भाजीपाला पिकात सोडली जनावरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

बाजारात दर घसरल्याने वाहतूक खर्च निघणेही मुश्‍कील

कापडणे, जि. धुळे (प्रतिनिधी) ः परिसरात भाजीपाल्याचे दर घसरल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत. दुष्काळामुळे आधीच खरीप हंगाम हातचा गेला होता. पाणी उपलब्ध असलेल्या काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकविण्यावर भर दिला. मात्र, आता भाजीपालाही मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने त्यातून उत्पादन खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडली आहेत.

धुळे तालुक्‍यातील कापडणे, देवभाने व लगतच्या परिसरात शेतकऱ्यांकडून बारमाही पालेभाज्या; तसेच फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने निराशा केल्याने रब्बीसाठी पुरेसे पाणी नाही. त्यामुळे जेवढे पाणी उपलब्ध आहे, त्याद्वारे भाजीपाल्याची लागवड करून वर्षभराचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे; परंतु त्यांचा तो बेत पूर्णतः फसला आहे. एरवी 40 ते 50 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा भाजीपाला फार आवक नसतानाही सध्या पाच ते दहा रुपये किलोप्रमाणे विकावा लागत आहे. अशा वेळी नेमके करायचे तरी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या फ्लॉवरला सुरत, शहादा व धुळे येथील घाऊक बाजारात केवळ तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. फ्लॉवरची किरकोळ विक्री दहा रुपये किलोने करायची म्हटले तरीही घेण्यासाठी ग्राहक नाहीत.

एकरी 25 हजार रुपये खर्च
शेतकरी अनिल माळी, प्रदीप माळी, सुशील माळी, अशोक माळी, कैलास माळी, दगा मोरे, बन्सिलाल माळी आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात फ्लॉवरचे उत्पादन घेतात. पाण्याअभावी विहिरी केवळ अर्धा तास चालतात. त्यामुळे सर्वांनी तुषार सिंचनावर भाजीपाला पिकवला आहे. त्यासाठी एकरी 25 हजारांपर्यंत खर्च झाला आहे. मात्र, सर्व माल विकून पाच हजार रुपयेही हातात आले नाहीत. फ्लॉवरला प्रतिकिलो 15 रुपये दर मिळाला तरी तो परवडतो. मात्र, सध्या तीन ते पाच रुपये प्रतिकिलोने फ्लॉवर विकावा लागत असल्याने नेमके पिकवायचे तरी काय, असा प्रश्‍न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Animals left fortnight as vegetables