भंडारा जिल्ह्यातील भातपट्ट्यात तुरीपासून डाळनिर्मिती उद्योग  

विनोद इंगोले
बुधवार, 14 जून 2017

धान (भात)लागवडीखाली तब्बल दोन लाख हेक्‍टर क्षेत्र असलेल्या भंडारा जिल्ह्यात बांधावर तूर घेतली जाते. याच तुरीची डाळनिर्मिती करण्याकडे शेतकरी वळले आहेत. मांडेसर (ता. मोहाडी) येथील कम्युनिझम या युवा शेतकरी गटाने डाळमिल उद्योग उभारला आहे. गेल्या दोन वर्षांत त्यातून उत्पन्नाचा स्त्रोत तयार करीत आपल्या शेती अर्थकारणाला नवी दिशा दिली आहे. 

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना 
गटातील काही सदस्य व अन्य शेतकऱ्यांनी मिळून तुळगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत २० संचालक तर ३७८ भागधारक आहेत. प्रत्येकी ११०० रुपयांचा ‘शेअर’ आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम उभारण्याचे प्रस्तावीत अाहे. 

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्हे धान (भात) उत्पादक आहेत. सुमारे अकराशे ते चौदाशे मिमी असे या भागाचे सरासरी पर्जन्यमान आहे. चंद्रपूरसह गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्हयांत भात लागवड होते. पर्जन्यमान अधिक असले तरी सिंचनाच्या सोयी मर्यादीत त्यामुळे मुख्य खरीप हंगामावर व तेही भातावरच शेतकऱ्यांची भिस्त राहते. एकच पीक पद्धतीचे अर्थकारण असल्याने या भागात म्हणावा तसा आर्थिक विकास होऊ शकला नाही. नजीकच्या काळात मात्र शेतकरी भातशेताच्या बांधावर तूर लागवडीसाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. व्यावसायिक उत्पादकता त्यातून मिळत नसली तरी घरच्यापूरत्या डाळीची सोय मात्र होते. शेतकऱ्यांचा कल तूर लागवडीकडे वाढता असल्याने या भागात तुरीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्याही वाढत आहे. 

कम्युनिझम गटाची उभारणी
भंडारा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून मांडेसर हे मोहाडी तालुक्यातील सुमारे २० किलोमीटर अंतरावरील गाव. येथील अर्थकारणदेखील भातशेतीभोवतीच फिरत होते. गावात कृषी विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना बंद करण्यात आल्याचे सांगत शेतकऱ्यांनी गटाची बांधणी करावी व त्याद्वारे प्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. गावातील काही युवा शेतकरी एकत्र आलेदेखील. सुमारे २० जणांचा कम्युनिझम नावाचा गट तयार झाला. महिन्याला २०० रुपये बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. गटाच्या उभारणीला आज दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. बॅंक ऑफ इंडिया येथे समूहाचे खाते आहे. 

प्रक्रिया उद्योगाची प्रेरणा 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने अकोला येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी गटातील सदस्यांनी भेट दिली. या वेळी कृषी विद्यापीठाच्या स्टॉलवर मिनी डाळमिलचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले होते. हा प्रक्रिया उद्योग गटातील सदस्यांना भावला.  त्यांनी चर्चा केली. अर्थकारण तपासले. चर्चेअंती उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल २०१६ मध्ये गटाचे सचीव बबलू नागपूरे यांच्या मालकीच्या जागेत उद्योग उभारण्यात आला. 

इच्छा तिथे मार्ग 
डाळमिल घेण्यासाठी भांडवलाची गरज होती. परंतु इच्छा तिथे मार्ग या उक्‍तीनुसार शेतकऱ्यांचा उत्साह पाहता महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून गटाला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्मा प्रकल्प संचालक प्रज्ञा भगत, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अपेक्षा बोरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार ८० हजार रुपये किंमतीच्या या प्रकल्पासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. उर्वरित ३० हजार रुपयांची सोय गटातील सदस्यांनी सामूहिकस्तरावर केली. 

आश्वासक उत्पन्न 
मागील वर्षी थोडे उशिरा म्हणजे एप्रिलच्या दरम्याम उद्योग सुरू झाला. त्या वर्षी ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात गट यशस्वी झाला. परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना डाळ तयार करून दिली जाते. अडीच रुपये प्रति किलोप्रमाणे त्यासाठी आकारणी होते. यंदा हंगाम वेळेवर म्हणजे मार्च ते एप्रिल असा सुरू झाला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांपर्यंत उद्योगाचा प्रचारही झाला होता. त्यामुळे हंगामात उत्पन्न ९० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मिळाले. सात हजार रुपयांचे वीजबिल आले. रामपूर, फुलसावरी, चिंचखेडा या तीन गावांतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.या तीनही गावांपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर दुसरी डाळमिल आहे. हे अंतर अधिक असल्याने मांडेसरच्या कम्युनिझम गटाला या शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली.  

होणार बियाणे खरेदी 
गटाला यंदा चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्याचे वाटप गटातील सदस्यांत न करता हंगामात लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यावर भर राहील. त्याबरोबरच उद्योगाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने भांडवल गुंतवणूक करण्याचा मानस गटाचा आहे. एकत्रित निविष्ठा खरेदी केल्यामुळे आर्थिक बचत होते. भातशेतीतील अर्थकारणही त्यामुळे सुधारण्यास मदत होईल असा विश्‍वास गटसचिव नागपूरे यांनी व्यक्‍त केला.  

रोजगार निर्मिती 
नागपूरे यांच्या खासगी जागेत डाळमिळ आहे. परंतु, यासाठी चे कोणतेच भाडे आकारत नाहीत. त्यामुळे गटाच्या उद्योगाकरिता लागणाऱ्या जागेचा प्रश्‍नही सुटला. दोनशे रुपये मजुरी उद्योगासाठीच्या मजुरासाठी निश्‍चित केली आहे. नागपूरे हेच येथे राबतात. त्यांना मजुरीचा लाभ मिळतो. त्यामुळे त्यांच्यासाठीही रोजगार उपलब्ध झाला आहे. डाळमिल सिंगलफेजवर चालणारी आहे. प्रति क्‍विंटल तुरीवरील प्रक्रियेसाठी ४० रुपयांचा खर्च होतो. ताशी एक क्विंटल याप्रमाणे प्रक्रिया क्षमता आहे.  

भाताची शेती 
गटातील सदस्यांकडे दीड ते सहा एकर असे क्षेत्र आहे. भंडारा जिल्ह्यात भात पिकाचा कालावधी १५ जून ते नोव्हेंबर असा आहे. त्यानंतर डाळवर्गीय पीक, भाजीपाला किंवा हरभरा पीक पाण्याच्या उपलब्धतेनुसार घेतले जाते. सुमारे १८०० ते १९०० रुपये प्रति क्‍विंटल रुपयाे भाताला दर आहे. एकरी १५ क्‍विंटलपर्यंत उत्पादन होते. मात्र पिकाचे अर्थकारण अद्याप सक्षम नसल्यानेच आम्ही प्रक्रिया उद्योगाकडे वळल्याचे सचिवांनी सांगितले.  

बबलू नागपूरे, ९९२११४८२३८ 

Web Title: bhandara news agro news agriculture tur farmer