टरबुजाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

अकोला  - पारंपरिक पिके सोडून नगदी पिके घेण्यासाठी शेतकरी पुढे येत असताना बाजारात भाव मिळत नसल्याने अडचण होत आहे. सध्या या अवस्थेतून टरबूज उत्पादक शेतकरी जात आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेले टरबूज केवळ २०० ते ३०० रुपये क्विंटल दराने व्यापारी मागत असून एवढ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अकोला  - पारंपरिक पिके सोडून नगदी पिके घेण्यासाठी शेतकरी पुढे येत असताना बाजारात भाव मिळत नसल्याने अडचण होत आहे. सध्या या अवस्थेतून टरबूज उत्पादक शेतकरी जात आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेले टरबूज केवळ २०० ते ३०० रुपये क्विंटल दराने व्यापारी मागत असून एवढ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यातील पातूर तालुक्यात राहेर व नजीकच्या भागात शेतकऱ्यांनी पेरलेल्या टरबुजाला भावच मिळत नसल्याने शेतकरी फळे तोडण्यासही पुढे येत नाहीत. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. वऱ्हाडात पातूर, तेल्हारा, अकोट, संग्रामपूर, तसेच इतर तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात टरबूज घेतले जाते. नगदी पीक म्हणून याकडे शेतकरी आकर्षित होत आहेत. असे असताना यावर्षी इतर पिकांप्रमाणेच टरबुजाचे दरसुद्धा सध्या प्रचंड घसरले आहेत. 

राहेर परिसरातील या मोसमात ३० ते ३५ एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड झाली होती. काही शेतकऱ्यांना टरबूज तोडल्यावर मागील वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्यातच बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. टरबुजाच्या लागवडीला एकरी ४० ते ५० हजार खर्च येतो. शेतीची मशागत, ठिबक सिंचन, बी-बियाण्यांची पेरणी, फवारणी, खतांचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांत या पिकाने शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चांगले पैसे मिळवून दिले. 

एकरी २० हजारांचा तोटा 
ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात एकरी १२५ ते १५० क्विंटल उत्पादन घेतले, त्यांना यावर्षी एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन झाले. मागील वर्षी टरबुजाचे दर ९०० ते ११०० रुपये होते. यावर्षी हाच दर २०० ते ५०० रुपयांपर्यंत गडगडला आहे. शेतकऱ्यांना नफा तर झालाच नाही उलट एकरी २० हजार रुपये तोटा आला आहे. हे नुकसान कसे भरून काढावे या विवंचनेत शेतकरी आहेत. येत्या १५ ते २० दिवसात खरिपाची पेरणी करायची आहे. शेतीची मशागत करण्यासाठीही काहींकडे पैसे नाहीत. उन्हाळी पिकाच्या धक्क्यातून शेतकरी अद्याप सावरला नाही. 

मागील वर्षी मला दोन एकरांत ३२ ते ३५ टन टरबुजाचे उत्पादन झाले. या वर्षी मी लागवड केली असता १० ते १२ टनच उत्पादन झाले. उत्पादनात दुप्पट घट झाली. त्यातच टरबुजाला भावसुद्धा अत्यंत कमी मिळत असल्याने मला दुहेरी नुकसान झेलावे लागले. 
- बंडू पाटील, टरबूज उत्पादक, राहेर जि. अकोला

Web Title: akola news farmer agriculture