अतीव संघर्षातून एकात्मिक, बहुविध शेतीत उमटवला ठसा

केळीच्या दर्जेदार घडांसमवेत मोतीलाल (डावीकडे) व पवन पाटील.
केळीच्या दर्जेदार घडांसमवेत मोतीलाल (डावीकडे) व पवन पाटील.

दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या खोदणे, पशुधन चारणे आदी कामांमधून संघर्षाचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. पण शेती व त्यातील व्यवस्थापन हाच पर्याय त्यांचे आयुष्य पालटवण्यासाठी कारणीभूत ठरला. कष्टी, जिद्दी, मनमिळाऊ व प्रयोगशील वृत्तीतून त्यांनी १५ एकर शेती ९० एकरांवर नेली. केळी, कापूस, दुग्ध व्यवसाय अशा एकात्मिक शेतीतून कुटुंबाने साधलेली प्रगती प्रशंसनीय आहे. 

जळगाव जिल्ह्यात दापोरी हे एरंडोल तालुक्‍यातील शेवटचे गाव. या गावात जायला व्यवस्थित रस्ते नाहीत. जळगावकडून बांभोरी (ता. धरणगाव) मार्गे जाताना रवंजा व खेडी खुर्द दरम्यानचा कच्चा, खडीचा रस्ता पार करून जावे लागते. अनेक ग्रामस्थ गिरणा नदी ओलांडून दापोरा (ता. जळगाव) येथे जातात. तेथून जळगावला येतात. रस्ते वाहतूक व्यवस्था तसेच इंटरनेटची सुविधादेखील गावात व्यवस्थित नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत गावातील पाच पाटील बंधूंनी आपली एकात्मिक व बहुविध पिकांची शेती फुलविली आहे. 

पाटील बंधूंचे खडतर प्रयत्न  
गिरणाकाठामुळे जलसाठे मुबलक आहेत. जमीन काळी कसदार, मध्यम आहे. पाटील बंधूंची पूर्वी १५ एकर शेती होती. वडील माधव कोरडवाहू शेती कसायचे. सर्व बंधू शेतीत वडिलांना मदत करायचे. जनावरांचे संगोपन करायचे. पावसाळ्यात दोन बंधू पशुधन चराईला जायचे. अन्य बंधू मजुरीदेखील करायचे. सर्वच अल्पशिक्षित. थोरले पुंडलिक यांनी छोटा व्यवसाय करण्याची धडपड केली. गावापासून गिरणा नदी पलीकडील शिरलोली गावात आठ वर्षे ‘टेलरिंग’ व्यवसाय केला. पाटचाऱ्या खोदल्या. गावातच जमेल ते काबाड कष्ट केले. 

शेतीतून प्रगती
अशातच १९७२ मध्ये शेतीसाठी विजेची व्यवस्था झाली. पाटील बंधूंनी आपल्याकडील रक्कम, काही मदत यातून विहीर खोदली. सगळे आणखी उमेदीने, हिंमतीने राबू लागले. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची संधी त्यांना भाडेतत्त्वावरील शेतीतून मिळाली. त्यातून भाजीपाला, रब्बी पिकांचे भरघोस उत्पादन व उत्पन्न साध्य करू लागले. कष्ट व चिकाटीतून वर्षागणिक प्रगती होत गेली. त्यातून आजघडीला ९० एकर शेतीचे मालक होण्यापर्यंत पाटील यांनी प्रगती साधली आहे. 

दुग्ध व्यवसाय 
पाचही बंधू आज एकत्र राहतात. दहा वर्षांपूर्वी त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. आधुनिक गोठा उभारला असून सुमारे ७५ म्हशी व २५ गायींचे संगोपन होते. दूध, दही, श्रीखंड यांची पद्मालय ब्रॅण्डने विक्री होते. गायीच्या दुधाला लिटरला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये दर मिळतो. दररोज दोन्ही वेळच्या सुमारे ३०० लिटर पिशवीबंद दुधाची विक्री जळगाव शहरात घरोघरी होते. मिल्किंग मशिन, पाश्‍चराईजिंग, पॅकिंग अशा यंत्रणा आहेत. गोमूत्र एका हौदात संकलित करून केळीला ड्रीपमधून दिले जाते. शेणाचा वापर खत म्हणून होतो. जळगावात दूध वितरणासाठी दोन मजूर आहेत. त्यांच्यासाठी दोन दुचाकी आहेत. 

केळीची शेती 
    श्रीमंती, वसई आदी वाणांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन अनेक वर्षे घेतले. अलीकडील वर्षांपासून ऊतीसंवर्धित रोपांची लागवड होते.
    दरवर्षी ५० हजार रोपे लागवडीखाली. 
    बागेचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी बांधावर वारारोधक संकरीत गवताची लागवड तर लहान झाडांभोवती धैंचा. 
    कमी वेळेत पुरेसे व व्यवस्थित सिंचन व्हावे यासाठी एका ओळीत ठिबकच्या दोन लॅटरल्सचा वापर.
    पाच बाय पाच फूट अंतरात गादीवाफ्यावरील केळीला वाफसा स्थिती कायम ठेवणे सोपे जाते. 
    विद्राव्य खते व पाणी यासाठी स्वतंत्र वेळापत्रक. 
    केळीतील कंदांना परिसरातून किंवा विविध भागातून मागणी असते. अनेक शेतकरी कंद खरेदी करून घेऊन जातात. 
    प्रति २२ किलोची रास मिळवितात. खर्च कमी करण्यासाठी पिलबागही घेतात. 
    साधारण १९ महिन्यांत एका शेतात दोन हंगाम साध्य करतात. 
पिकांची बहुविधता
    दरवर्षी २५ एकरांत ठिबकवर कापसाची लागवड. एकरी १२ क्विंटल उत्पादन. 
    रब्बीत मका, गहू, हरभरा आदी पिके.  
    बांधावर बांबू लावले आहेत. दरवर्षी दोन ते अडीच हजार बांबूंची विक्री. केळीच्या झाडांना आधार देण्यासाठीही बांबूंचा उपयोग.  
    सहा सालगडी
    चार कूपनलिका, दोन विहिरी, तीन ट्रॅक्‍टर (पैकी एक मिनी), घोडा.  
- पवन पाटील- ८३२९४८६३९८  
- पुंडलिक पाटील- ९८२३६३५०५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com