वनेतर जमिनींवरील बांबूची वाहतूक परवान्यातून मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

मुंबई - वनेतर जमिनींवरील बांबूच्या सर्व प्रजातींची वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्तता करण्यात आली असून, यासंबंधीची अधिसूचना वन विभागाने मंगळवारी जारी केली आहे. त्यामुळे आता वनेतर जमिनींवरील बांबूच्या सर्व प्रजातींना वनोपजातील वाहतूक या प्रकरणातील वाहतुकीचे नियम लागणार नाहीत. 

मुंबई - वनेतर जमिनींवरील बांबूच्या सर्व प्रजातींची वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्तता करण्यात आली असून, यासंबंधीची अधिसूचना वन विभागाने मंगळवारी जारी केली आहे. त्यामुळे आता वनेतर जमिनींवरील बांबूच्या सर्व प्रजातींना वनोपजातील वाहतूक या प्रकरणातील वाहतुकीचे नियम लागणार नाहीत. 

बांबू क्षेत्राचा विकास व धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने तत्कालीन ग्रामविकास विभागाचे सचिव व सध्याचे वित्त विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीची नियुक्ती केली होती. या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर सरकारने समितीच्या सर्व शिफारसी मान्य केल्या होत्या. राज्यातील वनेतर क्षेत्रात, शेतीच्या बांधावर, पडिक शेती क्षेत्रात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड होऊन एक शेतीपूरक जोडधंदा किंवा व्यवसाय उपलब्ध व्हावा, त्यातून उत्पन्नाचे साधन विकसित व्हावे, बांबूचे मूल्यवर्धन व्हावे, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळावा व एक चांगली बाजारपेठ तयार व्हावी, यासाठी बांबूच्या वाहतुकीस वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून सूट देण्यात यावी, अशी एक शिफारस या समितीने केली होती. या शिफारशीवर सरकारने विचार करून राज्यातील वनेतर क्षेत्रावरील बांबूच्या सर्वच प्रजातींना वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले आहे. 

बांबू हे बहुपयोगी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे वन उत्पादन आहे. त्यात उपजीविका निर्माण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. बांबूचा कागद उद्योगासाठी कच्चा माल म्हणून, कोवळ्या बांबूचा खाद्य म्हणून उपयोग होतो. याशिवाय पूलबांधणी, पॅनल्स, फ्लोरिंग, चटई, हस्तकलेच्या वस्तू, फर्निचर, अगरबत्तीच्या काड्या, लाकूड म्हणून ही त्याचे अनेक उपयोग आहेत. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरित दीर्घायू प्रजाती आहे. देशात बांबूची बाजारपेठ सुमारे ३० हजार कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन बांबूक्षेत्राच्या विकासाच्या अनुषंगाने सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. 

Web Title: bamboo transport forest