शून्यातून साकारली शेतीत समृद्धी

keval-wagh
keval-wagh

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा प्रयोगशील बागायतदारांचा म्हणूनच अोळखला जातो. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला या पिकात इथल्या शेतकऱ्यांनी राज्यात अोळख मिळवली आहे.

तालुक्यापासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असलेल्या ब्राह्मणगाव येथील सत्तर वर्षीय केवळ लक्ष्मण वाघ यांची लांडगे शिवारात तीन एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती पूर्वी अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे पारंपरिक शेतीबरोबर काही प्रमाणात भाजीपाला पिकवून गावात त्याची सायकलीवरून फिरून विक्री करायचे. त्यातून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. दरम्यान १९७२ मध्ये शेतात राहात असलेल्या झोपडीला आग लागली. होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. त्यावेळी प्रशासनने ४९ रुपये व नवे घर बांधण्यासाठी सहा पत्रे अशी मदत देऊ केली. तीन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही होती. लहान मुलगा मदन अभ्यासात हुशार होता. त्याने सातवीनंतरचे शिक्षण मामाकडे घेतले. एमएबीएड पूर्ण केले. 

नव्या पिढीने सांभाळली शेतीची सूत्रे  
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदन यांनी सहा महिने नोकरीचा शोध घेतला. पण ती काही मिळाली नाही. मग शेतीतच काही करता येते का याचा शोध सुरू झाला. ही साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘इंटरनेट’वर काम करीत असतांना पुणे येथील तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षण संस्थेतर्फे पाॅलिहाऊस विषयातील प्रशिक्षणाची माहिती झाली. हा अभ्यासक्रम पूर्ण करून हायटेक शेती सुरू करायचे ठरवले.

रंगीत ढोबळीने   उंचावला आत्मविश्वास  
 बॅंकेकडून अर्थसहाय्य घेत वीस गुंठ्यात पाॅलिहाऊस उभारले. त्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. संपूर्ण नियोजन करून उत्कृष्ट मिरची पिकवली. मुंबई येथील भाजी मार्केटला रवाना केली. सुरवातीला दर काही समाधानकारक मिळाला नाही. पुढे मात्र कमाल दर किलोला ११० ते अगदी १४० रुपयांपर्यंत गेला. त्यावर्षी खर्च वजा जाता सुमारे १४ लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या उल्लेखनीय नफ्याने शेतीतील आत्मविश्वास उंचावला. 

मात्र त्यापुढील वर्षाने मात्र परिक्षा घेतली. यावेळी समाधानकारक दर न मिळाल्याने नुकसान झाले. 

शेती पद्धतीत बदल  
थोडीफार निराशा आली तरी मदन खचले नाहीत. त्यांनी बाजारपेठ व बदलत्या शेतीचा अभ्यास केला. त्यातून बारमाही भाजीपाला शेती व जोडीला रोपवाटिका व्यवसाय असा पर्याय उभा केला. 

आज स्वतःची तीन एकर, शिवाय काकांची साडेतीन एकर शेती ते कसताहेत. त्यात टोमॅटो, मिरची, खरबूज, कांदा, फ्लाॅवर असा विविध भाजीपाला असतो. तर सुमारे ६५ गुंठ्यात विविध भाजीपाला पिकांची रोपे तयार केली जातात. पूर्वीच्या २० गुंठ्यातील पाॅलिहाउसचा वापर त्यासाठी होतो. 

शेतीत कुटुंबाचे बळ वाढले 
मदन यांचे मोठे बंधू पद्माकर नाशिक येथे खाजगी कंपनीत तोकड्या पगारावर काम करीत होते. मदन यांनी त्यांना तसेच मधले बंधू रामकृष्ण यांनाही पूर्णवेळ शेतीसाठी प्रोत्साहीत केले. परस्परांच्या चर्चेतून तिघांनीही शेतीच्या जबाबदाऱ्या वाटून घेण्याचे ठरवले. त्यातून शेतीतील मनुष्यबळ व पाठबळही वाढण्यास मदत                      झाली. 

मदन वाघ- ९५५२०००९०२, ७०३८८७६९०९.

वाघ कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये 
बारमाही भाजीपाला. वर्षभरात साधारण चार भाजीपाला पिके. 
उदा. टोमॅटो, मिरची, खरबूज, कांदा. 
टोमॅटोचे एकरी २००० ते २५०० क्रेट तर मिरचीचे २० टन उत्पादन. ज्यावेळी कांद्याला अपेक्षित दर नसेल त्यावेळी चाळीत साठवणूक. 
या उत्पन्नाला नर्सरीतून आर्थिक उत्पन्नाची जोड. 
मदन सांगतात की एखाद्या मालाचे दर पडले म्हणून आम्ही प्लॉट सोडून देत नाही. 
अगदी अखेरपर्यंत प्लाॅटची निगा राखतो. साहजिकच पुढे त्याचे दर मिळण्यास मदत होते. 
व्यापारी जागेवरून मालाची खरेदी करतात. 
रोपांची गुणवत्ता जपल्यामुळेच परिसरातील शेतकरी रोपे घेऊन जातात. वर्षाला साधारण एक हजार ते पंधराशेपर्यंत शेतकरी ग्राहक आहेत. 
सुमारे ३० कामगार या व्यवसायात ठेवले आहेत.
संपूर्ण क्षेत्रात पाण्यासाठी तीन विहिरी खोदल्या. आजमितीस एका विहिरीवर जमीन ओलिताखाली आहे. 
नर्सरीतील रोपे ग्राहकांपर्यंत पोहोच करण्यासाठी भाडेतत्त्वावर तीन तर स्वतःकडील वाहन व्यवस्था.
शेतीतील उत्पन्नातून नाशिक येथे फ्लॅट, चारचाकी, ट्रॅक्टर, आदी गोष्टी घेणे शक्य झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com