जळगाव बाजारात केळीची आवक रखडत

banana
banana

जळगाव - जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून, उठाव कायम असल्याने दरही १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत टिकून आहेत. केळीचे आगार असलेल्या रावेर, यावल भागांतील आगाप नवती केळी बागांमधील काढणीची अजूनही प्रतीक्षा आहे. दर पुढेही टिकून राहण्याचे संकेत बाजारातील विश्‍लेषकांकडून मिळत आहेत. 

जिल्ह्यात सध्या चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. यात आगाप लागवडीच्या कांदेबागांमधील काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत मिळून प्रतिदिन १५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. मागील पंधरवड्यात ही आवक प्रतिदिन १८० ट्रकपर्यंत आवक सुरू होती. पावसाचा फटका जळगाव, चोपडा भागांत फारसा कांदेबाग केळीला न बसल्याने या भागातील काढणी व्यवस्थित झाली. परंतु मागील सात-आठ दिवसांत वातावरणात गारवादेखील वाढल्याने केळी घड पक्व होण्याची क्रिया काहीशी मंद झाली आहे. यामुळे आवक रखडत सुरू आहे. 

चोपडामधील वढोदा, विटनेर, गोरगावले, खेडीभोकरी, मोहिदे, अजंतिसीम, माचला आदी गावांमध्ये तर जळगावमधील गाढोदा, भोकर, किनोद, पळसोद, फुपणी, सावखेडा खुर्द, भादली खुर्द, दापोरा, खेडी खुर्द आदी भागांत केळीची काढणी सुरू आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगर या आघाडीच्या केळी उत्पादक तालुक्‍यांमध्ये सध्या अपवाद वगळता दर्जेदार केळी उपलब्ध नाही. या भागात मिळून सध्या प्रतिदिन १२० ते १३० ट्रक केळीची आवक सुरू आहे. 

रावेरमधील सातपुडा पर्वतालगतच्या काही भागांत केळीची काढणी सुरू आहे. मुक्ताईनगरमधील अंतुर्ली, पिंप्रीनांदू, नायगाव आदी भागात केळीची फारशी आवक नाही. यावल, रावेरातील नवती केळी बागांमध्ये काढणी गतीने सुरू होण्यासंबंधी आणखी दोन ते अडीच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी, या भागालगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक घटली आहे. 

बऱ्हाणपूर येथील बाजारात गेल्या आठवड्यात प्रतिदिन २२० ट्रक केळीची आवक झाली. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये या बाजारात प्रतिदिन किमान २५० ते २६० ट्रक केळीची आवक सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com