऱ्यांचा पर्याय असतो. 

कुटुंबीयांची समर्थ साथ
दयानंदराव शेतीची, तर धाकटे बंधू गणेश ग्रामपंचायतीतील नोकरी सांभाळत मार्केटिंगची जबाबदारी पाहतात. अाई मैनाबाई अाणि पत्नी सुनीतादेखील शेतात राबतात. पूर्वी दयानंदराव ऊसतोड कामगार होते. अाईलाही मजुरीसाठी जावे लागायचे. अाज ते दररोज पाच ते सहा जणांना मजुरी देतात. दोन्ही भावांचे शिक्षण, शेती ठिबकखाली आणणे, कुटुंबाची अार्थिक स्थिती सुधारणे त्यांनी शक्य केले आहे. वडिलांचाही मोठा अाधार होता. शेतीतील उत्पन्नातून त्यांच्या आजारपणासाठी लागेल तेवढा पैसा पुरवला. मात्र, दुर्दैवाने गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले, हे सांगताना दयानंदरावांना दुःख आवरणे कठीण होते. विविध शासकीय योजना, कृषी विभागाचे सहकार्य कुटुंबाला मिळते. उस्मानाबादचे मंडळ कृषी अधिकारी डी. बी. रितापुरे, कृषी पर्यवेक्षक के. जी. गुरव, कृषी सहायक एम. पी. गोचडे यांचे मार्गदर्शन लाभते. 

शेती व्यवस्थापन वैशिष्ट्ये 
रोपनिर्मिती
मिरची, वांगी, टोमॅटो, कलिंगड, कोबी, फ्लॉवर, कांदा, झेंडू आदी
चांगल्या कंपनीचेच बियाणे खरेदी केले जाते. काही क्षेत्रात ते घेऊन त्याची चाचणी, वैशिष्ट्ये तपासली जातात. त्यानंतर शेतकऱ्यांना त्याविषयी सांगितले जाते. 
वर्षाला सुमारे २०० ग्राहक शेतकऱ्यांशी संपर्क. महिन्याला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत विक्री. 
खर्च वजा जाता ४० टक्क्यांपर्यंत नफा. काही ग्राहक फक्त अाॅर्डर देतात, खरेदी करत नाहीत, त्यामुळे तोटाही सहन करावा लागतो. 
प्रो ट्रे व कोकोपीट माध्यमाद्वारे रोपनिर्मिती. कोकोपीट बंगळूर येथून ४५०० ते ५५०० रुपये प्रतिटन दराने अाणले जाते. 
रोपलागवडीनंतर काही अडचणी अाल्यास शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किंवा फोनवरून मार्गदर्शन करतात.
मागणीप्रमाणे ५० टक्के ‘ॲडव्हान्स’ घेऊन विक्री. 
बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मागणी. कांद्याच्या रोपांची कर्नाटकपर्यंत विक्री.
रोपवाटिकेचे शासकीय नोंदणीकरण  
मागणी जास्त असल्यामुळे सर्वांत जास्त मिरचीच्या रोपांची निर्मिती केली जाते.
‘अाॅर्डर’ जास्त असल्यास स्वतःच्या वाहनातून घरपोच सेवा.  
पाण्याचे दुर्भिक्ष्य असतेच. मात्र शेततळ्याचा आधार. प्रसंगी टॅंकर विकत घेऊन पाणी दिले जाते. 

दयानंद नरवडे,  ९९२१९०३३७९
गणेश नरवडे, ८६६८२४८८८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com