ध्यास गुणवत्तापूर्ण केळी उत्पादनाचा...

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जळगाव जिल्ह्यातील केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर) येथील अतुल मधुकर पाटील यांनी केळी पिकात नेहमीच गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचा ध्यास ठेवला. अनेक वर्षांचा अनुभव, कौशल्य, कष्ट यातून ते या पिकात पारंगत झाले आहेत. प्रयोगशील शेतकरी म्हणून आपली अोळख त्यांनी ठळक केली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर हे राज्यातील केळीचे आगार म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधारण १९६४ पासून या भागात केळीची शेती पाहण्यास मिळते. तापी नदीचे पाणी व सातपुडा पर्वतामधील मंगरूळ, अभोळा, सुकी, गारबर्डी आदी प्रकल्पांमुळे रावेर तालुका जवळपास ९० ते १०० टक्के बागायतदार झाला आहे. तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक गावही केळीसाठी प्रसिद्ध आहे. 

गावाला मंगरूळ धरणाचा लाभ आहे. भोकर नदीलगत गावातील अनेकांची शेती आहे. येथील अतुल पाटील यांनीही प्रयोगशील शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी शेतीत लक्ष घालण्यास सुरवात केली. जे जे नवे व चांगले तंत्रज्ञान केळीत आले ते ते आत्मसात करण्याचा नाद अतुल यांनी जपला आहे. वडील मधुकर यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन  मिळते. 

केळी शेतीतील बदल, सुधारणा 
अतुल यांचे आजोबा सोनजी पाटीलदेखील केळीची शेती करायचे. शेतीच्या वाटण्या झाल्यानंतर सुमारे २० एकर शेती त्यांच्या वाट्याला आली. सुरवातीला पाट पद्धतीने सिंचन, कंदांचा वापर व भर खते अशा पद्धतीने केळी शेती केली जायची. त्या वेळेसही केळीचे भरघोस उत्पादन मधुकर घ्यायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अतुल साधारण १९९५ पासून शेती पाहू लागले. मधुकर यांनी केळी पिकाच्या जोरावरच सुमारे १५ एकर शेती घेतली होती. अतुल यांनीही पुढील काळात टप्प्याटप्प्याने १५ एकर शेती घेतली. आजघडीला त्यांच्याकडे सुमारे ५० एकर शेती आहे. दहा एकर शेती भाडेतत्त्वावरही घेतली आहे. 

अभ्यासू वृत्तीतून अतुल यांनी केळी संशोधन केंद्र त्रिची (तमिळनाडू), आणंद (गुजरात) येथील कृषी संशोधन संस्था आदी ठिकाणी भेटी दिल्या. राष्ट्रीय केळी परिषदांमध्ये सहभागी होत केळी पिकातील घडामोडी, नवे तंत्रज्ञान समजावून घेतले. केळीवरील करपा रोग निर्मूलनासंबंधीच्या मोहिमेतही ते हिरीरिने सहभागी झाले आहेत. 

शक्यतो मृगबहार घेण्यावर भर असतो. लागवड करताना ती एकाचवेळी न करता दोन लागवडीत काही कालावधी ठेवला जातो. म्हणजे सर्व केळी बाजारात एकाच वेळी न येता काही महिने विक्रीस उपलब्ध असतात.  

शंभर टक्के ऊतीसंवर्धित रोपांचा वापर केला जातो. ठिबक सिंचन व डबल लॅटरल तंत्र वापरले जाते. 

उन्हाळ्यात केळी कापणीवर असते. या काळात झाडे पाण्याविना करपू नयेत, नुकसान होऊ नये व व्यवस्थित पाणी मिळावे म्हणून पाण्याचे काटेकोर नियोजन असते. 

बाजारपेठेचा व आपल्या भागातील केळी शेतीचा सातत्याने अभ्यास करीत असल्याचा फायदा मिळतो. 

सहा बाय साडेपाच फूट, साडेपाच बाय साडेपाच फूट, साडेपाच बाय पाच फूट अशा अंतरांचे प्रयोग त्यांनी केले आहेत. 

लागवडीपूर्वी एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर होतो. सिंचनासाठी सात कूपनलिका आहेत. 

पुढील काळात स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा वापर ते करणार आहेत. 

जळगाव भागात उन्हाळ्यात तापमान अत्यंत तीव्र असते. या काळात केळीला उन्हाचा फटका बसू नये यासाठी पश्‍चिम व दक्षिण दिशेला वारा अवरोधक म्हणून बांबू, शेवरी आदींची लागवड केली आहे.

केळीची गुणवत्ता जपण्यासाठी घडांना स्कर्टिंग बॅग्स लावल्या जातात. 

शेती पिंप्री, मंगरूळ व केऱ्हाळे शिवार अशी तीन भागांत विभागली आहे. सालगडी व पाणी व्यवस्थापनासाठी कर्मचारी आहेत. 

गोमूत्रातून उपयुक्त जीवाणूखत हिवाळ्यात ड्रीपने सोडले जाते. चार देशी गायींचे संगोपन केले जाते. तीन म्हशी, पारडू, एक बैलजोडीही आहे. शेणखत घरीच उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतो. 

आठ वर्षांपूर्वी पॉली मल्चिंगचा वापर केळीत केला. परंतु काढणीनंतर क्षेत्र रिकामे झाल्यानंतर मल्चिंग फाटून जमिनीत गाडले जाण्याचा प्रकार झाला. त्याचबरोबर प्लॅस्टिकचे प्रदूषण जमिनीला प्रतिकूल ठरू नये म्हणून आता मल्चिंग पेपरचा वापर टाळला आहे. 

पीक फेरपालट केले जाते. केळीनंतर त्या शेतात वर्षभर अन्य पिके घेतली जातात. 

केळीचा पहिला व पिलबाग असे दोन हंगाम सुमारे १९ महिन्यांत साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जात असल्याने २२ पासून ते २५ किलोपर्यंतची रास ते प्रति घट मिळवितात. 

अनेक वर्षांचा अनुभव तयार झाल्याने व्यापारी परिचयाचे आहेत. बॉक्‍स पॅकिंगद्वारे केळीची उत्तरेकडील राज्यांमध्ये पाठवणूक केली जाते.

क्षेत्र व उत्पादन अधिक असल्याने पॅकहाऊस उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी शेडचे काम भोकरी गावानजीक अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर मार्गावर सुरू झाले आहे. निर्यातदारांची मदत घेऊन परदेशात निर्यातीसंबंधीचे प्रयत्नही सुरू केले आहेत. 

मशागतीसाठी मोठा व छोटा ट्रॅक्‍टर आहे. 

केळीचे अवशेष जाळले जात नाहीत. ट्रॅक्‍टरचलित यंत्राने तुकडे करून ते जमिनीतच गाडले जातात. केळीसाठी गहू व हरभरा पिकाचा बेवड उत्तम राहतो. त्यादृष्टीने या पिकांची लावण आवर्जून केली जाते. 

आॅस्ट्रेलियासह गुजरात, मध्य प्रदेशातील तज्ज्ञ व शेतकऱ्यांनी अतुल यांच्या शेतीला भेट दिली आहे. महाबनाना व अन्य संस्थांमार्फत तसेच शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul patil Banana product story