पोल्ट्रीमध्ये वाढतेय यांत्रिकीकरणाचे महत्त्व

डॉ. सुनील नाडगाैडा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पोल्ट्री फार्ममध्ये वापरल्या जाणाऱ्या छोट्या-मोठ्या उपकरणांसोबत पाणी पिण्यासाठी निपल पद्धती, वातावरण नियंत्रणासाठी विविध सोयी, स्वयंचलित खाद्य, पाणी देण्याची अाणि अंडी गोळा करण्याची यंत्रणा यांसारख्या विविध बाबींचा समावेश होतो. त्यामुळे मजुरीचे प्रमाण कमी झाले अाहे, शिवाय फार्मची कार्यक्षमताही वाढत अाहे.

कुक्कुटपालन व्यवसायातील उपकरणे आवश्‍यक व वैकल्पिक अशी दोन विभागांत विभागली अाहेत. आवश्‍यक उपकरणांमध्ये खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, ब्रूडिंगसाठी लागणारी उपकरणे इत्यादींचा समावेश होतो; तर वैकल्पिक उपकरणांमध्ये पी.एच. मीटर, थर्मल  फॉगर यांसारख्या उपकरणांचा समावेश होतो.

खाद्यासाठी लागणारी उपकरणे 
 चीक फीडर - 

१ ते १० दिवसांच्या पिलांना खाद्य खाण्यास उपयुक्त. यामध्ये ३ किलो खाद्य मावते. खाद्य वाया जात नाही. खाद्यामध्ये रोगजंतूंचा संसर्ग होत नाही. पिलांना २४  तास खाद्य उपलब्ध होते. सामान्यपणे ५० पिलांना एक याप्रमाणे वापरल्यास चांगले परिणाम दिसून येतात. या चीक फीडर सोबत कोन, जाळी व स्टँड वापरणे फायदेशीर ठरते.

 टर्बो फीडर - 
चीक फीडरप्रमाणेच टर्बो फीडर वापरण्यास सोपे व फायदेशीर आहेत. या प्रकारच्या आधुनिक फीडरमुळे पिलांना खाद्य खाणे सुलभ होते.

 जंबो फीडर्स - 
हे फीडर १० दिवसांनंतरच्या पक्ष्यांना खाद्य खाण्यासाठी वापरले जातात. यांची क्षमता ८ ते १० किलो खाद्य इतकी असून १ जंबो फीडर ३५ ते ४० पक्ष्यांना पुरेसा होतो. याबरोबर कोन व जाळी वापरणे आवश्‍यक असते. 

 स्वयंचलित खाद्य यंत्रणा -
मोठ्या प्रमाणावरील कुक्कुटपालन व्यवसायासाठी ही अत्यंत किफायतशीर पद्धत आहे. एका फीडिंग पॅनमागे १२ ते १५ पक्षी खाद्य खाऊ शकतात. सेन्सरमुळे पक्ष्यांना अविरतपणे खाद्य मिळते.  पक्ष्यांच्या वाढीप्रमाणे व आवश्‍यकतेप्रमाणे फीडर पॅनची उंची कमी- जास्त करता येते. सुरवातीला भांडवली गुंतवणूक थोडी जास्त लागते.

पाणी पिण्यासाठी लागणारी उपकरणे 
 चीक ड्रिंकर - 
१ दिवसापासून ते १० दिवसांपर्यंतच्या लहान पिलांना पाणी पिण्यासाठी उपयुक्त. यामध्ये ३ ते ४.५ लिटर पाणी मावते. १ चीक ड्रिंकरबरोबर स्टॅंड वापरल्यास, उंची कमी- जास्त करता येते. पाण्याची शुद्धता चांगली राहते. पाण्याद्वारे होणारा जंतुसंसर्ग कमी करता येतो. ५० पिलांना एक याप्रमाणे वापरतात. स्वच्छता दररोज करणे गरजेचे असते.

 जंबो ड्रिंकर्स  - 
मोठ्या पक्ष्यांना अविरतपणे पाणीपुरवठा करण्यासाठी जंबो ड्रिंकर वापरतात. स्वच्छता दररोज करणे आवश्‍यक असते. पक्ष्यांच्या गरजेप्रमाणे यांची उंची कमी- जास्त करता येते. 

 स्वयंचलित पाणीपुरवठा यंत्रणा - 
पक्ष्यांना पाणी पिण्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पाण्यावाटे होणारा जंतुसंसर्ग टाळला जातो. पक्ष्यांच्या आवश्‍यकतेनुसार उंची कमी किंवा जास्त करता येते. ८ ते १५ पक्ष्यांना एक निपल याप्रमाणे व्यवस्था करता येते. पाणीगळती टाळता येते, त्यामुळे शेडमधील तूस कोरडे राहते.

ब्रूडिंगसाठी लागणारी उपकरणे
एक दिवसाच्या पिलांना चांगल्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे १५ दिवसांपर्यंत एकसमान उष्णतेची गरज असते. शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी खालील प्रकारचे ब्रूडर वापरले जातात.

 गॅस ब्रूडर 
ब्रूडिंग शेडमध्ये एकसमान तापमान राखण्यासाठी गॅस ब्रूडर वापरले जातात. त्यामुळे पिलांची वाढ एकसमान होते. गॅस ब्रूडर वेगवेगळ्या क्षमतेमध्ये उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे १००० पिल्लांना एक ब्रूडर क्षमतेनुसार वापरता येतो. गॅस ब्रूडर वापरताना शेडमध्ये थोडी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, अन्यथा शेडमधील कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण वाढते व पिलांना श्‍वसनमार्गाचे विकार होतात.

 इलेक्‍ट्रिक ब्रूडर - 
या प्रकारचे ब्रूडर सर्वांत जास्त वापरले जातात. धातूच्या पत्र्याची किंवा बाबूंची टोपली घेऊन त्यामध्ये १०० किंवा २०० वाॅट क्षमतेचे इलेक्‍ट्रिक बल्ब बसवून ब्रूडर तयार करतात. यामध्ये २ ते ६ अथवा गरजेनुसार बल्ब कमी किंवा जास्त लावता येतात. ब्रूडरच्या पत्र्याला आतील बाजूस पांढरा रंग दिल्यास उष्णता पिलांपर्यंत पोचण्यास चांगली मदत होते. 

 शेगडी, ड्रम 
अनेकदा गॅस ब्रूडर व इलेक्‍ट्रिक ब्रूडरच्या सोबतीने कोळसा शेगडी किंवा ड्रमही ब्रूडिंग शेडमध्ये वापरले जाते. शेगडी व ड्रममध्ये वापरला जाणारा कोळसा पूर्णपणे पेटल्यानंतरच शेडमध्ये ठेवावे. यामुळे निर्माण होणारा धूर जर ब्रूडिंग शेडमध्ये कोंडला तर पिलांना श्‍वसनमार्गाचे विकार होतात. 

इतर उपकरणे 
 व्हेंटिलेशन फॅन किंवा पंखे - 

शेडमध्ये वायुविजन अथवा हवा खेळती ठेवण्यासाठी व्हेंटिलेशन फॅन उपयोगी पडतात. ३६ इंचांच्या एक फॅनमुळे सामान्यत- ५० फूट अंतरापर्यंत हवा खेळती राहते. उन्हाळ्यामध्ये शेडमधील तापमान कमी करण्यासाठी व शेडमधील गरम हवा बाहेर घालविण्यासाठी या पंख्यांचा चांगला उपयोग होतो.

  विंचेस - 
शेडच्या दोन्ही बाजूला लावण्यात येणारे पडदे वर किंवा खाली करण्यासाठी वापर केला जातो.

 फॉगर - 
उन्हाळ्यात शेडमधील वातावरण थंड ठेवण्यासाठी फॉगरचा उपयोग होतो. पाण्याची खूप लहान तुषाराद्वारे शेडमध्ये फवारणी केली जाते. तुषार जास्त मोठे असू नयेत, कारण शेडमधील तूस ओले होऊन खराब होण्याची शक्‍यता असते. फॉगर शेडच्या आत वापरण्यास उपयुक्त आहेत. यामुळे शेडमधील आर्द्रता योग्य प्रमाणात राखता येते.

  स्प्रिंकलर - 
शेडच्या पत्र्यावर स्प्रिंकलर लावल्यामुळे शेडच्या आतील तापमान थंड राहण्यास मदत होते. 

  व्हॅक्‍सिनेटर -
पक्ष्यांना वेगवेगळ्या रोगांच्या लस देण्यासाठी वापरतात. सर्व पक्ष्यांना समान मात्रेत लस टोचली जाते. वेळेची बचत होते.

  फ्लेम गन - 
शेडचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता अाणि जमीन जाळण्यासाठी फ्लेम गन वापरतात. 

  थर्मल फॉगर - 
निर्जंतुकीकरण पारंपरिक फ्युमिगेशनपेक्षा अधिक परिणामकारक, कमी वेळेत अाणि सोपे होते. साधारणत- १०,००० चौ. फूट क्षेत्रफळाच्या शेडसाठी १५ मिनिटांचा वेळ लागतो.

  प्रेशर वॉशर - 
रिकामे शेड धुण्यासाठी यांचा चांगला उपयोग होतो. जोरदारपणे पाण्याचा फवारा मारल्यामुळे शेड लवकरात लवकर स्वच्छ होते.

  पॉवर स्प्रेअर - 
जंतुनाशकाच्या फवारणीसाठी उपयुक्त. छोट्या स्प्रे पंपाने फवारणीसाठी जास्त वेळ लागतो. परंतु पॉवर स्प्रेअरमुळे हे काम कमी वेळेत, प्रभावीपणे अाणि रिकाम्या शेडमध्ये तसेच शेडमध्ये पक्षी असताना देखील फवारणी करता येते.

  इन्फ्रारेड थर्मामीटर - 
प्रत्येक वेळी ब्रूडिंग शेडमधील वेगवेगळ्या ठिकाणचे तापमान नोंदणे शक्‍य होत नाही. अशा वेळी ब्रूडिंग शेडमधील वेगवेगळ्या ठिकाणाचे तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर वापरतात. ज्या ठिकाणी इन्फ्रारेड ज्योत/ ठिणगी पडेल, त्या ठिकाणाचे तापमान या थर्मामीटरमध्ये दिसते. यामुळे ब्रूडिंग शेडमध्ये सर्व ठिकाणी एकसारखे तापमान अाहे की नाही याची खात्री करणे सोपे होते.

अल्ट्रासाउंड डिस्टंट मीटर - 
शेडमधील वेगवेगळ्या ठिकाणचे अंतर, तसेच क्षेत्रफळ मोजण्यासाठी उपयुक्त अाहे. एका ठिकाणी उभे राहून हे काम करता येते.

  डोझर किंवा मेडिकेटर -
पक्ष्यांना औषधे देण्यासाठी, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी डोझर अथवा मेडिकेटरचा वापर केला जातो. मुख्य टाकीकडे जाणाऱ्या किंवा टाकीकडून शेडकडे जाणाऱ्या पाण्याच्या पाइपला डोझर जोडला असता अव्याहतपणे पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाते. पाण्यात औषधे मिसळण्याचा हा खात्रीशीर मार्ग आहे. सर्वसाधारणपणे एका डिजिटल डोझरमुळे पूर्ण शेडसाठी लागणारे पाणी शुद्धीकरण करता येते.

  टी.डी.एस. मीटर - 
पाण्यात जास्त क्षार असतील, तर औषधे परिणामकारकरीत्या काम करत नाहीत. पाण्यातील क्षारांचे प्रमाण मोजता येते.

याशिवाय चीक गार्डस, पडदे, केजमॅट, थर्मामीटर, अंड्यांचे ट्रे, चोची कापण्याचे डीबेंकिंग मशिन, खाद्य साठवण्यासाठी फीडसाइलो, खाद्य ठेवण्यासाठी मांडणी (चारपाई), कृत्रिम रेतन करण्यासाठी एअाय टिप्स व फनेल या प्रकारची अनेक उपकरणे कुक्कुटपालनात वापरली जातात. 

 - डॉ. सुनील नाडगाैडा, ९०७५०११४४३
(लेखक व्हेंकीज इंडिया प्रा. लि.  येथे कार्यरत अाहेत.)

Web Title: agrowun news Poultry