‘भंडाऱ्या’च्या धानपट्ट्यात फळबागांतून प्रयोगशीलता

‘भंडाऱ्या’च्या धानपट्ट्यात फळबागांतून प्रयोगशीलता

भंडारा जिल्ह्यात सुमारे एक लाख ८६ हजार हेक्‍टर खरीप लागवड क्षेत्र आहे. त्यातील सुमारे एक लाख ७२ हजार हेक्‍टरवर भाताची म्हणजेच धानाची लागवड होते. धान हीच या जिल्ह्याची मुख्य पीकपध्दती आहे. जिल्ह्यातील माडगी येथील कवडू शांतलवार यांची सुमारे साडेसतरा एकर शेती आहे. 

धान हे त्यांचे मुख्य पीक आहेच. शिवाय वेगळी वाट चोखाळत आपल्या शिवारात फळबागा फुलवण्यावर त्यांनी अधिक लक्ष दिले. आज त्यांचे वय ६९ वर्षे आहे. या वयातदेखील त्यांनी जपलेली प्रयोगशीलता व जिद्द युवकांना लाजवणारी अशीच आहे. विशेष म्हणजे शांतलवार यांच्यापासून प्रेरणा घेत जिल्ह्यात फळबाग लागवड क्षेत्र वाढीस लागले आहे.

अभ्यासातून झाला शेतीचा पाया घट्ट 
भंडारा जिल्ह्यातील तत्कालीन कृषी अधिकारी श्री. कोढारी यांच्या आंबा बागेची प्रेरणा शांतलवार यांना मिळाली. भंडारा जिल्हा बॅंकेत अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रयोगशीलता जपण्यावर भर दिला. त्यात आंबा बागेला प्राधान्य दिले. लागवडीपूर्वी आंध प्रदेश, तमिळनाडू, केरळसह महाराष्ट्रातील आंबा उत्पादकांच्या बागांना भेटी दिल्या. त्याद्वारे या पिकातील संधी आणि धोकेही जाणून घेतले. चित्तूर (आंध्र प्रदेश) भागात आंबा बागा मोठ्या प्रमाणार आहेत. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. एवढा सगळा खटाटोप केल्यानंतर ते आंबा लागवडीकडे वळले. या विषयात प्रगल्भता आली. आज ते आंबा पिकातील जाणकार म्हणून अोळखले जातात.  

आंब्याची लागवड
शांतलवार यांचे वडील नामदेवराव पूर्वी पारंपरिक पद्धतीने धान घ्यायचे. आता त्यात बदल झाला आहे. आज आंब्याची १५० झाडे शिवारात आहेत. यात केशर, लंगडा, दशेरी, राजापूरी, मलीका, चौसा, बैगनपल्ली, आम्रपाली, सिंधू अशा विविध जातींच्या आंब्याची चव त्यांच्या शेतात चाखता येते. आंब्याचा हंगाम २० मेपासून सुरू होतो. त्यानंतर २० जूनपर्यंत तो चालतो. हंगामात १५० झाडांपासून सरासरी १५ टनांचे उत्पादन मिळते. 

सीताफळ व चिकू लागवड
फळपिकांतून शाश्‍वत आर्थिक उत्पन्नाचा हेतू साधता येतो हे लक्षात आलेल्या शांतलवार यांनी सीताफळाची सुमारे एक हजार झाडे लावली आहेत. यात सरस्वती-७, बालानगर तसेच अन्य एक वाण आहे. ही संपूर्ण बाग ठिबकखाली आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी धानाच्या तणसाचा वापर होतो. सुमारे तीनशे झाडांनी यंदापासून उत्पादन देण्यास सुरूवात केली आहे. त्यातून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. फळांचा आकार चांगला असून एक फळ १३५८ ग्रॅम वजनाचे मिळाले आहे. किलोला १००, १५० ते २०० रूपयांप्रमाणे दर मिळाला आहे. 

चिकूची १४० झाडे आहेत. यापूर्वी त्यातून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मात्र शांतलवार यांच्या शेताला चारही बाजूंनी वनक्षेत्र असल्याने अस्वलांचा मोठा त्रास जाणवत आहे. परिणामी या पिकाचे मोठे नुकसान होत आहे.   

नैसर्गिक शेतीवर भर 
रासायनिक अवशेषमुक्त अन्नाचा पुरस्कार करणाऱ्या शांतलवार यांनी धानासह सर्व शेतमाल नैसर्गिक पद्धतीने पिकविण्यावर भर दिला आहे. यात जीवामृत, अमृतपाणी यांचा वापर ते करतात. सुमारे २० वर्षांपूर्वीच त्यांनी रासायनिक घटकांचा वापर करणे बंद केले आहे. 

मार्केटिंगमधील हुशारी
शांतलवार यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून ती नागपुरात राहतात. फळांच्या विक्रीसाठी शांतलवार सोशल मीडियाद्वारे प्रचार करतात. त्यातील व्हाॅटसअपचा पर्याय प्रभावी ठरला आहे. 

थेट शेतावरूनच ग्राहक आंबा, चिकू यांची खरेदी करतात. व्यापारीसुध्दा हंगामात त्यांच्या शेताची वाट धुंडाळतात. कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन नागपुरात होते. या महोत्सवात शांतलवार दरवर्षी सहभागी होतात.    

महोत्सवात थेट विक्री 
शांतलवार यांच्याकडे पार्वती चिनोर नावाचा सुवासिक भात आहे. दरवर्षी त्याचे सुमारे सहा एकर क्षेत्र असते. शहरात भरणाऱ्या महोत्सवात किलोला ८० रुपये या उच्च दराने त्यांनी थेट ग्राहकांना या तांदळाची विक्री केली आहे. यंदा नागपूर येथे १६ मे पासून तीन जून या काळात भरलेल्या महोत्सवात त्यांनी पाच टन आंब्याची विक्री केली. यात दशेरी, लंगडा आदी आंब्यांचा समावेश होता. किलोला ४० ते ८० रुपयांपर्यंत दर त्यांना मिळाला. 

अपयशातून यशस्वी वाटचाल 
अपयश ही यशाची पायरी ठरते, असे म्हणतात. शांतलवार यांच्या बाबतीतही असेच काही घडले. भातपट्ट्यात नवे पीक रुजावे, यासाठी त्यांनी सामूहिक शेतीचा प्रयोग केला. त्या माध्यमातून एकूण चार एकरांवर निशीगंध लागवड झाली; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रयोग फसला; परंतु त्यानंतरही हार न मानता त्यांनी नवचैतन्य शेतकरी गटाची बांधणी केली. या गटात २० शेतकरी सहभागी आहेत. त्या माध्यमातून पहिल्या वर्षी म्हणजे मागील हंगामात दहा एकरांवर जवस लागवड करण्यात आली. त्यातून एकूण वीस क्‍विंटल जवस हाती आले. पाच हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने जवस विक्रीचा करार पुण्यातील एका संस्थेशी करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाला.  

शेत व्यवस्थापनातील ठळक बाबी
परिसरात वनपरिसर असल्याने जनावरांचा मुक्‍त संचार असतो. 

त्यामुळे सातत्याने फळपिकांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी संपूर्ण शिवाराला तारेचे कुंपण केले आहे. त्यावर सुमारे नऊ लाख रुपयांचा खर्च आला. 

शिवारात एक हजार सागवान झाडे आहेत. 

नैसर्गिक शेती व्यवस्थापनासाठी तीन गायींचे संगोपन केले आहे. त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या दुधाचा उपयोग घरगुती कारणासाठी केला जातो. शेणखत व गोमुत्राचा वापर शेतीत होतो.

कवडू शांतलवार, ९७६४५७७७०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com