दोन एकरांतील कापूस नेला चोरून

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

कापसावर चोरट्यांच्या नजरा गेल्या असून, दहिगाव गावंडे शिवारात दोन एकरांतील कापूस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. याबाबत शेतकऱ्याने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी शेताला भेट देत पंचनामा केला आहे.

अकोला (प्रतिनिधी)- यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता घटली आहे. अनेकांना एकरी एक क्विंटलही सोयाबीन झाले नाही. आता खारपाण पट्ट्यात कापसाचे पीक उभे असून वेचणी सुरू झाली. मात्र या कापसावर चोरट्यांच्या नजरा गेल्या असून, दहिगाव गावंडे शिवारात दोन एकरांतील कापूस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. याबाबत शेतकऱ्याने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी शेताला भेट देत पंचनामा केला आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात खारपाण पट्ट्यात कापूस वेचणी सुरू झाली आहे. अनेकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सीतादही’ करीत वेचणीला प्रारंभ केला. दहिगाव येथील योगेश गावंडे यांनीही पहिल्या वेचणीसाठी गुरुवारी (ता.१९) महिला मजूर सांगितले होते. महिलांनी वेचणीला सुरुवात केल्यानंतर शेतात मध्यभागातील झाडांवर कापूस नसल्याचे दिसून आले. महिलांनी हा प्रकार योगेश गावंडे यांना सांगितला. पाहणी केल्यानंतर कापसाची चोरी झाल्याचे दिसून आले. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा : कंत्राटी शेती : फायद्याची की शोषणाची?

गावंडे यांच्या शेतापासून काही अंतरावर पाटालगत रोड आहे. चोरटे याच रस्त्याने येऊन कापूस चोरी करून घेऊन गेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. योगेश गावंडे यांनी तातडीने बोरगावमंजू पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार केली. पोलिस काँस्टेबल श्री. मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ शेताला भेट देत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा : ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन करणारी करार शेती

यंदा या भागात योग्य पीकपाणी नाही. मजुरी नसल्याने सर्वच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत चोरीच्या घटना वाढल्या. माझ्या शेतातील कापूस चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आता इतर शेतकरी सतर्क झाले असून, आपापल्या शेतात पाहणी करू लागले आहेत. चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे.
- योगेश दादाराव गावंडे, शेतकरी, दहिगाव गावंडे, ता. जि. अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Stealing cotton from the field